मुंबई, दि. 14 : ज्ञान, माहिती आणि कल्पनांची देवाणघेवाण यामुळे शिक्षणाच्या कक्षा अधिक रुंदावत असतात. येणाऱ्या काळात संपूर्ण जगभरात एकसमान एकात्मिक शिक्षण पद्धतीचा वापर होणे आवश्यक आहे, असे मत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.
आधुनिक महाराष्ट्राची जडण-घडण शिल्पकार चरित्रकोशातील आरोग्य कोशाचे प्रकाशन आणि पश्चिम ऑस्ट्रेलियातील विद्यापीठासमवेत आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा सामंजस्य करार अशा कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आले होते. यावेळी पश्चिम ऑस्ट्रेलियाचे पहिले आंतरराष्ट्रीय शिक्षणमंत्री डेव्हिड टेम्पलमन, युनिव्हर्सिटी ऑफ नॉट्रे डेम ऑस्ट्रेलियाच्या कुलगुरु सेलमा अलिक्स, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु निवृत्त लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर, विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले की, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया ही भारतीय युवा शक्तीने प्रेरित असून भारतातील आणि महाराष्ट्रातील विद्यापीठासमवेत सामंजस्य करार करण्यास ते उत्सुक आहेत, ही बाब आनंदाची आहे. येणाऱ्या काळात एकसमान शिक्षण पद्धत संपूर्ण जगात असणे ही काळाची गरज ठरणार आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत वेगवेगळ्या पॅथींचा समावेश आहे. पण आजच्या विद्यार्थ्यांना या पॅथी शिकताना रुग्णांबरोबर सहानुभूती दाखवणे आवश्यक आहे, तरच हे विद्यार्थी आपल्या वेगवेगळ्या पॅथी चांगल्या समजू शकतील.
भारतासह अन्य देशांनी वेगवेगळ्या क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. आरोग्य, दळवणवळण, पायाभूत सुविधा याबरोबरच शिक्षण क्षेत्रातही प्रगती केली आहे. भारतासह सगळेच देश प्रगतीबरोबरच शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. गौतम बुद्ध यांचे विचार आणि भगवान महावीर यांची शांततेची शिकवण भारतासह इतर देशांनाही प्रेरित करत आहे. आपल्या आताच्या शिक्षणातसुद्धा शांतता आणि एकात्मता यावर भर असणे आवश्यक आहे. भारताने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्याचे निश्चित केल्यानंतर हा दिवस 108 देशांमध्ये साजरा केला जातो हीच आपली एकात्मता आहे, असेही श्री. कोश्यारी यावेळी म्हणाले.
वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे आंतरराष्ट्रीय शिक्षणमंत्री डेव्हिड टेम्पलमन म्हणाले की, कुशल मनुष्यबळ निर्माण करणाऱ्या भारतासारख्या देशाबरोबर शैक्षणिक सामंजस्य करार करणे ही आमच्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. येणाऱ्या काळात आपल्यात अनेक शैक्षणिक करार करताना याचा फायदा कसा होईल याकडे अधिक लक्ष देण्यात येईल. शिक्षणक्षेत्रासाठी सगळ्यात सुरक्षित अशी ओळख असणाऱ्या या राज्यात रोजगार आणि शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.
उत्कृष्ट सागरकिनारे, स्वच्छ आणि सुरक्षित शहर, चांगला सूर्यप्रकाश आणि प्रदूषणविरहित हवा याबरोबरच चांगली शैक्षणिक व्यवस्था यासाठीसुद्धा वेस्टर्न ऑस्ट्रेलिया ओळखले जाते. भारतातील एक लाखांहून अधिक विद्यार्थी या देशात शिकत आहेत. येणाऱ्या काळात पर्यटन, शिक्षण, कौशल्य विकास या क्षेत्रातील बारकावे शिकण्यासाठी आमच्या राज्यातील अनेक विद्यार्थी महाराष्ट्रात येतील असा विश्वास वाटतो. भारतासारख्या देशात पहिला आंतरराष्ट्रीय शिक्षणमंत्री म्हणून आल्यानंतर आपल्याच घरी आल्याचा भास होतो. आमच्या राज्यातून येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांचीही हीच भावना असेल, असा विश्वास श्री. टेम्पलमन यांनी व्यक्त केला.
आधुनिक महाराष्ट्राची जडण-घडण शिल्पकार चरित्रकोशातील आरोग्य कोशाचे प्रकाशन आज मान्यवरांच्या हस्ते झाले. या आरोग्य कोशात सुमारे 550 पेक्षा अधिक चरित्रनायकांचा समावेश करण्यात आला असून विद्या शाखानिहाय ते वर्गीकृत करण्यात आले आहेत. प्रकाशित करण्यात येणारा आरोग्य कोश शिक्षक, विद्यार्थी व अभ्यागतांकरिता उपयुक्त असणार आहे. याच कार्यक्रमात आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि युनिव्हर्सिटी ऑफ नॉट्रे डेम ऑस्ट्रेलिया यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या करारातंर्गत शिक्षणाकरिता आंतरराष्ट्रीय धोरणात्मक मूल्यानुसार संबंधित विषयांमधील तज्ज्ञांना प्रोत्साहन देणे, विद्यार्थी आणि कर्मचारी गतिशीलतेसाठी संधी वाढवणे. आंतरराष्ट्रीय संशोधन सहकार्य मजबूत करणे, विद्यापीठ संसाधने आणि सुविधाच्या परस्पर विनिमयासाठी प्रक्रिया सुरु करणे, उच्च दाक्षिण संशोधन संदर्भात जागरूकता वाढविणे आदी बाबींचा समावेश असणार आहे.
शिक्षण क्षेत्रात तंत्राज्ञानाचा वापर महत्त्वपूर्ण असून आरोग्य विद्यापीठ आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. आरोग्य सेवा क्षेत्रात उदयोन्मुख तंत्रज्ञान आधारित प्रतिबद्धता आणि उपक्रम तयार करण्यासाठी कार्य करण्यात येणार आहे. हेल्थकेअर क्षेत्रातील संभाव्य क्षेत्रे ज्यामध्ये सहकार्य करू शकतात अशा मॉडेलद्वारे आरोग्य सेवा वितरण सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाच्या नेतृत्वाखाली रिमोट हेल्थकेअर उपाय, रुग्णांची काळजी, प्रयोगशाळा, वैद्यकीय शिक्षण व प्रशिक्षण आदी बाबींचा यात समावेश असणार आहे. विद्यापीठातील वैद्यकीय इतिहास संग्रहालयाचे नूतनीकरण करण्यात येणार असून केंद्र शासनाच्या वाणिज्य मंत्रालय अंतर्गत कार्य करणारे अहमदाबाद येथील नॅशनल डिझाईन संस्थान समवेत सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार कामाचे तीन टप्पे असून पहिल्या टप्प्यात वैद्यकीय इतिहास संग्रहालय पुनर्विकासासाठी आवश्यक मूल्यमापन आणि योजना तयार करण्यात येणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात संग्रहालयाची संकल्पना आणि रचना तसेच अंतिम टप्प्यात संग्रहालयास मूर्त रुप देण्यात येणार आहे. आरोग्य शिक्षण व संशोधनासाठी शिक्षक, विद्यार्थी व अभ्यागतांना माहितीसाठी विद्यापीठ आवारातील संग्रहालय महत्त्वपूर्ण असणार आहे.
००००
वर्षा आंधळे/विसंअ/14.7.22