Home ताज्या बातम्या घरातून निघून गेलेला इसमाला पोलादपूर पोलीसानी केले आई वडिलांचे स्वाधीन

घरातून निघून गेलेला इसमाला पोलादपूर पोलीसानी केले आई वडिलांचे स्वाधीन

0

परवेज शेख घरातून निघून गेलेला इसमाला पोलादपूर पोलीसानी केले आई वडिलांचे स्वाधीन याबाबत सविस्तर वृत्त असे की सजल मधुकर पाटील वय ३७ रा. चेंबूर मुंबई मूळ रा. जळगाव हा त्याच्या घरातून निघून चिपळूण बाजूकडे गेला, त्यानंतर तो तेथून रविवार रोजी पोलादपूर लोहरे येथे कोणत्यातरी वाहनाने येऊन नाक्यावर उतरला असता तेथील नाक्यावर तो इकडे तिकडे सैरभैर होऊन पाहत असल्याने तेथे उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते दीपक बाबाजी उतेकर,सुशांत गोळे,माने गुरुजी, पांढरी साळूखे, समीर साळूखे आदीना संशय आल्याने ग्रामस्थांनी सतर्कता दाखवून सदर इसमास पोलादपूर पोलीस ठाणे येथे आणून पोलिसांचे स्वाधीन केले त्याला काहीच सांगता येत नव्हते.

पोलिसांनी अधिक चौकशी केली असता वरील प्रमाणे माहिती प्राप्त झाली परंतु सदर व्यक्तीला त्याचे नाव खेरीज करून घरचा पत्ता व इतर काही आठवत नसल्याने माहिती सांगता येत नव्हती तसेच सदर व्यक्तीकडे कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र नसल्याने त्याची ओळख शोधून काढणे कठीण होत होते. वरीष्टांच्या मार्गदर्शनाखाली पोलादपूर पोलीस स्टेशनचे अधिकारी श्री.सपोनि जाधव , पोसई श्री. खिरड, पोलीस हवालदार विजय चव्हाण, दिपक जाधव, इकबाल शेख (गोपनीय शाखा), विनोद महाडिक, आशिष नटे यांनी सोशल मीडिया व फेसबुक च्या आधारे सदर व्यक्तीच्या घरच्या लोकांचा शोध घेतला असता त्याची आई शुभना पाटील या फेसबुक वर मिळून आल्या व त्याचा मोबाइल नंबर पोलिसांना प्राप्त झाला. त्यांना संपर्क साधून त्यांना त्यांच्या मुलाचा फोटो पाठवून खात्री केली असता वरील इसम सजल पाटील हा त्यांचाच मुलगा असल्याचे त्याच्या आई कडून कळले तसेच त्याचे वडील मधुकर पाटील रा.चेंबूर मुंबई यांनी पोलादपूर पोलीस ठाण्यात संपर्क साधून मुलाला तेथेच ठेवा आम्हीं त्याला नेण्यासाठी येत असल्याची विनंती करून रात्रौ ८ वाजता आई, वडिलांनी पोलादपूर पोलीस ठाण्यात येऊन सजल पाटील यास ताब्यात घेऊन पोलादपूर पोलिस व लोहरे ग्रामस्थांचे आभार मानले.