मुंबई, दि. ८ : राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ अंतर्गत वडाळा येथील जी.टी.बी. नगरातील गुरूनानक सेकंडरी हायस्कूलच्या सभागृहात समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले.
शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना अधिवास, उत्पन्न, नॉन-क्रीमी लेयर आदी विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांनाही विविध लाभांचे वाटप यावेळी करण्यात आले.
दहावी आणि बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे सुलभपणे उपलब्ध व्हावीत, या उद्देशाने शाळा-महाविद्यालयांनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून यावेळी करण्यात आले. शिबिरात डिजिटल सेवा, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आणि सिंगल डे सर्व्हिस डिलिव्हरी याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी १७९ सायन-कोळीवाडा विधानसभा मतदारसंघ कार्यालयामार्फत मतदार यादी संदर्भातील विशेष स्टॉलही उभारण्यात आला होता.
उपजिल्हाधिकारी गणेश सांगळे, प्रशांत पानवेकर, महेश हरिश्चंद्रे, तहसीलदार राजेश वैष्णव, संकेत यमगर, विद्यालयाच्या प्राचार्या माधवी नाईक आदींच्या प्रमुख उपस्थितीत शिबीर संपन्न झाले. या शिबिरासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, महिला व बालविकास विभाग, संजय गांधी योजना विभाग, आधार सेवा केंद्र, निवडणूक विभाग आणि सेतू सुविधा केंद्रातील अधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपजिल्हाधिकारी महेश हरिश्चंद्रे यांनी केले.
0000





















WhatsApp