मुंबई, दि. 19 : चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर, वरोरा व भद्रावती तालुक्यातील पुरात अडकलेल्या 700 ते 800 नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत असून एसडीआरएफ ची एक टीम व स्थानिक टीमच्या सहाय्याने वर्धा नदी पात्रालगतच्या गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत आहे.
नागपूर विभागात गडचिरोली जिल्ह्यात सध्याची परिस्थिती आटोक्यात आहे. परंतु आज सायं 4 वा. नंतर प्राणहिता नदी पात्रात पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असून, पुन्हा पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात एसडीआरएफच्या दोन टीम तैनात करण्यात आल्या आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात सध्या परिस्थिती आटोक्यात असली तरी वर्धा नदीच्या पात्रात पाण्याची पातळी वाढत आहे. मूल तालुक्यातील 12 लोक शेतात अडकले असून, त्यांचे बचाव कार्य सुरू आहे. वरोरा व भद्रावती येथील 700 ते 800 नागरिकांचे स्थलांतरण करण्यात येत आहे. SDRF ची एक टीम व स्थानिक टीमच्या सहाय्याने वर्धा नदी पात्रालगतच्या गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत आहे.
वर्धा जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 136 मिमी एवढा सरासरी पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील हिंगणघाट, समुद्रपूर, सेलू तसेच देवळी या जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे काही नागरिक पुराच्या पाण्यात अडकले असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या बचावाकरिता एनडीआरएफची एक टीम व एसडीआरएफची एक टीम तैनात करण्यात आली आहे. आतापर्यंत 397 लोकांना 10 निवारा केंद्रात सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.
कोकण विभागात रत्नागिरी जिल्ह्यात सद्यस्थितीत पूर परिस्थिती नाही. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट हा दिनांक 30 जुलै 2022 पर्यंत सकाळी 06 वा. पासून ते सायंकाळी 07 वा. पर्यंत अवजड वाहनाची एकेरी वाहतूक सुरु ठेवण्यात आली असून, सायंकाळी 07 वा. ते 06 वा. पर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. तसेच राजापूर-कोल्हापूर यांना जोडणाऱ्या अनुस्कुरा घाटातील वाहतूक दरड कोसळल्याने एकेरी सुरु ठेवण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात दोन एनडीआरएफ (NDRF)च्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.
राज्यातील नुकसानीची सद्यस्थिती
राज्यात पुरामुळे 28 जिल्हे व 289 गावे प्रभावित झाली असून 83 तात्पुरती निवारा केंद्र तयार करण्यात आली असून आतापर्यंत 12 हजार 233 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. आतापर्यंत अतिवृष्टीमुळे 108 नागरिकांनी आपला जीव गमावला आहे तर 189 प्राणी दगावले आहेत.पावसामुळे आतापर्यंत 44 घरांचे पूर्णत: तर 1368 घरांचे अशंत: नुकसान झाले आहे.
राज्यात राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या 19 तुकड्या तैनात
मुंबई (कांजूरमार्ग 1, घाटकोपर 1) -2, पालघर -1, रायगड- महाड- 2, ठाणे-2, रत्नागिरी-चिपळूण -2, कोल्हापूर-2, सातारा-1, वर्धा -1 राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) एकूण 13 तुकड्या तैनात आहेत. तर नांदेड-1, गडचिरोली -2, वर्धा-1, चंद्रपूर-1, जळगाव-1 अशा एकूण पाच राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या तुकड्या तैनात केलेल्या आहेत.
राज्य आपत्ती मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून आज सकाळी 12 वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार हा अहवाल प्रसिद्धीसाठी देण्यात येत आहे.
*****
संध्या गरवारे/विसंअ/19.7.22