Home ताज्या बातम्या चिंता वाढली! ‘डेल्टा’ विषाणू अधिक संसर्गजन्य

चिंता वाढली! ‘डेल्टा’ विषाणू अधिक संसर्गजन्य

0
चिंता वाढली! ‘डेल्टा’ विषाणू अधिक संसर्गजन्य

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

डेल्टा विषाणू संसर्गाच्या तीव्रतेसंदर्भात वेगवेगळ्या प्रकारचे वैद्यकीय निष्कर्षांवर चर्चा होत असताना इंडियन मेडिकल जर्नलने लसीकरण आणि संसर्गग्रस्त व्यक्तींचा पाठपुरावा व तातडीने वैद्यकीय उपचार हे डेल्टाच्या उपचारामध्ये अतिशय महत्त्वाचा टप्पा असल्याचे स्पष्ट केले आहे. या विषाणूने तेरावेळा त्याच्या अस्तित्त्वामध्ये बदल दर्शवले आहे. त्यातील सात हे एस प्रोटीन स्वरूपाचे असल्याचे या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. अल्फा विषाणूच्या तुलनेमध्ये डेल्टा पन्नास टक्क्यापेक्षा अधिक संसर्गजन्य असून त्यामध्ये अँटिबॉडीमधून सुटून जाण्याचीही क्षमता असल्याचे दिसून येते.

डेल्टा प्लस या विषाणूला एवाय १ असेही संबोधण्यात येते. भारताखेरीज अन्य नऊ देशांमध्ये याचे अस्तित्व दिसून आले आहे. मोनोक्लोनल अँटिबॉडी थेरपीला हा विषाणू प्रतिरोध करतो. या विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण आणि बाधित रुग्णांचा पाठपुरावा हे दोन अतिशय महत्त्वाचे मार्ग असल्याचे हा अभ्यास विषद करतो. या विषाणूची संसर्गक्षमता अधिक असल्यामुळे संसर्गित व्यक्तीला शोधणे, विलगीकरणामध्ये ठेवणे गरजेचे आहे. अधिकाधिक लोकसंख्येमध्ये या विषाणूचा संसर्ग फैलावण्यापूर्वी त्याची साखळी तोडणे अतिशय गरजेचे आहे. त्यामुळे डेल्टा विषाणूचा अधिक प्रादूर्भाव म्हणजे विषाणूच्या नव्या स्वरूपामध्ये परावर्तित होण्याची क्षमता, असे या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.

प्रत्येक विषाणूच्या स्वरुपामध्ये बदल होत असतो, मात्र त्याची संसर्गक्षमता किती आहे हा काळजीचा विषय असतो. करोना विषाणू व त्याच्या परावर्तित स्वरूपाच्या अभ्यासासाठी आतापर्यंत ९० वेगवेगळ्या प्रकारच्या लशींच्या उपयुक्ततेसंदर्भात अभ्यास सुरू आहे. त्यापैकी २७ या अंतिम टप्प्यांपर्यंत आल्या आहेत.

Source link