Home शहरे गोव्यात लवकरच धावणार पर्यावरणपूरक बसेस

गोव्यात लवकरच धावणार पर्यावरणपूरक बसेस

पणजी : वाढते प्रदूषण टाळण्यासाठी जगभरातील विकसनशील देशांनी विविध उपाययोजना प्रत्यक्ष कृतीत आणण्यास प्रारंभ केला आहे. केंद्र सरकारनेही यासाठी काही योजना अस्तित्वात आणल्या असून त्यापैकी एक ‘फेम इंडिया’ योजनेमधून गोव्यातील रस्त्यांवर १०० इलेक्ट्रिक बसेस आणण्याचा प्रस्ताव आहे. जुलै महिन्यात हा प्रस्ताव केंद्र सरकारला सादर करण्यात येईल, अशी माहिती कदंब महामंडळाचे संचालक संजय घाटे यांनी ‘लोकमत’च्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.

जानेवारी २०१८ मध्ये इलेक्ट्रिक बसची गोव्यातील सर्व तालुक्यांमध्ये चाचणी घेण्यात आली. विशेष म्हणजे सर्व प्रकारच्या रस्त्यांवर, चढ-उतार, वळणांवर तितक्याच सक्षमतेने चालत या बसेस विनाव्यत्यय चालल्या आणि ही चाचणी यशस्वी ठरली. पणजी, मडगाव, वास्को, पेडणे, काणकोण, फोंडा येथे घेतलेल्या चाचणीवेळी या बसमध्ये ७० प्रवासी होते. त्यामुळे राज्य सरकारने या पर्यावरणपूरक बसेस गोव्यात चालविण्यासाठी हिरवा कंदील दाखविला असून जुलै महिन्यात केंद्र सरकारला याविषयीचा प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर लगेच निविदा मागवून खासगी कंपन्यांमार्फत ही योजना प्रत्यक्ष साकारण्यात येणार आहे. या योजनेसाठी ७० टक्के अनुदान केंद्र सरकारचे मिळणार असून या योजनेतून राज्यात १४ ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात येणार आहेत.

या बसेस पूर्णत: विदेशी तंत्रज्ञानावर आधारित आहेत. त्यामध्ये इलेक्ट्रिक बॅटरी हा महत्त्वाचा घटक असून तिची निर्मिती विदेशात मोठ्या प्रमाणात होते. एक बॅटरी साधारण सात वर्षे काम करते. या बॅटरीवर चालणाऱ्या बसचे तंत्रज्ञान विदेशात मोठ्या प्रमाणात वापरले जाते. हे तंत्रज्ञान अवगत असलेल्या कंपन्यांमार्फत गोव्यात इलेक्ट्रिक बसेस प्रत्यक्ष रस्त्यावर धावतील, अशी माहिती घाटे यांनी दिली.

एसी बसेस
गोमंतकीय प्रवाशांचा प्रवास आणखी आरामदायी आणि सुखकर होण्यासाठी वातानुकुलित यंत्रणा असलेल्या एसी बसेस राज्यातील रस्त्यांवर लवकरच धावणार आहेत. वातानुकुलित यंत्रणेचे काम करणाºया कंपन्यांना हे कंत्राट देण्यात येणार असून त्यासाठी निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू आहे.

‘त्या’ बसमध्ये तांत्रिक बिघाड
काही दिवसांपूर्वी कदंब महामंडळाच्या एका बसमधून मोठ्या प्रमाणात धूर सोडला जात असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. या व्हिडिओची कदंब परिवहन महामंडळाने तात्काळ दखल घेऊन बसमधील तांत्रिक बिघाड दुरुस्त केला. ‘नोजल चोकअप’ झाल्यामुळे ही समस्या उद्भवली होती. आम्ही ती बस त्वरित दुरुस्त केली, अशी माहिती घाटे यांनी दिली.

४४ बसेस भंगारात काढणार
कदंब महामंडळाचे सध्या अस्तित्वात असलेल्या बसेसपैकी ४४ बसेस कालबाह्य झाल्या असून त्या लवकरच भंगारात काढण्यात येतील. मात्र, त्यासाठी तेवढ्याच नव्या बसेस उपलब्ध केल्यानंतर जुन्या बसेस कालबाह्य करण्यात येतील, असे घाटे म्हणाले.

कशी आहे ‘फेम इंडिया’ योजना
क्लिन एनर्जी वाढवून देश प्रदूषणमुक्त करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने अवजड उद्योग मंत्रालयातर्फे ‘फेम इंडिया’ ही योजना अस्तित्वात आणली आहे. फास्टर अ‍ॅडॉप्शन अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरिंग आॅफ हायब्रिड अ‍ॅण्ड इलेक्ट्रिक व्हेईकल्स, असे या योजनेचे तपशीलवार नाव आहे. या योजनेतून २०२२ पर्यंत देशभरात ७० लाख हायब्रिड आणि इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न आहे. यामुळे प्रतिवर्षी ९५० कोटी लिटर इंधनाचा वापर कमी होणार असून वर्षाला ६२ हजार कोटी रुपयांची बचत होणार आहे. या योजनेतून दुचाकी, तीनचाकी, चारचाकी आणि मोठया वाहनांसाठी इन्फ्रास्ट्रक्चरची निर्मिती केली जाणार आहे.