‘छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिरा’ने गाठला २५० चा टप्पा

‘छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिरा’ने गाठला २५० चा टप्पा
- Advertisement -

मुंबई, दि. 8 : विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीनंतर करिअरच्या विविध संधी संदर्भात कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राज्यात आयोजित ‘छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिरा’चा 250 वा टप्पा मुंबईत पार पडला. मुलुंड येथील शासकीय आयटीआयच्या माध्यमातून आज महाकवी कालिदास नाट्यमंदिर येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराला कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी, यांच्यासह आयटीआयचे प्राचार्य संजय गोरे, उपप्राचार्य संदीप परदेशी तसेच प्रदीप दुर्गे आदी उपस्थित होते.

कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा म्हणाले की, दहावी-बारावीनंतर विद्यार्थ्यांना आपल्या करिअर संदर्भात अनेकदा संभ्रम असतो. त्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर आयोजित करत असून आत्तापर्यंत 250 शिबिरे पूर्ण झाले आहेत. या शिबिरांमध्ये तीन लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून तब्बल १ लाख  ३० हजार विद्यार्थ्यांनी क्यूआरकोडच्या माध्यमातून नोंदणी केली आहे. या शिबिराचा सर्वाधिक लाभ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होत असून त्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती त्यांनी दिली.

आम्हाला कौशल्य युक्त महाराष्ट्र आणि रोजगार युक्त महाराष्ट्र ही संकल्पना राज्यात पूर्णत्वास आणायची  असून त्या दिशेने पावले पडत आहेत यामुळेच आयटीआय मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा पाचशे रुपये विद्यावेतन, तसेच इंटर्नशिप करताना 5 हजार रूपये दिले जात आहेत. त्यामुळे कौशल्ययुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार होत असल्याचेही मंत्री श्री. लोढा म्हणाले.

आयटीआयमध्ये एरोनेटिक स्ट्रक्चरल फिटर, ड्रोन टेक्निशियन, असे नव्याने ट्रेड यावर्षी सुरू होणार आहेत. त्यामुळे राज्यातील विद्यार्थी अशा ट्रेडमुळे कौशल्याच्या क्षेत्रात भरारी घेत आहेत, तर दुसरीकडे आयटीआयचे अद्ययावतीकरण होत असल्याने खूप बदल होत आहेत.

****

संध्या गरवारे/विसंअ/

 

- Advertisement -