Home ताज्या बातम्या ग्रामीण भागात विकास कामांना मोठ्या प्रमाणावर चालना देण्यात यावे -रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे

ग्रामीण भागात विकास कामांना मोठ्या प्रमाणावर चालना देण्यात यावे -रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे

0


मुंबई : रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात विकासकामांना मोठ्या प्रमाणावर चालना देऊन लॉकडाऊनच्या काळात अकुशल मजुरांन रोजगाराची मोठी संधी उपलब्ध करून देता येईल. केंद्र सरकारच्या मनरेगा व राज्याच्या रोहयो अंतर्गत ग्रामीण भागातील विकास कामांना गती देऊन अकुशल कामगारांच्या रोजंदारीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी व्यापक काम करता येईल, अशी महत्त्वपूर्ण सूचना रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्रजी तोमर यांच्याकडे
मांडली. केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्रजी तोमर यांनी विविध राज्यातील कॅबिनेट मंत्र्यांसोबत कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात ग्रामीण भागातील
विकासकामांना खीळ बसू नये, यासाठी काय उपाययोजना करता येतील याबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. या चर्चेत महाराष्ट्र सरकार तर्फे रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी श्री. तोमर यांच्यासोबत संवाद साधला. कोरोना विषाणूंची साखळी तोडण्यासाठी राज्य व केंद्र शासनाने लॉकडाऊनचाकालावधी ३ मे पर्यंत वाढवला आहे. या आपत्तीकाळात काम करणाऱ्या मजुरांचा विमा काढण्यात आला आहे. ग्राम रोजगार सेवक यांचेही काम जिकरीचे असल्याने त्यांचाही प्रत्येकी 25 लक्ष रुपयांचा विमा केंद्र सरकारने मनरेगा अंतर्गत काढावे. तसेच मागेल त्याला काम याप्रमाणे नवीन मजुरांना तात्काळ जॉबकार्ड वाटप करून जलसंधारण, शेती, दळणवळण असे अनेक प्रकारचे काम रोहयो मार्फत करून प्रत्येक राज्यातील ग्रामीण विकासाला गती देता येईल, असे श्री. भुमरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे केंद्रीय ग्रामविकास मंत्री श्री. तोमर यांना सूचित केले. ग्रामीण विकासाबाबत धोरणात्मक व नियोजनबद्ध काम करून ग्रामीण विकास साधण्यासाठी महत्त्वाच्या उपाययोजना सुचवल्या आहेत. श्री. भुमरे यांच्या सूचनांचा तात्काळ विचार करून संबंधित सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकार तर्फे तात्काळ पाऊले उचलली जातील अशी खात्री केंद्रीय ग्रामविकास मंत्री श्री. तोमर यांनी यावेळी दिली. केंद्रीय ग्रामविकास विभागातर्फे आयोजित व्हिडीओ कॉन्फरन्स मध्ये महाराष्ट्र सरकार तर्फे सहभाग घेऊन ग्रामीण विकासाबाबत महत्त्वाच्या सूचना मांडल्याबद्दल श्री. भुमरे यांचे केंद्र सरकारच्या ग्रामविकास विभागातर्फे आभार मानण्यात आले. धान्य वितरण सुरळीत करा

उद्योगमंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनीही औरंगाबाद जिल्हा आढावा बैठक घेऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात काय काय उपाययोजना केल्या
आहेत, लॉकडाऊनच्या काळात कोण-कोणती कामे करण्यास प्राधान्य देता येईल याबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी सोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला होता. या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधीना स्वतःच्या घरातुनच सहभागी होण्याची व्यवस्था एनआयसी मुंबई तर्फे करण्यात आली होती, श्री. भुमरे यांनीही या
व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये घरातूनच सहभागी होऊन अनेक मार्गदर्शक सूचना केल्या यात प्रामुख्याने रेशन धान्य वितरण सुरळीत करून प्रत्येकाला धान्य वाटप करण्यात यावे, खासगी दवाखाने सुरू राहण्यासाठी कार्यवाही करणे, विकासकामांना गती मिळण्यासाठी पूरक गोष्टींना परवानगी देण्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अशा अनेक महत्त्वाच्या सूचना त्यांनी या जिल्हा आढावा बैठकीत केल्या.