Home ताज्या बातम्या चोवीस आठवड्यांचे मृत भ्रूण मांजरीने खाल्ले

चोवीस आठवड्यांचे मृत भ्रूण मांजरीने खाल्ले

0

मुंबई : विशेष प्रतिनिधी ,

केईएम रुग्णालयातील प्रिन्स राजभर या चार महिन्यांच्या बाळाच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच येथे २४ आठवड्यांचे मृत मानवी भ्रूण मांजर खात असल्याचे आढळल्याने रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. पालिका रुग्णालयामधील मांजरीचा वाढता वावर व त्यांच्यामुळे रुग्णांना तसेच प्रसूतीगृहामधील महिलांना, लहान बाळांना होणाऱ्या त्रासाबद्दल वारंवार चिंता व्यक्त केली जात असतानाच, हे धक्कादायक प्रकरण पुढे आले आहे.

केईएम रुग्णालयाच्या गेट क्रमांक सातजवळ बायोमेडिकल कचरा ठेवण्याची खोली आहे. येथे विच्छेदन केलेल काही अवयव सीलबंद करून ठेवलेले असतात. यामध्येच हे २४ आठवड्यांचे भ्रूण असण्याची शक्यता आहे. या खोलीशेजारच्या कपाटाखाली मांजरीने हे भ्रूण उचलून नेले व त्याच्या शरिराचा थोडा भाग खाल्ला. तेथील एका कर्मचाऱ्याला हे आढळून आल्यानंतर त्याने आरडाओरडा करून रुग्णालयातील डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांना गोळा केले. या प्रकरणाची माहिती रुग्णालय प्रशासनाने भोईवाडा पोलिसांना दिली असून त्यासंदर्भात एडीआर नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी बायोमेडिकल कचरा गोळा करणारी गाडी दुपारी एक ते तीन या वेळेत केव्हाही येते. मात्र, हे भ्रूण त्या खोलीत असल्याची शक्यता नाही; कारण तशी नोंद त्या विभागामध्ये नसल्याचे सांगितले. या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेजसह इतरही तपास सुरू असल्याचे ते म्हणाले.

रुग्णालयाच्या या विभागातील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार; या विभागाकडे लक्ष दिले जात नाही. यासंदर्भात सातत्याने तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नाही. मांजरीचा उपद्रव त्यांची नसबंदी न करण्यामुळे वाढता आहे. अनेकदा नसबंदी करून पुन्हा त्यांना रुग्णालयात सोडले जाते. ‘गर्दीमुळे अनेकजण ज्या ठिकाणी झोपतात तिथेच मांजरींना खाऊ घालतात, मात्र स्वच्छता व काटेकोर नियोजन ठेवले तर हा उपद्रव नियंत्रणात आणणे शक्य आहे. रुग्णालये ही मांजरींसाठी नाही तर माणसांसाठी आहेत,’ असा संताप या कर्मचाऱ्याने व्यक्त केला.

मग भ्रूण आले कुठून…?

रुग्णालयामध्ये होणाऱ्या नैसर्गिकरित्या गर्भपातांमधील भ्रूण या खोलीमध्ये ठेवण्यात येतात. ही घटना झाली त्या दिवशी, मंगळवारी अशा गर्भपाताची नोंद झालेली नसल्याचा रुग्णालय प्रशासनाचा दावा आहे. त्यामुळे हे भ्रूण येथे कसे आले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.