जनजातीय गौरव सेवा सप्ताहातून आदिवासी बांधवांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविणार – महासंवाद

    - Advertisement -

    छत्रपती संभाजीनगर, दि. १० (जिमाका) : क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त ११ ते १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत जनजातीय गौरव सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून आदिवासी समाजातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहोचविणे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे, आरोग्यविषयक जनजागृती करणे तसेच आदिवासी संस्कृती आणि जननायकांच्या ऐतिहासिक योगदानाचे जतन करण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने विशेष कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.

    आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या संकल्पनेतून आणि प्रकल्प अधिकारी  चेतना मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि लातूर या चार जिल्ह्यांत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि संबंधित शासकीय विभागांच्या समन्वयातून या सप्ताहाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

    सप्ताहाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना शासकीय योजनांची माहिती देण्याबरोबरच जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड आणि मतदार नोंदणीसारख्या आवश्यक कागदपत्रांसाठी विशेष सेवा शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. तसेच रक्तदान, आरोग्य तपासणी, पोषणविषयक जनजागृती आणि लाभार्थ्यांना योजनांच्या माहिती पुस्तिकांचे वितरण करण्यात येणार आहे. आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकांचे सुशोभीकरण, स्वच्छता आणि दीपोत्सवाचे आयोजन करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात येईल.

    सप्ताहातील प्रमुख कार्यक्रम

    ११ नोव्हेंबर रोजी सेवा सप्ताहाच्या प्रसिद्धी व प्रचाराचा प्रारंभ करण्यात येणार आहे. १२ नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे पालकमंत्री संजय शिरसाट आणि प्रकल्प अधिकारी चेतना मोरे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद होईल. तसेच बीड, लातूर, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतील विविध तालुक्यांतही पत्रकार परिषदांचे आयोजन करण्यात येणार आहे.

    १३ नोव्हेंबर रोजी अंबड तहसील कार्यालयात न्यू.ब.यो. अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना धनादेश वितरणासह अनुसूचित जमातीच्या विविध योजनांची माहिती देण्यात येईल. १४ नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यांतील आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकांचे सुशोभीकरण, वेरूळ येथे दीपोत्सव तसेच जाफ्राबाद, शिवूर बंगला, चोकाळा आणि कन्नड येथील स्मारकांची स्वच्छता करण्यात येईल.

    १५ नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे झाल्टा फाट्याजवळील अंबिका लॉन्स, आडगाव फाटा येथे मुख्य शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यासह स्थानिक मंत्री, खासदार, आमदार आणि आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत अभिवादन व गौरव कार्यक्रम होणार आहे. यावेळी आदिवासी स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांच्या कार्याचे स्मरण करण्यात येणार आहे.

    १६ नोव्हेंबर रोजी शिरूर कासार येथे आधार कार्ड व इतर आवश्यक शासकीय कागदपत्रांसाठी सेवा शिबिर आयोजित करण्यात आले आहे. १७ नोव्हेंबर रोजी सिल्लोड येथे लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत भव्य मेळावा, आरोग्य तपासणी आणि पोषण जनजागृती शिबिर होणार आहे. या कार्यक्रमास मंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी जालना, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार उपस्थित राहणार आहेत. १८ नोव्हेंबर रोजी प्रकल्प कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे सप्ताहाचा समारोप होईल.

    यासोबतच आदिवासी समाजातील लाभार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांना मिळालेल्या शासकीय लाभांची माहिती संकलित केली जाणार आहे. लाभार्थ्यांच्या यशोगाथा चित्रफितींच्या माध्यमातून समाजमाध्यमांवर प्रसारित करून योजनांची माहिती व्यापक स्तरावर पोहोचविण्यात येईल. पारंपरिक कला, लोकनृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनाही या सप्ताहात प्राधान्य देण्यात येणार आहे.

    शासकीय योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे, आदिवासी बांधवांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करणे आणि आदिवासी अस्मिता व संस्कृतीचे संवर्धन करणे हा या सप्ताहाचा प्रमुख उद्देश आहे. या उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, छत्रपती संभाजीनगर कटिबद्ध असल्याचे प्रकल्प अधिकारी  चेतना मोरे यांनी सांगितले.

    000000

    - Advertisement -