Home शहरे उस्मानाबाद छळास कंटाळून जिल्ह्यातील दोन सुनांनी घेतला गळफास

छळास कंटाळून जिल्ह्यातील दोन सुनांनी घेतला गळफास

0

उस्मानाबाद । जिल्हा प्रतिनिधी । ८ जून : कळंब तालुक्यातील मंगरूळ येथील २४ वर्षीय वंदना गोपाळ शिंदे यांनी माहेरहुन पैसे आणावेत याकरीता त्यांचा पती गोपाळ शहाजी शिंदे, सासरा शहाजी शिवाजी शिंदे, सासू शोभा शहाजी शिंदे यांनी शारिरीक व मानसिक त्रास दिला. त्‍यांच्या त्रासास कंटाळून शनिवारी ६ जून रोजी वंदना शिंदे यांनी गळफास घेउन आत्महत्या केली आहे. अशी फिर्याद वंदना यांच्या आई माळकरंजा येथील रहिवाशी सिताबाई रघुनाथ वाघमारे यांनी दिली आहे. त्यावरून शिरढोण पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळी विरुद्ध रविवारी ७ जून रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दरम्यान दुसऱ्या एका घटनेत उस्मानाबाद तालुक्यातील सकानेवाडी येथील सागर भागवत डुकरे (पती), भागवत सोपान डुकरे (सासरा), सखुबाई भागवत डुकरे (सासु) सर्व यांनी त्यांची सुन उमा सागर डुकरे वय २६ वर्षे, यांना किरकोळ कारणावरुन वेळोवेळी शारिरीक व मानसिक त्रास दिला. त्‍यांच्या या त्रासास कंटाळून सुन उमा सागर डुकरे यांनी शनिवारी ६ जून रोजी सकनेवाडी येथील राहत्या घराच्या छताला (आडुला) गळफास घेउन आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या मंगल लक्ष्मण शेवाळे (मयताची आई) रा. हिसोली, ता. लातुर चौकशीत दिलेल्या जबाबावरुन आरोपींविरुध्द गुन्हा नोंदवला आहे.