ग्रामीण अर्थचक्राला चालना देणारी कर्जमुक्ती योजना

ग्रामीण अर्थचक्राला चालना देणारी कर्जमुक्ती योजना
- Advertisement -


महाराष्ट्रातील शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मात्र, निसर्गाच्या अनिश्चिततेमुळे, वाढत्या उत्पादन खर्चामुळे आणि बाजारपेठेतील चढ-उतारांमुळे अनेक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले जातात. अशा वेळी राज्य शासनाने जाहीर केलेली ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ ही संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरत आहे. ही योजना केवळ कर्जमुक्तीपुरती मर्यादित नसून शेतकऱ्याला पुन्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा व्यापक प्रयत्न आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या राज्यकारभारात शेती, सिंचन, जलव्यवस्थापन आणि रयतेच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षात त्यांच्या नावाने ही योजना जाहीर करून शासनाने त्यांच्या लोकाभिमुख कार्याला अभिवादन केले आहे. त्यामुळे या योजनेला आर्थिक मदतीसोबतच ऐतिहासिक आणि सामाजिक महत्त्वही प्राप्त झाले आहे.

पश्चिम महाराष्ट्र हा ऊस, भात, ज्वारी, मका, भाजीपाला, फळबागा आणि दुग्धव्यवसायामुळे राज्याच्या कृषी विकासाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू मानला जातो. कृष्णा, पंचगंगा, वारणा, दूधगंगा यांसारख्या नद्यांमुळे सिंचनाची चांगली व्यवस्था असली तरी बदलते हवामान, उत्पादन खर्चातील वाढ आणि बाजारभावातील अनिश्चितता यामुळे येथील शेतकऱ्यांनाही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत वेळेवर मिळणारा आर्थिक आधार हा केवळ एका शेतकऱ्यालाच नव्हे, तर संपूर्ण ग्रामीण अर्थचक्राला बळ देणारा ठरतो.

कर्जमुक्तीचा परिणाम केवळ बँकेच्या खात्यापुरता मर्यादित राहत नाही. शेतकऱ्याचे आर्थिक दडपण कमी झाल्यानंतर तो नव्या हंगामासाठी अधिक आत्मविश्वासाने नियोजन करू शकतो. सुधारित बियाणे, आधुनिक तंत्रज्ञान, ठिबक सिंचन, यांत्रिकीकरण आणि पीक विविधीकरण याकडे त्याचा कल वाढतो. परिणामी उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होते आणि ग्रामीण बाजारपेठेतील आर्थिक व्यवहारांनाही गती मिळते. त्यामुळे कर्जमुक्ती ही शेती आणि ग्रामीण विकासाला चालना देणारी महत्त्वाची गुंतवणूक ठरते.

या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतच्या थकीत अल्पमुदत पीक कर्जाची कर्जमुक्ती देण्यात येणार आहे. ज्यांची थकबाकी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, त्यांच्यासाठी अधिकचे पैसे भरून ‘एकवेळ समझोता’ योजनेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याबरोबरच प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्यांनाही न्याय देण्याचा प्रयत्न या योजनेतून करण्यात आला आहे.

या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कर्जमुक्तीनंतर शेतकऱ्यांना पुन्हा नव्याने पीक कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे बियाणे, खते, औषधे आणि शेतीसाठी आवश्यक भांडवल वेळेवर उपलब्ध होऊन उत्पादनक्षमतेला चालना मिळेल. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आणि पारदर्शक असल्यामुळे लाभ वितरण अधिक सुलभ व विश्वासार्ह होणार आहे.

कर्जमुक्ती ही केवळ आर्थिक मदत नसून शेतकऱ्याच्या आत्मविश्वासाला मिळालेली नवी उभारी आहे. संकटाच्या काळात दिलेला हा आधार शेतकऱ्याला नव्या हंगामाकडे आशेने पाहण्याचे बळ देणार आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ ही केवळ कर्जमाफीची योजना नसून शेतीला नवसंजीवनी देणारी, ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारी आणि शेतकऱ्यांच्या भविष्याला नवी दिशा देणारी महत्त्वपूर्ण योजना ठरत आहे.

००० 

– जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर



Source link

- Advertisement -