Home गुन्हा ग्राहकाची फसवणूक केल्याप्रकरणी नवी मुंबईत विकासकावर गुन्हा दाखल

ग्राहकाची फसवणूक केल्याप्रकरणी नवी मुंबईत विकासकावर गुन्हा दाखल

नवी मुंबई : ग्राहकाची फसवणूक केल्याप्रकरणी नेरुळ पोलीसठाण्यात विकासकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने घरासाठी पैसे घेऊनदेखील ग्राहकाला घर न देता, एकच घर दोघांना विकून फसवणूक केली आहे. त्यानुसार गुन्हे शाखेच्या तपासाअंती हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उलवे येथे राहणाऱ्या वीरेंद्र कोळी यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. त्यांनी आरोही बिल्डर्स अँड डेव्हलपर्समार्फत नेरुळ सेक्टर २० येथे २०१४ साली बांधकाम होत असलेल्या इमारतीमध्ये घर बुक केले होते. त्याकरिता विकासक अर्जुन चौधरीला ५ लाख ९१ हजार रुपये दिले होते. यावेळी कोळी यांना त्यांच्या घराचा ताबा २०१६ साली मिळेल असे आश्वासन चौधरीने दिले होते. मात्र दिलेली मुदत उलटून तीन वर्षे होऊनही त्यांना घराचा ताबा देण्यात आलेला नव्हता. अखेर बुक केलेले घर दुसऱ्या एका व्यक्तीला विकले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यामुळे त्यांनी रक्कम परत मिळवण्याचा प्रयत्न चालवला होता. याप्रकरणी कोळी यांना विकासक चौधरीने धमकावल्याची त्यांची तक्रार आहे. तसेच घराच्या बहाण्याने फसवणूक झाल्याचीही तक्रार त्यांनी गुन्हे शाखेच्या पोलिसांकडे केली होती. या प्रकरणी अर्जुन चौधरीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.