Home ताज्या बातम्या घोरपडी रेल्वे क्रॉसिंगवर वाहतूक कोंडीतून नागरिकांना मिळणार दिलासा; उड्डाणपुलाचे भूमिपूजन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते

घोरपडी रेल्वे क्रॉसिंगवर वाहतूक कोंडीतून नागरिकांना मिळणार दिलासा; उड्डाणपुलाचे भूमिपूजन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते

0

घोरपडी रेल्वे क्रॉसिंगवर वाहतूक कोंडीतून नागरिकांना मिळणार दिलासा; उड्डाणपुलाचे भूमिपूजन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते

पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावरील घोरपडी रेल्वे क्रॉसिंगवर प्रस्तावित उड्डाणपुलाचे भूमिपूजन रविवारी सायंकाळी 5 वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

याबद्दल महापौर मुक्ता टिळक यांनी शनिवारी माहिती दिली. स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे, स्थानिक नगरसेवक उमेश गायकवाड, नगरसेविका लता धायरकर, हिमाली कांबळे, मंगला मंत्री यावेळी उपस्थित होत्या.
महापौर म्हणाल्या, “मुंढवा, खराडी, कल्याणीनगरकडे जाणारा हा महत्त्वाचा रस्ता आहे. मात्र, घोरपडी गावात रस्ता अरूंद असल्याने रेल्वे क्रॉसिंगवर दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होते.

या रेल्वे मार्गावरून तब्बल 104 गाड्या जात असल्याने तितक्‍या वेळा हा रस्ता बंद ठेवावा लागतो. त्यामुळे हा पूल प्रस्तावित होता. मात्र, लष्कराची संमती नसल्याने तो होत नव्हता. तत्कालिन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या रस्त्यासाठी लष्कराची “एनओसी’ देत हा प्रश्‍न मार्गी लावला. त्यानंतर अतिक्रमणे काढून तसेच रेल्वे आणि लष्कराची जागा ताब्यात घेऊन या पुलाचे काम सुरू होणार आहे.’

यासाठी स्थानिक आमदार दिलीप कांबळे यांनी वारंवार पाठपुरावा करत महापालिकेत बैठका घेतल्या. या पुलाच्या पहिल्या वर्षाच्या कामासाठी स्थायी समितीने 19 कोटींच्या खर्चास मान्यताही दिलेली आहे. याच भागातील पुणे-मिरज रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलाचे कामही लवकरच सुरू होईल.
– सुनील कांबळे, स्थायी समिती अध्यक्ष, मनपा.