Home बातम्या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जतमधील पुतळा स्थापनेसाठी समितीने परिपूर्ण प्रस्ताव प्रशासनाकडे तातडीने सादर करावा – पालकमंत्री जयंत पाटील

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जतमधील पुतळा स्थापनेसाठी समितीने परिपूर्ण प्रस्ताव प्रशासनाकडे तातडीने सादर करावा – पालकमंत्री जयंत पाटील

0
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जतमधील पुतळा स्थापनेसाठी समितीने परिपूर्ण प्रस्ताव प्रशासनाकडे तातडीने सादर करावा – पालकमंत्री जयंत पाटील

सांगली दि. 21 (जि.मा.का.) : छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचेच स्फूर्तीचे व आदराचे स्थान आहे. त्यांचा पुतळा बसविताना त्याचे पावित्र्य राखले जावे यासाठी आवश्यक सर्व परवानग्यांची पूर्तता करून घेण्यासाठी पुतळा समितीने परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे तातडीने सादर करावा. जिल्हा प्रशासन या संदर्भातील विविध यंत्रणांकडून सर्व परवानग्या घेण्यासाठी तातडीने प्रयत्न करेल. येत्या 8 ते 10 दिवसात आवश्यक परवानग्यांची पूर्तता करून घेऊया व लवकरात लवकर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा  बसवूया, असे प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. यावेळी पुतळ्याचे ठिकाण हे राष्ट्रीय महामार्गावर येत असल्याने नॅशनल हायवे ॲथॉरिटी कार्यालयाने बायपास रस्त्यासाठी त्वरित प्रस्ताव सादर करावा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात जत येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची स्थापना करण्यासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत पालकमंत्री जयंत पाटील बोलत होते. यावेळी खासदार संजय पाटील, आमदार विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जत प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे, सार्वजनिक बांधकम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष रोकडे, तहसिलदार जीवन बनसोडे, राष्ट्रीय महामार्गाचे  अभियंता श्री. सांगावकर, पुतळा समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार विलासराव जगताप तसेच सदस्य आदि उपस्थित होते.

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, प्रशासनाला कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता घेऊन पुढील 8 ते 10 ‍दिवसांमध्ये पुतळा बसविण्यासाठी लागणाऱ्या सर्व परवानगींची पूर्तता करून घेऊया. प्रशासनाने कला संचालनालय, मुख्य वास्तू विशारद, सार्वजनिक बांधकाम विभाग यासह संबंधित सर्व यंत्रणांकडून याबाबतच्या परवानग्या मिळविण्यासाठी पाठपुरावा करावा. पुतळ्याच्या संरक्षणासाठी आवश्यक पोलिस बंदोबस्त ठेवावा. अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. त्याचबरोबर पुतळा बसवित असताना तो रस्त्याच्या मध्यभागी असल्याने कोणत्याही वाहनाच्या माध्यमातून त्यास हानी होणार नाही याची काळजी घेण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.