Home गुन्हा गौरी लंकेश हत्या : हृषीकेश देवडीकरला अटक

गौरी लंकेश हत्या : हृषीकेश देवडीकरला अटक

0

धनबाद (झारखंड) : पत्रकार गौरी लंकेश हत्येप्रकरणी पोलिसांनी झारखंडच्या धनबाद येथून हृषीकेश देवडीकर याला अटक केली. हृषीकेश उर्फ राजेशला धनबादपासून ३० किमी अंतरावर अटक करण्यात आली. हृषीकेश गेले आठ महिने कतरास येथील पेट्रोल पंपावर काम करत होता. गौरी लंकेश यांची ५ सप्टेंबर, २०१७ रोजी बंगळुरूत त्यांच्या घरासमोरच हत्या झाली होती. या प्रकरणात अटक झालेला हा १७वा आरोपी आहे. परशुराम वाघमारे याने गोळ्या चालविल्या होत्या, असा आरोप असून, तो अटकेत आहे. एक आरोपी अद्यापही फरार आहे.
बंगळुरूच्या पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. नंतर त्याला बंगळुरूला घेऊन गेले. बंगळुरूच्या पोलीस पथकातील अधिकारी पुनीत कुमार यांनी सांगितले की, मोबाइल लोकेशनवरून हृषीकेशला ट्रॅक करण्यात आले होते. बंगळुरू पोलिसांनी पेट्रोल पंप मालकाचीही चौकशी केली. त्यांनी सांगितले की, हृषीकेशने आपण बेरोजगार असल्याचे सांगितले होते आणि नोकरी मागितली होती. त्या मालकाने त्याला भाड्याने घरही दिले होते. एम. एम. कलबुर्गी, नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्या हत्येशीही या टोळीचा संबंध असल्याचा संशय आहे.