Home बातम्या राजकारण गोव्यात काँग्रेसचे दहा आमदार फुटले, भाजपा भक्कम स्थितीत

गोव्यात काँग्रेसचे दहा आमदार फुटले, भाजपा भक्कम स्थितीत

पणजी : विरोधी काँग्रेस पक्षाच्या पंधरापैकी दहा आमदारांनी बुधवारी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या दहा आमदारांनी आपण पक्ष सोडत असल्याचे जाहीर केले. गोव्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षनेते फुटण्याची गोव्याच्या राजकारणातील ही दुसरी घटना आहे.

पक्षांतरबंदी कायद्यातील तरतुदी लागू होऊ नयेत म्हणून काँग्रेसचे दहा आमदार फुटले. पंधरापैकी दहा म्हणजे दोन तृतीयांश आमदार फुटल्याने आमदारकीचा राजीनामा द्यावा लागत नाही किंवा पोटनिवडणुकीलाही सामोरे जावे लागत नाही. दहा आमदारांमध्ये कवळेकर यांच्यासह नीळकंठ हळर्णकर, इजिदोर फर्नाडिस, फिलीप नेरी रॉड्रिग्ज, फ्रान्सिस सिल्वेरा, टोनी फर्नाडिस, बाबूश मोन्सेरात, विल्फ्रेड डिसा उर्फ बाबाशान, जेनिफर मोन्सेरात, क्लाफास डायस यांचा समावेश आहे. माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणो, लुईङिान फालेरो, रवी नाईक, दिगंबर कामत व आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हे तेवढे काँग्रेसमध्ये राहिले आहेत. नव्या सरकारमध्ये बाबू कवळेकर हे उपमुख्यमंत्रीपदी असू शकतील. त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याची ग्वाही भाजपाने दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले. कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आमदारांचा गट फुटण्यास गेल्या महिन्यात तयार झाला होता पण भाजपच्या स्तरावरून निर्णय झाला नव्हता.

भाजपाचे गोवा प्रभारी बी. एल. संतोष हे गेले दोन दिवस गोव्यात आहेत. भाजपच्या अत्यंत प्रमुख पदाधिका-यांची बुधवारी सायंकाळी पणजीत बैठक झाली. त्यावेळी काँग्रेसच्या सर्व दहा आमदारांनी पक्षापासून फारकत घ्यावी व स्वतंत्र गट स्थापन करून मग भाजपामध्ये विलीन व्हावे अशा प्रकारचा निर्णय झाला. कवळेकर यांनीही त्याचवेळी स्वतंत्रपणे काँग्रेसच्या काही आमदारांची बैठक घेतली.
काँग्रेसच्या आमदारांपैकी काही जणांना मंत्रिपदे देण्यासाठी विद्यमान मंत्र्यांपैकी काही जणांना वगळले जाईल, अशीही माहिती भाजपाच्या गोटातून प्राप्त झाली.