भारतात सर्वप्रथम केरळ राज्यात ‘मंकी पॉक्स’ आजाराचे रुग्ण आढळले आहेत. सर्वसाधारणपणे मंकी पॉक्स हा सौम्य स्वरूपाचा आजार असून रोगी २ ते ४ आठवड्यात बरा होतो. तथापि, लहान मुलांमध्ये किंवा इतर काही रुग्णांमध्ये तो गंभीर स्वरूप धारण करु शकतो. या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या दृष्टीने या आजाराचे सर्वेक्षण, प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रथम या आजाराविषयी जाणून घेणे आवश्यक आहे.
मंकी पॉक्स हा एक विषाणूजन्य आजार असून १९७० मध्ये या आजाराचा पहिला रुग्ण कांगो या देशात आढळला होता. ‘ऑर्थोपॉक्स व्हायरस’ या डीएनए प्रकारच्या विषाणूमुळे हा आजार होतो. तसेच काही प्रकारच्या खारी आणि उंदरामध्ये विषाणू आढळून आल्यामुळे हे प्राणी या विषाणूचा नैसर्गिक स्त्रोत आहेत.
आजाराची लक्षणे: ताप येणे, लसिका ग्रंथींना (कानामागील, काखेतील, जांघेतील लसिका ग्रंथी) सूज येणे, डोकेदुखी, अंगदुखी, थंडी वाजणे, घाम येणे, घसा खवखवणे आणि खोकला या प्रकारची लक्षणे रुग्णामध्ये आढळून येतात. कुपोषण, कृमी प्रादुर्भाव अणि प्रतिकार शक्ती कमी असलेल्या समूदायामध्ये मंकीपॉक्स गंभीर स्वरुप धारण करु शकतो.
कांजण्या, नागीण, गोवर, सिफिलिस दुसरी स्टेज, हँड, फूट माऊथ डिसीज इत्यादी मंकी पॉक्स सदृश इतर आजार आहेत. मंकी पॉक्स आजारामुळे न्यूमोनिया, सेप्सिस, मेंदूतील गुंतागुंत, दृष्टीपटलाचा संसर्ग (यामध्ये दृष्टी जाऊदेखील शकते) आदी गुतांगूत निर्माण होऊ शकते. या आजाराचा मृत्युदर सर्वसाधारणपणे ३ ते ६ टक्के आहे.
आजाराचा कालावधी : आजाराचा अधिशयन कालावधी ६ ते १३ दिवस असला तरी हा कालावधी ५ ते २१ दिवसांपर्यंत असू शकतो. संसर्गजन्य कालावधी अंगावर पुरळ उठण्यापूर्वी १ ते २ दिवसांपासून ते त्वचेवरील फोडांवरील खपल्या पडेपर्यंत किंवा ते पूर्णपणे बरे होईपर्यंत असतो. असा बाधित रुग्ण इतर व्यक्तींसाठी संसर्गजन्य रुग्ण असतो.
आजाराचा प्रसार: व्यक्ती-व्यक्तीमध्ये थेट शारीरिक संपर्क येतांना शरीर द्रव, लैंगिक संपर्क किंवा जखम, घाव यातील स्त्राव, तसेच बाधित व्यक्तींनी वापरलेल्या कपड्यापासून, जास्तीत जास्त वेळ बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यास त्या व्यक्तीच्या श्वसन मार्गातून बाहेर पडणाऱ्या मोठ्या थेंबावाटे इतर व्यक्तीला संसर्ग होते. बाधित प्राणी चावल्यामुळे किंवा बाधित प्राण्याचे मांस न शिजवता खाण्यामुळेदेखील या आजाराचा संसर्ग होऊ शकतो. मधुमेह, रक्तदाब, प्रतिकार कमी असलेल्या व्यक्तीला मंकी पॉक्स आजार होण्याची शक्यता जास्त आहे.
संशयीत रुग्णांची ओळख: मागील ३ आठवड्यात मंकी पॉक्स बाधित देशांमध्ये किंवा राज्यामध्ये प्रवास केलेल्या व्यक्तीमध्ये शरीरावर अचानक पुरळ उठणे, सूजलेल्या लसिका ग्रंथी, ताप, डोकेदुखी, अंगदुखी, प्रचंड थकवा अशी लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तीला संशयित रुग्ण म्हणून ओळखले जाते.
संभाव्य रुग्णः ज्या कारणाने या आजाराचा प्रसार, संसर्ग होतो अशा प्रकारचा संपर्क संशयित रुग्णांशी आलेली व्यक्ती संभाव्य रुग्ण मानण्यात येते.
निश्चित निदान तंत्र : प्रयोगशाळेत पी.सी.आर. चाचणी अथवा सिक्वेन्सिंगद्वारे या आजाराचे निदान केले जाते. मंकी पॉक्सचा प्रसार रोखण्यासाठी निदान झालेल्या रुग्णाच्या कपड्यांशी अथवा अंथरुण-पांघरुणाशी संपर्क येऊ न देणे, हातांची स्वच्छता ठेवणे, आरोग्य संस्थांमध्ये मंकी पॉक्स रुणांवर उपचार करताना पीपीई किटचा वापर करणे आदी काळजी घ्यावी.
मंकी पॉक्स सर्वेक्षण : मंकी पॉक्सचा एक रुग्णदेखील साथरोगाचा उद्रेक असल्यास पूरक आहे. अशा प्रत्येक रुग्णाचे अन्वेषण शीघ्र प्रतिसाद पथकामार्फत सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. या रुग्णांचे रक्त, रक्तद्रव, फुटकळ्यातील द्रव आणि मूत्र हे नमुने संकलित करुन पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थतेत पुढील चाचणीसाठी पाठविण्यात येतील. प्रत्येक बाधित रुग्णाच्या निकट संपर्कातील व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. संशयित रुग्णांना विलगीकरणात उपचारासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्यात येणार आहे.
रुग्ण व्यवस्थापन आणि विलगीकरण : मंकी पॉक्स रुग्णाला विलगीकरण कक्षात किंवा घरच्या घरी वेगळ्या खोलीत ठेवावे. या ठिकाणी स्वतंत्र वायुविजन व्यवस्था असावी. रुग्णाने त्रिस्तरीय मुखपट्टीचा (ट्रिपल लेयर मास्क) वापर करावा. कातडीवरील पुरळ, फोड नीट झाकण्यासाठी त्याने लांब बाह्याचे शर्ट आणि पायघोळ पॅन्ट असा पोषाख वापरावा. जोपर्यंत रुग्णाच्या कातडीवरील पुरळ, फोड पूर्णपणे बरे होत नाहीत आणि त्यावरील खपल्या गळून जात नाही तो पर्यंत त्याला विलगीकरणात ठेवावे. पुरेशा प्रमाणात हायड्रेशन मिळेल याची दक्षता घ्यावी.
तज्ञांचा सल्ला: डोळ्यात वेदना होणे अथवा दृष्टी अधू होणे, श्वास घ्यायला त्रास होणे किंवा छातीत दुखणे, शुद्ध हरवणे, झटके येणे, लघवीचे प्रमाण कमी होणे, रुग्ण तोंडावाडे अन्न-पाणी न घेणे, रुग्णास प्रचंड थकवा जाणवणे, अशा स्वरुपाची लक्षणे रुग्णामध्ये आढळल्यास तात्काळ तज्ञांचा सल्ला घ्यावा. अशा रुग्णांना पुढील योग्य उपचारांसाठी संदर्भित केले जाणार आहे.
निकट सहवासितांचा शोध व सनियंत्रण: निकट सहवासितामध्ये मंकी पॉक्ससारखी काही लक्षणे आढळून येत आहेत का हे पाहण्यासाठी बाधित रुग्णाशी त्याचा संपर्क आल्यापासून पुढील २१ दिवस दैनंदिन पाठपुरावा करणे आवश्यक आहे. त्याला ताप आल्यास त्याचा प्रयोगशाळा नमुना घेतला जावा. लक्षणे नसली तरीदेखील या सर्वेक्षण कालावधीमध्ये निकटसहवासिताने रक्तदान, अवयवदान अशा बाबी करु नयेत. निकटसहवासित शाळकरी मुलांना सर्वेक्षण कालावधीमध्ये शाळेत जाऊ देऊ नये. स्वरुपाच्या आदी उपाययोजना या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी महत्वाच्या ठरतात.
————
नागरिकांनी घाबरुन जाऊ नये परंतु काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कोरोना विषाणूच्या वेळी ज्याप्रमाणे आपण नियमांचे पालन करीत होतो. त्याचप्रमाणे सर्वांनी नियमांचे पालन करावे. आपल्या भागात एखादी मंकी पॉक्ससदृश लक्षणे असलेली व्यक्ती आढळल्यास तात्काळ विलगीकरण करावे. तसेच जवळच्या आरोग्य केंद्रात दाखल करावे. आजाराचा प्रसार होऊ नये यासाठी सर्वांनी खबरदारीचा उपाय म्हणून नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. – डॉ. अशोक नांदापूरकर जिल्हा शल्यचिकित्सक, पुणे
————
संकलन- जिल्हा माहिती कार्यालय, पुणे