पणजी : ‘साय – फी २0२0’ या भारतीय विज्ञान फिल्म महोत्सवाच्या पाचव्या आवृत्तीचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते येथे झाले. या चित्रपट महोत्सवानिमित्ताने तीन दिवस विद्यार्थ्यांना बौध्दिक खाद्य मिळणार आहे.
याप्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले की, ‘गोमंतकीय मुलांच्या ज्ञानात भर पडावी म्हणून ‘साय-फी २0२0’ सारखे महोत्सव आयोजित केले जातात, हे पाहून मला अत्यंत आनंद होत आहे. दरवर्षी या चित्रपट महोत्सवाचा दर्जा वाढतोय ही समाधानाची बाब आहे. भारतीयांना शास्त्रज्ञ, विज्ञान चित्रपट आणि कार्यशाळांद्वारे सृजनात्मनतेचा आधार घेत भारतीयांनी मोठी प्रगती केली आहे.
विद्यार्थ्यांना या गोष्टीची जाणीव ठेवून योग्य करिअरचा मार्ग निवडावा आणि स्वत:ला आणखी सक्षम बनविण्यासाठी प्रयत्न करावेत. शाळांमध्ये विज्ञानाशी निगडीत सहलींचे आयोजन होणे आवश्यक बनले आहे. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक संस्थांना भेटी देऊन विज्ञानाची माहिती करुन घेणे आवश्यक आहे.’
सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट (एसआरएफटीआय)च्या संचालक डॉ. देबमित्रा मित्रा, आयआरआरएस- इस्रो सेंटर- देहरादूनचे संचालक डॉ. प्रकाश चौहान, गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई, धेंपो उद्योग समुहाचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो, विज्ञान भारती राष्ट्रीय आयोजन संस्थेचे जयंत सहस्रबुद्धे, विज्ञान भारतीचे अध्यक्ष सुहास गोडसे व मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
गोडसे यांनी स्वागत केले. ते म्हणाले की, ‘संशोधन, विकास आणि शोध ऑडिओ व्हिज्युअल माध्यमातून अत्यंत चांगल्या पध्दतीने उलगडत जातात. आम्ही आशा करतो की गोमंतकीय विद्यार्थी आणि शिक्षक या महोत्सवाचा बऱ्यापैकी वापर करतील आणि त्यांच्या ज्ञानात यामुळे भर पडेल. शास्त्रज्ञ, आणि चित्रपट आणि कार्यशाळांद्वारे आणि सृजनात्मकतेचा आधार घेत भारतीयांनी मोठी प्रगती केली आहे. विद्यार्थ्यांना या गोष्टीची माहिती आणि जाणीव करून देत त्यांनी योग्य करिअरचा मार्ग निवडावा, यासाठी आमचे प्रयत्न आहेत.
डॉ. देबमित्रा मित्रा म्हणाल्या की, ‘विज्ञानावर आधारीत चित्रपट प्रभावी आहेत. हे चित्रपट मोठ्या प्रमाणात लोकांना विज्ञानाबाबत माहिती देतात. अशा महोत्सवांमुळे प्रेक्षकांमध्ये वैज्ञानिक मनोवृत्ती निर्माण होण्यास मदत होते.
डॉ. प्रकाश चौहान म्हणाले की, ‘बरेच लोक गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांपासून भीतीपोटी दूर पळत असतानाही, त्यांना विज्ञानाच्याजवळ आणण्याची तसेच त्यांना वेगळ्या पद्धतीने या विषयांबाबत माहिती करून देण्याची आपली जबाबदारी आहे. अंतराळातील संशोधनाच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला.
गोव्यातील विज्ञान शिक्षणाबाबतची आव्हाने आणि भविष्यातील संभावना या विषयावरील शिक्षकांसाठी खास बनवलेल्या आणखी एका कार्यशाळेचे उद्घाटन शिक्षण संचालक वंदना राव यांच्या उपस्थितीत झाले. मुख्यमंत्र्यांनीही या कार्यशाळेत सहभागी झालेल्यांना संबोधित केले. त्यानंतर भाभा अणु संशोधन केंद्र (बीएआरसी) चे प्रख्यात व्यक्तिमत्व पद्मश्री डॉ शरद काळे यांनी ‘विज्ञान शिक्षण – त्याची भूमिका व जबाबदाºया’ या विषयावर भाषण केले.
महोत्सवात मिशन मंगल (२०१५), अंतरिक्षम ९000 केएमपीएच, एव्हरेस्ट ‘(२०१५),’ व्हायरस ‘(२0१९),’ टर्मिनेटर : डार्क फॅट ‘(२0१९),’ जिओस्टॉर्म ‘(२0१७),’ आमोरी ‘(२0१९), ‘एज ऑफ टुमारो’ आदी चित्रपटांचा समावेश आहे. १८ रोजी शेवटच्या दिवशी, इएसजी येथील आॅडी क्र. २ येथे ‘सोसायटीच्या दिशेने विज्ञान संप्रेषणातील आव्हाने’ या विषयावर पॅनेल चर्चा होईल.