जनतेच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांसाठी देखील पाणी उपलब्ध राहील याचा विचार करून पाणी सोडण्याचे नियोजन करावे – पालकमंत्री धनंजय मुंडे – महासंवाद

जनतेच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांसाठी देखील पाणी उपलब्ध राहील याचा विचार करून पाणी सोडण्याचे नियोजन करावे – पालकमंत्री धनंजय मुंडे – महासंवाद
- Advertisement -

जिल्ह्यातील जलसाठ्यांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध

 पाटबंधारे प्रकल्पातील पिण्याचे पाणी आरक्षित करण्याबाबत बैठक संपन्न

बीड,  दि. १९:- गतवर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने जलसाठ्यांची मध्ये अजून देखील पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे याचा विचार करता जिल्ह्यातील जनता यांच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांसाठी देखील पाणी उपलब्ध राहील याचा विचार करून पाणी सोडण्यासाठी नियोजन करण्यात यावे असे निर्देश पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

बीड जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पातील पिण्याचे पाणी आरक्षित करण्याबाबत बैठक पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती सभागृहात झाली.  याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार संदीप क्षीरसागर, आमदार संजय दौंड,  समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता के . का.आकुलवार, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता नामदेव उबाळे , जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री परांडे, अधीक्षक अभियंता यांच्या प्रतिनिधी श्रीमती ठोंबरे, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी तसेच जलसंपदा, महसूल आदी विभागांचे शासकीय अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, पिण्यासाठी आरक्षित केलेल्या पाण्याचा अनधिकृत उपसा व गैरवापर टाळावा यासाठी प्रशासनाने खबरदारी घ्यावी.  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मार्फत पाणी वापराची देयके अदा करण्यात आलेली नसल्याने त्याचा परिणाम जलनियोजनावर होत असून अशा स्थानिक स्वराज्य संस्थांची माहिती उपलब्ध करून देण्यात यावी अशा सूचना पालकमंत्री श्री मुंडे यांनी दिल्या.

सुरुवातीला कार्यकारी अभियंता श्री. अकुलवार यांनी सादरीकरण केले. यामध्ये जिल्ह्यातील सर्व जलप्रकल्प व जलसाठे यातील उपलब्ध  पाण्याचे 15 ऑक्टोबर ते 15 जुलै या कालावधीसाठी करण्यात आलेल्या पाणी वापर आराखड्याची माहिती समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आली. जिल्ह्यात गतवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून या 175 टक्के सरासरी पावसामुळे आजही जलप्रकल्पांमध्ये जवळपास 68 टक्के सरासरी पाणी साठा उपलब्ध आहे. पाणी उपलब्ध असल्याने कमी सिंचनावर वाढणारी पिके लागवड केली जाऊ शकतात .

पालकमंत्री  श्री. मुंडे यांनी यावेळी माहिती घेताना जिल्ह्यातील माजलगाव या मोठ्या प्रकल्पा बरोबरच मांजरा प्रकल्पातील पाण्याच्या उपलब्धतेचा देखील आढावा घेऊन सूचना केल्या. बैठकीचा सुरुवातीला प्रशासनाच्या वतीने पालकमंत्री श्री. मुंडे आणि उपस्थित आमदार महोदय व मान्यवरांचे स्वागत पुस्तक देऊन केले.

000000

- Advertisement -