Home बातम्या आंतरराष्ट्रीय चीनचे नौदल पाकिस्तानमध्ये स्वतःचा तळ तयार

चीनचे नौदल पाकिस्तानमध्ये स्वतःचा तळ तयार

ग्वादर: चीनचे नौदल पाकिस्तानमध्ये स्वतःचा तळ तयार करत आहे. हा तळ बलुचिस्तानमधील ग्वादर येथे तयार होत आहे. ग्वादरचे बंदर विकसित करण्यासाठी पाकिस्तानने चीनसोबत एक करार केला आहे. चीनच्या मदतीने व्यावसायिक वापरासाठी बंदर तयार करत असल्याचा दावा करत पाकिस्तानने ग्वादर चीनला देऊन टाकले आहे.

चिनी नौदलाच्या तळाचे पुरावे

ग्वादरमध्ये चिनी नौदलाने केलेल्या बांधकामाची छायाचित्र (फोटो) आणि नकाशे संरक्षणाच्या क्षेत्रात वार्तांकन करणाऱ्या फोर्ब्स या मासिकाच्या हाती आले आहेत. यात चिनी नौदलाच्या तळाचे अनेक ठोस पुरावे दिसत आहेत. नौदलाचा तळ विकसित करण्याआधी चीनने संपूर्ण परिसराला वेढणारी कम्पाउंड वॉल बांधली आहे. या परिसरात कडेकोट बंदोबस्ताची व्यवस्था आहे.

अनेक इमारतींचे बांधकाम सुरू

चीनने नौदल तळासाठी शस्त्रसाठ्याची लहान-मोठी गोदामं, तेलसाठा अशी मोठी व्यवस्था केली आहे. तळावर नौसैनिक आणि अधिकाऱ्यांच्या वाहनांसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. जहाजांची गोदी, देखभालीच्या कामाची व्यवस्था, कार्यालयीन कामाची व्यवस्था, नौसैनिकांच्या राहण्याची व्यवस्था, हॉस्पिटल आणि नौसैनिकांच्या मनोरंजनासाठी उद्यान, मैदान आणि थिएटर तयार करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या आकारांच्या इमारतींचे बांधकाम केले जात आहे. या परिसरात काँक्रिटचे दर्जेदार रस्ते तयार केले जात आहेत. ग्वादर बंदर रस्त्याद्वारे चीनच्या वन बेल्ट वन रोड (OBOR) योजनेच्या मार्गाला जोडण्याची तयारी सुरू आहे.

चीनचा हिंद महासागरात दबदबा निर्माण करण्यासाठी

जिबुती येथील नौदल तळाप्रमाणेच मोठा तळ विकसित करण्याचे काम सुरू असल्याचे मत संरक्षणाच्या क्षेत्रात वार्तांकन करणाऱ्या फोर्ब्स या मासिकाच्या लेखातून व्यक्त करण्यात आले आहे. ग्वादरचा तळ पूर्ण क्षमतेने कार्यरत झाल्यावर चीन साऊथ चायना सी प्रमाणे हिंद महासागरातही स्वतःचा दबदबा निर्माण करू शकेल, अशी शक्यता मासिकातून व्यक्त करण्यात आली आहे.

प्रकल्प चायना कम्युनिकेशन्स कंस्ट्रक्शन कंपनीच्या हाती

चीनसाठी बंदरांचा विकास करणारी एक मोठी कंपनी ग्वादरच्या कामाचे नेतृत्व करत आहे. चायना कम्युनिकेशन्स कंस्ट्रक्शन कंपनी या योजनेवर काम करत आहे. हे बंदर विकसित झाल्यावर चीनसाठी सागरी मार्गाने आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना देणे आणखी सोपे होणार आहे. ग्वादर बंदर पूर्ण क्षमतेने कार्यरत झालेले नाही. तिथे अद्याप काम सुरू आहे.

चीनच्या नादी लागल्याने पाकिस्तान आर्थिक संकटात

चीनने पाकिस्तानमध्ये ग्वादर बंदर आणि वन बेल्ट वन रोड योजनेच्या कामासाठी अब्जावधींचा खर्च केला आहे. चीन करत असलेल्या कामांना पाकिस्तानमधील नागरिकांचा हळू हळू विरोध सुरू झाला आहे. चीनकडून उचललेल्या पैशांमुळे पाकिस्तान कर्जाच्या ओझ्याखाली पुरता दबला आहे. पाकिस्तानला करातून मिळणाऱ्या उत्पन्नातील ६० टक्क्यांपेक्षा जास्त पैसा एकट्या चीनला कर्जाचे हप्ते म्हणून दरमहा फेडावा लागत आहे. शिवाय चीनच्या प्रकल्पांमध्ये पाकिस्तानच्या नागरिकांना रोजगार मिळेल, असे सुरुवातीला सांगण्यात आले. प्रत्यक्षात या प्रकल्पांमुळे पाकिस्तानच्या नागरिकांना रोजगाराच्या नगण्य संधी मिळाल्या आहेत. त्यामुळे पाकिस्तानमध्ये चीनच्या प्रकल्पांना विरोध वाढत आहे. पण कर्जाच्या ओझ्यात दबलेल्या पाकिस्तान सरकारसाठी चीनचे काम थांबवणे अशक्य झाले आहे; असेही फोर्ब्स या मासिकाने आपल्या लेखात नमूद केले आहे.