चंद्रपूर दि. 21 ऑगस्ट : पोंभूर्णा तालुक्यात ग्रामीण रुग्णालयाची प्रशस्त इमारत उभी झाली आहे. येथे वेदना आणि दुःख घेऊन येणा-या रुग्णांना वैद्यकीय सेवा वेळेत उपलब्ध करून दिली तर त्याच्या चेहऱ्यावर हास्य आणि आनंद झळकते. विशेष म्हणजे रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचा-यांच्या आपुलकीच्या भावनेने 50 टक्के रुग्ण आधीच बरा होतो. ग्रामीण रुग्णालयाच्या सुसज्ज अशा इमारतीकरीता अत्याधुनिक उपकरणांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे वने सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
पोंभूर्णा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाच्या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष सुलभा पिपरे, उपाध्यक्ष अजित मंगळगिरीवार, आरोग्य उपसंचालक डॉ.विनिता जैन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, देवराव भोंगळे, उपविभागीय अधिकारी श्री. ढवळे, तहसीलदार शुभांगी कनवाडे, कार्यकारी अभियंता अनंत भास्करवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके, पोंभुर्णा वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिकेत गेडाम, डॉ. शुभम तुमराम, डॉ. संदेश मामीडवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
रुग्णालयात सेवा देताना पवित्र भावना ठेवून कामे करावे, असे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले, आजारी व्यक्तीचं दुःख आणि वेदना दूर करण्याच्या दृष्टीने या रुग्णालयात आवश्यक साहित्यासाठी निधी निश्चितपणे उपलब्ध करून देण्यात येईल. मागील दोन वर्ष ग्रामीण रुग्णालयाची इमारत उद्घाटनाच्या प्रतिक्षेत होती. आज सर्व साहित्यासह या रुग्णालयाचे लोकार्पण झाले. या रुग्णालयात पदभरती झाली असून उर्वरित पदे लवकरच भरले जाईल. नगरपंचायत इमारत, स्टेडियम, आयटीआय यासारखी 18 पेक्षा अधिक कामे या तालुक्यात झाली आहेत.
मंत्री श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले, येत्या काळात पोंभूर्णा तालुक्यात माळी समाज बांधवांसाठी उत्तम असे समाज भवन उभारणीचे काम होणार आहे. बाहेर तालुक्यातील विद्यार्थी या ठिकाणी येऊन शिक्षण घेईल, अशी होस्टेलची सुसज्ज इमारत या ठिकाणी उभी राहणार आहे. कृषी क्षेत्रात काम करणे गरजेचे असून मूलच्या सोमनाथ येथे कृषी महाविद्यालय सुरू केले. कृषी तंत्रज्ञान विषयक प्रशिक्षण देण्यासाठी अजयपूर येथे 75 कोटीचे प्रशिक्षण केंद्र सुरू होत आहे. जलसंधारणाच्या माध्यमातून येत्या दोन वर्षात तलावामध्ये पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या अमृत महोत्सवी वर्षात मुल येथे उत्तम आरोग्य सुविधा असलेले 100 बेडचे रुग्णालय करण्यात येणार आहे. चंद्रपुरात रोजगाराच्या दृष्टीने काम करण्याचा निर्णय घेतला आहे.
तालुक्यातील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी 10 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून डिसेंबर अखेरपर्यंत निवासस्थानाचे बांधकाम पूर्णत्वास येईल. कृषी अधिकाऱ्यांसाठी कृषी विभागाची उत्तम इमारत उभारण्यात येईल. वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनी म्हणजेच पुढील 1 जुलै रोजी त्याचेसुद्धा उद्घाटन निश्चित केले जाईल. विकास कामांमध्ये चंद्रपूर जिल्हा एक मॉडेल व्हावा तसेच इतर जिल्ह्यांना हेवा वाटेल, असे काम या जिल्ह्यात करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असेही ते म्हणाले.
रुग्णालयास आवश्यक जे साहित्य लागेल ते मानव विकास, सीएसआर, डीपीडीसी नाविन्यपूर्ण, आमदार निधीतून निधी मागणी करून साहित्य उपलब्ध करून घ्यावे. रुग्णालयात सोलरसाठी निधी तसेच ॲम्बुलन्स उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आवश्यक साहित्य प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात येईल.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी आपल्या प्रास्ताविकेतून सांगितले की, पोभूंर्णा तालुक्यात दोन प्राथमिक आरोग्य केंद्र व 18 उपकेंद्र आहेत. पोंभूर्णा तालुक्याच्या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून ग्रामीण रुग्णालय अस्तित्वात नव्हते. येथील नागरिकांना अत्यंत प्राथमिक स्वरूपाच्या आरोग्य सुविधेसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी यावे लागत होते. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने या ग्रामीण रुग्णालयाच्या निर्मितीसाठी मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. अविरत पाठपुरावा व प्रयत्नामुळे आधुनिक व प्रशस्त असे ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम पूर्णत्वास येऊन आज लोकार्पण होत आहे. पोभूंर्णा येथे 17 जानेवारी 2013 रोजी 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले. रुग्णालयाच्या मुख्य इमारतीच्या बांधकामाकरिता 14 कोटी 87 लक्ष निधी मंजूर झाला व हे रुग्णालय पूर्णत्वास आले. रुग्णालयीन कर्मचाऱ्यांची पद निर्मिती झाली असून सदरील पदे टप्प्याटप्प्याने भरण्यास सुरुवात झाली. आज अखेरपर्यंत 90 टक्के पदे भरण्यात आली आहे. त्यासोबतच आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी 25 निवासस्थानाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. या रुग्णालयात प्राथमिक स्वरूपाच्या तपासण्या उपलब्ध होणार असल्याने प्रयोगशाळा कक्ष, आंतररुग्ण कक्ष, इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे.
तत्पूर्वी, मंत्री श्री मुनगंटीवार यांच्या हस्ते वृक्षारोपण व पाच दिव्यांग बांधवांना तीन चाकी सायकलचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला अलका आत्राम यांच्यासह सर्व नगर परिषद / पंचायतीचे पदाधिकारी, वैद्यकीय अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000
घुग्गूस शहरातील निर्माणाधीन रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम प्राधान्याने पूर्ण करा
– वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर, दि. 21 ऑगस्ट : घुग्गूस हे औद्योगिक शहर असून या शहराची लोकसंख्या वेगाने वाढत आहे. घुग्गूस शहरातील रेल्वे गेटवर उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे. रेल्वे क्रॉसिंगमुळे होणारी वाहतूक कोंडी व ओव्हरलोडिंग वाहतुकीमुळे अपघाताचे प्रमाण देखील वाढत आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था असणे गरजेचे असून येथील निर्माणाधीन उड्डाणपुलाचे बांधकाम प्राधान्याने पूर्ण करावे, असे निर्देश राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
घुग्गूस येथील निर्माणाधीन उड्डाणपूल, घुग्गूस वळण मार्ग व रेल्वे क्रॉसिंगवरील वाहतूक समस्याबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, देवराव भोंगळे, तहसीलदार निलेश गौंड, घुग्गूसचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर आदी उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गूस हे औद्योगिक शहर असल्याने येथील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी पर्यायी उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे सांगून मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, जड वाहतुकीसाठी 2200 मीटर लांबीच्या नवीन बायपास रोडची निर्मिती करण्यात येत आहे. वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी उड्डाणपुलाची निर्मिती हा कायमस्वरूपी उपाय आहे. लॉयड मेटल्स, एसीसी सिमेंट आदी कंपन्याच्या जड वाहतूकीकरीता पर्यायी रस्त्याची निवड करावी. जड वाहतुकीसाठी बायपास रोड तयार करावेत. तसेच रेल्वे गेट आणि रस्त्याचे रुंदीकरण करावे. वे-ब्रिज रेल्वे गेटवरून दुसरीकडे स्थलांतरित करावे. जेव्हा ओव्हरलोडींग होते अथवा डबल इंजिन लावल्या जाते तेंव्हा या कामांमध्ये खूप वेळ लागतो, त्यामुळे रेल्वे गेट खूप वेळ बंद असते. यावर तातडीने उपाययोजना कराव्यात.
श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले, रस्त्याची डागडुजी, व रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम कंत्राटदाराकडून तातडीने करून घ्यावे. चंद्रपूर बायपास रोडची भूसंपादन प्रक्रिया शेतीमुळे प्रलंबित आहे, ती प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी. सर्वे करतांना त्याचे फायदे नागरिकांना समजावून सांगावे. जोपर्यंत फ्लाय ओव्हर ब्रिज तयार होत नाही, तोपर्यंत तात्पुरत्या रेल्वे गेटची उभारणी करावी. तसेच त्या ठिकाणी चार सुरक्षारक्षक तैनात करावे. रस्त्यावर बोर्ड लावून बॅरियर लावावेत, जेणेकरून चुकीच्या मार्गाने वाहने जाणार नाही. त्या ठिकाणी ट्रॅाफिक पोलिसाची नियुक्ती करावी. तसेच कोणतेही काम करतांना त्याचे आकलन करून काम विहित वेळेत पूर्ण होईल, याकडे गंभीरतेने लक्ष द्यावे, अशा सूचना देखील त्यांनी उपस्थितांना दिल्या.
घुगुस येथे 2200 मीटर लांबीचे नवीन बायपास निर्मितीकरीता 6.6 एकर शेत जमिनीचे अधिग्रहण होणार आहे. तसेच नवीन बायपास निर्मितीची कार्यवाही त्वरीत पूर्ण करण्यात येईल. रेल्वे क्रॉसिंगमुळे वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात मानव संचालित गेट उभारून दुचाकी व लहान चारचाकी वाहनासाठी गेट उभारण्याचे नियोजित आहे. यासंदर्भात डीआरएम सोबत बैठक घेण्यात येणार असल्याचेही सांगितले. एसीसी व लॉयड मेटल कंपन्यामार्फत होणारी जड वाहतूक बस स्टॅन्ड चौक ते पोलीस स्टेशन मधून नकोडा उसेगाव मार्गास जोडणाऱ्या रस्त्यावरून वळविण्यात येणार आहे. असल्याचेही मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले.
बैठकीला घुग्गुसचे पोलीस निरीक्षक बबन फुसाटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता प्रकाश अमरशेट्टीवार, कार्यकारी अभियंता सुनील कुंभे, मध्य रेल्वेचे वरिष्ठ शाखा अभियंता निखिल आकूलवार, विवेक बोढे, लॉयड मेटल्स, एसीसी कंपन्यांचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.
000