मुंबई, दि. ९ जून : शिवसृष्टी प्रकल्पातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, विचार आणि स्वराज्याची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचणार आहे. या प्रकल्पामुळे घोडबंदर किल्ल्याच्या परिसराचा विकास होऊन पर्यटनाला चालना मिळेल, असे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. मंत्रालयातील दालनात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या समवेत मिरा-भाईंदर, जि. ठाणे येथे उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टी प्रकल्पाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश र. गटणे, पर्यटन विभागाचे उपसचिव विजय पोवार, पर्यटन संचालनालयाचे संचालक मंगेश जोशी, मिरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सदर बैठकीत शिवसृष्टी प्रकल्पाच्या विविध घटकांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रकल्पासाठी लागणारा शंभर टक्के निधी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सर्व वैधानिक परवानग्या मिरा-भाईंदर महानगरपालिकेमार्फत प्राप्त करून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळास उपलब्ध करून देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
प्रकल्पाची कामे नियोजित कालावधीत आणि उच्च दर्जाने पूर्ण करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना मंत्री देसाई यांनी दिल्या. याशिवाय, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तो मिरा-भाईंदर महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात येणार असून, त्याच्या देखभाल, दुरुस्ती व व्यवस्थापनाची संपूर्ण जबाबदारी महानगरपालिकेकडे सोपविण्यात येणार आहे. घोडबंदर किल्ल्याच्या परिसराचा पर्यटनदृष्ट्या सर्वांगीण विकास करून पर्यटकांसाठी दर्जेदार सुविधा निर्माण करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी विचार, इतिहास आणि स्वराज्याची परंपरा जतन करून ती नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी शिवसृष्टी प्रकल्प महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
००००
संध्या गरवारे/विसंअ






















WhatsApp