ग्राम विकासातून विकसित भारताचा संकल्प पूर्ण होणार- मंत्री जयकुमार गोरे – महासंवाद

    - Advertisement -

    • अभियानाचे जिल्हा, विभागीय पुरस्कार प्रदान

    अमरावती, दि.२१: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातून ग्राम विकासाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. यातून गावांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली आहे. अभियानाच्या माध्यमातून माणसे एकमेकांशी जुळल्या गेली आहेत. गावाच्या विकासासाठी नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. अभियानाद्वारे निर्माण झालेल्या या सकारात्मकतेतून विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होणार आहे, त्यासाठी सर्व घटकांनी योगदान द्यावे, असे आवाहन ग्राम विकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

    मंत्री श्री. गोरे यांच्या हस्ते आज येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचे जिल्हा व विभागस्तरीय पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी आमदार प्रवीण पोटे, संजय खोडके, राहुल कुल, राजेश वानखेडे, प्रवीण तायडे, गजानन लवटे, राजू तोडसाम, केवलराम काळे, सई डहाके, उमेश यावलकर, ग्राम विकास व पंचायतराज विभागाचे सचिव चंद्रकांत पुलकुंडवार, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी आदी उपस्थित होते.

    मंत्री श्री. गोरे म्हणाले, देशाला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र करण्यासाठी संकल्प करण्यात आला आहे. राज्यानेही विकसित महाराष्ट्राचा संकल्प करीत पुढाकार घेतला आहे. यादृष्टीने राज्यात मजबूत दळणवळण व्यवस्था उभी राहिली आहे. शहरातील पायाभूत व्यवस्था बळकट होत आहे. शहरांच्या विकासासोबतच गावांच्या विकासाच्या बळकटीसाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागाच्या विकासातून विकसित भारताचा संकल्प पूर्ण होण्याचा विश्वास दृढ झाला आहे.

    या अभियानात राज्यातील ५ हजार ६४४ गावांनी सहभाग घेतला. यातील ४ हजारहून अधिक ग्रामपंचायतींनी स्वतंत्र संकेतस्थळ सुरू करून सीसीटीव्ही यंत्रणा उभारली. या अभियानाचे फलीत म्हणून ८१५ कोटी रूपयांचे कर संकलन आणि २४० कोटींची पाणीपट्टी संकलित झाली आहे. तसेच १३ हजार पाण्याच्या स्त्रोतांचे बळकटीकरण करून ६५ लाख वृक्षलागवड करण्यात आली.

    अभियानाच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजनांचे एकत्रिकरण करून ग्राम विकासाला चालना देण्यात येत आहे. यात आरोग्य, दिव्यांग विकास, विविध आवास योजना, भूमिहीनांना घरे, सीसीटीव्ही यंत्रणा, पाणंद रस्ते, गावातील रस्ते, स्मशानभूमी, व्यायाम शाळा, वाचनालय आदी सुविधा उभारण्यात आल्या आहे. प्रामुख्याने शाळांमध्ये मुलामुलींसाठी शौचालयाची सुविधा उपलब्ध झाली आहे. अभियान राबविण्यासाठी गावपातळीवरील सर्व घटकांचे योगदान महत्त्वाचे आहे. गावस्तरावर अभियान राबविताना प्रशासनावरही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. गावाच्या कार्याचे मुल्यमापन होत असताना लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या कार्याचे मुल्यमापन होणार आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी गाव दत्तक घ्यावे. गावात जाऊन लोकचळवळ उभारावी. राज्यात सध्या दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे या परिस्थितीला संधी समजून या अभियानात जलसंधारणाची कामे करावीत, असे आवाहन त्यांनी केले.

    मंत्री श्री. गोरे यांच्या हस्ते मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान सन २०२५-२६ मध्ये विभागीय स्तरावर १ कोटी रुपयांचा प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या सावळी, ता. जि. बुलडाणा, ८० लाख रुपयांचा दुसरा क्रमांक पटकावणाऱ्या पार्डी, ता. मोर्शी, ६० लाख रुपयांचा तिसरा क्रमांक पटकावणाऱ्या एरंडगाव, ता. नांदगाव खंडेश्वर, तर अमरावती जिल्हास्तरावरील ५० लाख रुपयांचा पहिला क्रमांक पटकावणाऱ्या घोडसगाव, ता. अंजनगाव सुर्जी, ३० लाख रुपयांचा दुसरा क्रमांक पटकावणाऱ्या बेलोरा, ता. चांदुरबाजार आणि २० लाख रुपयांचा तिसरा क्रमांक पटकावणाऱ्या देवगाव, ता. अचलपूर या ग्रामपंचायतींना पुरस्कार प्रदान करण्यात आले.सुरुवातीला ग्राम विकास व पंचायतराज विभागाचे सचिव चंद्रकांत पुलकुंडवार आणि राज्य ग्रामीण विकास संस्थेचे संचालक आणि यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सन मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज योजना २०२६-२७ च्या नियोजनाबाबत मार्गदर्शन केले. जलताराचे संशोधक डॉ. पुरुषोत्तम वायाळ यांनी अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या जलसंधारणाबद्दल मार्गदर्शन केले. अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांनी प्रास्ताविक केले. क्षिप्रा मानकर यांनी सूत्रसंचालन केले. अपर आयुक्त (विकास) शालिनी कडू यांनी आभार मानले.

    जिल्हा परिषदांच्या प्रदर्शनाला उत्स्फुर्त प्रतिसाद

    पुरस्कार सोहळ्या निमित्ताने कार्यक्रम स्थळाच्या परिसरात अमरावती विभागातील सर्व जिल्हा परिषदांतर्फे विशेष प्रदर्शन लावण्यात आले होते. यात उमेद, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन, कृषी विभागाची दालने तसेच विविध बचत गटांची उत्पादने प्रदर्शित करण्यात आली. कार्यक्रमाला उपस्थित मंत्री श्री. गोरे यांच्यासह उपस्थितांनी प्रदर्शनाला भेट देऊन पाहणी केली.

    ०००००००

    - Advertisement -