भारताच्या स्वतंत्रतेचे आणि अखंडतेचे प्रतीक म्हणजे आपला राष्ट्रध्वज. आपल्या देशाचा तिरंगा हा प्रत्येक भारतीयांचा अभिमान आहे. त्याबद्दल प्रत्येकाच्या मनात आदर असणे स्वाभाविक आहे. भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या गौरवशाली पर्वानिमित्त जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, क्रांतिकारक तसेच स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे या उद्देशाने यावर्षी ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ देशात साजरा करण्यात येत आहे.त्यानिमित्त केंद्र शासनामार्फत ऑगस्ट महिन्यात संपूर्ण भारत देशात एक विशेष मोहीम राबविली जाणार आहे. ती म्हणजे, ‘हर घर तिरंगा’ मोहीम. त्याच अनुषंगाने स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट पर्यंत राज्यात ‘घरोघरी तिरंगा अभियान’ राबविण्यात येत आहे. घरोघरी तिरंगा फडकवण्यासाठी या अभियानात सर्वांनी सहभागी होऊन देशाविषयीचा आदर व्यक्त करुया… |
22 जुलै 1947 रोजी घटना समितीच्या बैठकीत ‘तिरंगा ध्वज’ भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकृत करण्यात आला. त्या संबंधीचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरु यांनी मांडला होता. एकाला एक लागून असलेल्या आडव्या समान प्रमाणाच्या तीन पट्टयांचा राष्ट्रध्वज आहे. वरती केसरी, मध्यभागी पांढरा व खालच्या बाजूला हिरवा अशा क्रमाने हे तीन रंग आहेत. पिंगली व्येंकय्या यांनी तिरंग्याची रचना केली आहे. राष्ट्रध्वजाच्या उंचीचे व लांबीचे प्रमाण 2:3 असे आहे. तसेच राष्ट्रध्वज खादी अथवा रेशमाच्या कापडाचाच बनवला जावा.
राष्ट्रध्वजाचा आदर
देशभक्ती म्हणजे देशाबद्दल प्रेम आणि आदराची भावना. देशभक्त देशावरील नि:स्वार्थ प्रेम आणि अभिमानासाठी ओळखले जातात. देशप्रेमी सतत देशाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यतत्पर असतात. देशासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी असते. आपल्या देशातही अनेक देशप्रेमी आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमात सर्वांना आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवायचा आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला देश उभारणीत आणि स्वातंत्र्य सेनानींनी दिलेल्या महान योगदानाप्रती असलेली बांधिलकी आणि तळमळ दाखवण्याची ही संधी आहे.
आपला राष्ट्रध्वज ; आपला अभिमान
तिरंग्याशी आपले नाते वैयक्तीक न राहता ते अधिक दृढ व्हावे असे शासनाचे मत आहे. भारतीय राष्ट्रध्वज संपूर्ण राष्ट्रासाठी अभिमानाचे प्रतिक आहे. सर्वांनी ध्वजाचा पूर्ण आदर करावा. या उपक्रमामुळे लोकांना त्यांच्या घरामध्ये राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. सर्वांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करणे ही या उपक्रमामागील संकल्पना आहे.
13 ते 15 ऑगस्ट या दरम्यान ‘घरोघरी तिरंगा’ अभियानात सहभागी होण्यासाठी आपल्या राष्ट्रध्वजाची मागणी ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, स्वस्त धान्य दुकान, पोस्ट ऑफीस यांच्याकडे नोंदवू शकता किंवा इतर ठिकाणावरुनही राष्ट्रध्वज खरेदी करु शकता. राष्ट्रध्वज कुठल्याही परिस्थितीत फाटलेला अथवा चुरगळलेला वापरु नये. तिरंगा फडकवताना नेहमी केसरी रंग वरच्या बाजूने व हिरवा रंग खालच्या बाजूने राहील याची दक्षता घ्यावी. ‘घरोघरी तिरंगा हा उपक्रम साजरा करण्याबाबत मार्गदर्शक आणि सर्वसाधारण सूचना सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या mahaamrut.org/Download.aspx व mahaamrut.org या वेबसाईटवर उपलब्ध करुन दिलेल्या आहेत.
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस यंत्रणा, शाळा व महाविद्यालये, परिवहन, आरोग्य केंद्रे, स्वस्त धान्य दुकाने, सहकारी संस्था अशा सर्वसामान्य नागरिकांशी निगडीत यंत्रणांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. स्वातंत्र्यानंतर देश सातत्त्याने स्वावलंबनाच्या मार्गावर पुढे जात आहे. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त सुरु झालेला ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ हे स्वावलंबनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. हा उपक्रम 15 ऑगस्ट 2023 पर्यंत साजरा करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. त्यात सर्वांनी उत्साहाने सहभागी होऊन हा उपक्रमाच्या माध्यमातून देशभक्तीला उभारी द्यावी.
0000
संकलन : विभागीय माहिती कार्यालय, पुणे