Home ताज्या बातम्या चोरट्यांच्या दहशतीचे ठाणे

चोरट्यांच्या दहशतीचे ठाणे

0
चोरट्यांच्या दहशतीचे ठाणे

म. टा. प्रतिनिधी, ठाणेः ठाण्यात सोसायटीमध्ये घुसून एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लांबवल्याच्या घटनेनंतर चोरट्यांना पोलिसांचा कोणताही धाक राहिलेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. भरदिवसा चोरटे लुटालुटीचे प्रकार करू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून चोरट्यांची दहशत इतकी वाढली आहे की रस्त्यावरून चालत जाणे किंवा दुचाकीवरून प्रवास करणेही आता धोक्याचे झाले आहे.

पत्नीसह दुचाकीवरून निघालेल्या उमेश गद्रे यांच्या खिशातील माोबाइल अन्य दुचाकीवरील चोरट्यांनी खेचल्यानंतर त्यांनी चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु, चोरट्यांनी गद्रे यांच्या दुचाकीला लाथ मारल्याने गद्रे दाम्पत्य खाली पडल्याचा खळबळजनक प्रकार नुकताच माजिवडा पुलावर घडला. यामध्ये दोघांनाही दुखापत झाली असून या प्रकरणी राबोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ढोकाळी येथील हायलँड गार्डन्स मध्ये उमेश गद्रे (५६) राहतात. त्यांचे नौपाडा परिसरातही घर असून डागगुजीच्या कामानिमित्त ३१ मे रोजी या घरी आले होते. सायंकाळी ते पत्नीसह मुंबई-नाशिक महामार्गावरून ढोकाळीच्या घरी जाण्यासाठी निघाले. माजिवडा पुलावरून जात असताना सायंकाळी ५.५५ वाजता वाय जंक्शनच्या अगोदर डावीकडून दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांपैकी मागे बसलेल्या चोरट्याने उमेश यांच्या वरच्या खिशात असलेला मोबाइल खेचला. उमेश यांनी मोठ्या धैर्याने डाव्या हाताने चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु चोरट्याने उमेश यांच्या दुचाकीला लाथ मारल्याने ते आणि त्यांच्या पत्नी दुचाकीवरून खाली पडले. चोरटे सात हजारांचा मोबाइल चोरून दुचाकीवरून पळून गेले. उमेश यांनी दिलेल्या तक्रारीनंतर शुक्रवारी रात्री १० वाजता दोन चोरट्यांविरुद्ध राबोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चोरट्यांना पकडण्यासाठी राबोडी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.

शहरात चोरट्यांचा मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट झालेला असून सोनसाखळी चोरीबरोबर अन्य जबरी चोरीचे प्रकार राजरोसपणे घडत असताना पोलिस असतात कोठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शहरात ना रस्ता प्रवास सुरक्षित आहे, ना पायी चालणे सुरक्षित राहिले आहे.

शुक्रवारी कोलबाडमध्ये सोसायटीमध्ये घुसलेल्या चोरट्याने ७५ वर्षाच्या वृद्धेच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून वृद्धेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरली होती. या प्रकारानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून लुटालुटीचे प्रकार थांबणार कधी, असाही प्रश्न आता निर्माण झाला आहे. ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये जबरी चोरीबरोबर घरफोड्या आणि इतर चोऱ्यांच्या प्रकारांनीदेखील कळस गाठला आहे.

चालू वर्षातील चोरीचे गुन्हे

जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल

दाखल उघड दाखल उघड दाखल उघड दाखल उघड

दरोडा ३४ २४ ३१ १३ ३८ २२ २८ १३

घरफोड्या ५१ १७ ६० २३ ७५ १७ ५० १७

चोऱ्या २१८ ४८ १८८ ४८ २५६ ५७ २०० ५३

Source link