कोल्हापूर : ‘चॉकलेट डे’ कार्यक्रमात चॉकलेट घेण्यास नकार देणाऱ्या विद्यार्थिनीला शिवीगाळ करणाऱ्या विद्यार्थ्याला तिच्या नातेवाइकांनी बेदम मारहाण करण्याची घटना कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयात घडली.
दरम्यान, महाविद्यालयाबाहेरील तरुणांनी येऊन आवारात गोंधळ घातल्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयासमोर गुरुवारी दिवसभर ठिय्या आंदोलन करून संबंधित युवकांवर कारवाईची मागणी केली. यामुळे महाविद्यालयाच्या आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पुढील आठवड्यात कृषी महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन असल्याने त्याबाबत महाविद्यालयात गेले काही दिवस विविध ‘डे’ साजरे करण्यात येत आहेत. बुधवारी (दि. १२) सायंकाळी ‘चॉकलेट डे’ साजरा करताना तृतीय वर्षातील एका विद्यार्थ्याने प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीला चॉकलेट देण्याचा प्रयत्न केला.
संबंधित विद्यार्थिनीने चॉकलेट घेण्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्याने त्या विद्यार्थिनीस शिवीगाळ करून अर्धवट खाल्लेले चॉकलेट तिच्या अंगावर फेकले. ही बाब तिने आपल्या मावसभावास फोन करून सांगितली. संबंधित भावाने चार-पाच युवकांना घेऊन तातडीने महाविद्यालयाच्या आवारात येऊन त्या विद्यार्थ्यास बेदम मारहाण केली.
गुरुवारी सकाळी ते सर्व तरुण पुन्हा महाविद्यालयाच्या आवारात आले; त्यामुळे परिसरात गोंधळ माजला. महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी एकत्र येऊन त्यांनी महाविद्यालयाबाहेरील युवकांची महाविद्यालयात सुरू असणारी गुंडागर्दी थांबवावी, अशी मागणी करीत महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारात ठिय्या आंदोलन करून निदर्शने केली. तसेच महाविद्यालयीन कामकाज बंद पाडले. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
महाविद्यालयाच्या प्रशासनाने तातडीने संबंधित पीडित विद्यार्थिनी, तिचे पालक तसेच संबंधित विद्यार्थी व त्याचे सहकारी यांची सुमारे दोन तास स्वतंत्रपणे चौकशी केली. त्यानंतर दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर दुपारी चार वाजता संबंधित आंदोलन विद्यार्थ्यांनी स्थगित केले.
दुचाकीची मोडतोड
गुरुवारी सकाळी पीडित विद्यार्थिनीचे नातेवाईक पुन्हा महाविद्यालयाच्या आवारात आल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचे समजते. त्यानंतर नातेवाईक दुचाकी वाहन तेथेच सोडून निघून गेले, युवकांनी त्या दुचाकीची मोडतोड करून ती गायब केल्याची चर्चा महाविद्यालय परिसरात होती.
‘चॉकलेट डे’ साजरा करताना विद्यार्थिनीला चॉकलेट घेण्यास विद्यार्थ्याने दबाव आणला. संबंधित विद्यार्थिनीने आपल्या भावाला हा प्रकार सांगितल्यानंतर हा वादावादीचा प्रकार घडला. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. संबंधित विद्यार्थी दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल.
– एस. आर. शिंदे,
प्रभारी प्राचार्य, राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय, कोल्हापूर