Home बातम्या ऐतिहासिक ‘घरोघरी तिरंगा’ अभियानात नागरिकांनी सहभाग नोंदवावा – जिल्हाधिकारी जलज शर्मा

‘घरोघरी तिरंगा’ अभियानात नागरिकांनी सहभाग नोंदवावा – जिल्हाधिकारी जलज शर्मा

0
‘घरोघरी तिरंगा’ अभियानात नागरिकांनी सहभाग नोंदवावा – जिल्हाधिकारी जलज शर्मा

धुळे, दि. 5 (जिमाका वृत्तसेवा) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त धुळे जिल्ह्यात 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा¬ अर्थात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येणार आहे. या कालावधीत शासकीय, निमशासकीय कार्यालये, आस्थापना, व्यापारी, संस्थांसह 4 लाख 9 हजार 271 घरांवर तिरंगा ध्वज फडकविण्यात येणार आहे. धुळे जिल्ह्यासाठी पुरेसे ध्वज उपलब्ध होणार असून या अभियानात धुळे जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा¬ अर्थात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या तयारीची माहिती देण्यासाठी आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त देवीदास टेकाळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, पोलिस उपअधीक्षक ईश्वर कातकडे, महागनरपालिकेच्या उपायुक्त डॉ संगीता नांदुरकर, उपजिल्हाधिकारी तथा अमृत महोत्सव अभियानाचे नोडल अधिकारी गोविंद दाणेज आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी सांगितले, ‘घरोघरी तिरंगा¬ अर्थात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यासाठी विभागप्रमुखांची यापूर्वीच बैठक घेण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना नियोजनाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महानगरपालिका, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ‘घरोघरी तिरंगा¬ अर्थात ‘हर घर तिरंगा’ अभियानाचे नियोजन सुरू असून ते पूर्णत्वास आले आहे. या कालावधीत घरांवर तीन दिवस तिरंगा ध्वज फडकविता येईल. मात्र, शासकीय कार्यालयांना ध्वज संहितेचे पालन करावे लागेल. तसेच घरांवरील तिरंगा ध्वज 15 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी सन्मानाने उतरवून घ्यावे लागतील.

धुळे जिल्ह्यात चार लाख 9 हजार 271 घरे, 4 चार हजार 388 दुकाने, तीन हजार 458 व्यापारी संस्था, एक हजार 63 हॉटेल, एक हजार 870 शैक्षणिक संस्था, 12 हजार 346 बचत गट, तर दोन हजार 276 अंगणवाडी केंद्र आहेत. तेथे संबंधितांनी तिरंगा ध्वज फडकावयाचा आहे. ‘घरोघरी तिरंगा¬ अर्थात ‘हर घर तिरंगा’ अभियानासाठी तिरंगा ध्वज विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महानगरपालिका, ग्रामपंचायतस्तरावर ध्वज उपलब्धतेबाबत कार्यवाही सुरू आहे. शासनाच्या माध्यमातून 1 लाख 28 हजार 618 ध्वज उपलब्ध होणार आहेत. त्यात 70 हजार ध्वज जिल्हा परिषद, 40 हजार धुळे महानगरपालिकेसाठी, तर 18 हजार 618 ध्वजांची नगरपालिका, नगरपंचायतस्तरावर मागणी आहे. टपाल कार्यालयात आठ हजार ध्वज विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत.

‘घरोघरी तिरंगा¬ अर्थात ‘हर घर तिरंगा’ या अभियानाच्या जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात मॅरेथॉन, सायकल, चालणे यासह विविध स्पर्धांचा समावेश आहे. या उपक्रमाची दखल क्रीडा विभागाच्या आयुक्तांनी घेतली असून त्यांनी अशा प्रकारचे उपक्रम सर्वच जिल्ह्यात आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असेही जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी सांगितले.

महानगरपालिका आयुक्त श्री. टेकाळे यांनी सांगितले, धुळे महानगरपालिकेतर्फे नियोजन करण्यात आले आहे. एकूण 71 हजार ध्वज प्राप्त होणार आहेत. सहा ठिकाणी ध्वज वितरण केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. या कालावधीत प्रभाग अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच 12 ऑगस्ट 2022 रोजी धुळे शहरातून रॅली काढण्यात येईल. तसेच कचरा संकलन करणाऱ्या वाहनांवर जिंगल्सच्या माध्यमातून जनजागृती सुरू आहे. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. माळोदे यांनी सांगितले, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यात 300 जणांनी रक्तदान केले. जिल्हा परिषदेस 60 हजार ध्वज प्राप्त झाले असून आणखी 50 हजार ध्वज प्राप्त होणार आहेत. याशिवाय स्वच्छता मोहीम, विविध स्पर्धा आदी उपक्रम सुरू आहेत. ‘घरोघरी तिरंगा¬ अर्थात ‘हर घर तिरंगा’ या अभियानात लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी सहभागी होतील, असे नियोजन करण्यात आले आहे. पोलिस उपअधीक्षक श्री. कातकडे यांनी सांगितले, ‘घरोघरी तिरंगा¬ अर्थात ‘हर घर तिरंगा’ या अभियानाच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलाने नियोजन केले आहे. सर्व पोलिस ठाण्यांच्या आवारात वृक्षारोपण करण्यात येईल. तसेच शस्त्रप्रदर्शन भरविण्यात येईल. महाराष्ट्र पोलिस दलातर्फे काढण्यात आलेल्या मुंबई- दिल्ली सायकल रॅलीत 11 पैकी सात जण धुळे पोलिस दलातील आहेत. तसेच विविध स्पर्धा घेण्यात येतील. पोलिस दलाच्या बँण्ड पथकाच्या माध्यमातून देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

000