मुंबई, दि. 21 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घरोघरी तिरंगा ( हर घर तिरंगा) उपक्रम सर्व विभागांनी समन्वयाने यशस्वी करा, अशा सूचना मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी दिल्या.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव याअंतर्गत घरोघरी तिरंगा उपक्रमाचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात बैठक झाली. मुख्य सचिव यांच्या दालनात झालेल्या बैठकीस अपर मुख्य सचिव राजेश कुमार, अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, प्रधान सचिव नंदकुमार, प्रधान सचिव मनीषा वर्मा, प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, प्रधान सचिव सोनिया सेठी, वन विभागाचे प्रधान सचिव वेणू गोपाल रेड्डी, सचिव सुमंत भांगे, सचिव रणजित सिंह देओल, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय आदी उपस्थित होते.
सर्व विभागांनी आपल्या अधिनस्त कार्यालयात, आस्थापनामध्ये हा उपक्रम प्रभावीपणे राबवावा. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व इमारती, अधिकारी, कर्मचारी वसाहतीत तिरंगा फडकवला जाईल याबाबतची तयारी केली जावी, अशा सूचना मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी दिल्या.
घरोघरी तिरंगा उपक्रमाबाबत जाणीव जागृती करावी. लोकांना उपक्रमाबाबत माहिती व्हावी यासाठी विविध माध्यमांतून माहिती शिक्षण संवाद उपक्रम राबविण्यात यावेत, अशा सूचनाही मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी दिल्या.
घरोघरी तिरंगा उपक्रमाचे समन्वयक आणि ग्राम विकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी घरोघरी तिरंगा उपक्रमाच्या तयारीबाबत सादरीकरण केले.
विभागाच्या जिल्हा आणि प्रादेशिक स्तरावरील कार्यालयात तिरंगा फडकवला जावा. शालेय शिक्षण, सहकार, महसूल कृषी विभागाने अधिक प्रभावीपणे उपक्रमाची अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे, असे सांगितले.
सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय यांनी घरोघरी तिरंगा उपक्रमाच्या नियोजन बाबत माहिती दिली. त्यांनी उपक्रमाच्या प्रसिद्धीसाठी केलेल्या जिंगल्स आणि क्रिएटीव्ह याबाबत माहिती दिली.
यावेळी एसटी महामंडळाचे कार्यकारी संचालक शेखर चन्ने, सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, गृह विभाग, आदिवासी विकास विभाग, कृषी विभाग यांचे अधिकारी उपस्थित होते.
****
रवींद्र राऊत/विसंअ/21.7.22