जनतेला उत्कृष्ट सेवा देण्याचा संकल्प करावा – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

जनतेला उत्कृष्ट सेवा देण्याचा संकल्प करावा – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण
- Advertisement -

मुंबई, दि. 15 : सार्वजनिक बांधकाम विभागासमोर आज अनेक आव्हाने असली तरी या सर्वांवर मात करून प्रत्येक कामामध्ये सकारात्मकता आणावी. नवनवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जनतेला उत्कृष्ट सेवा देण्याबरोबरच प्रत्येकाने सर्वोत्कृष्ट काम करण्याचा संकल्प करून राज्याला प्रगतीपथावर नेवूया, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.

आपल्या विभागाची कामगिरी सर्वोत्तम करण्याच्यादृष्टीने विभागाचा कारभार स्वच्छ व पूर्णपणे पारदर्शक ठेवायाला हवा. आपला विभाग हा जनसामान्यांशी जोडलेला असल्यामुळे यापुढे विभागाची प्रतिमा व कामाची गुणवत्ता, दर्जा हा अधिक सुधारण्याच्या सूचना मंत्री श्री. चव्हाण यांनी दिल्या.

माटुंगा येथील षण्मुखांनद सभागृहात, भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचा जन्मदिन राष्ट्रीय अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव समारंभ झाला. याप्रसंगी विभागात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ६५ अभियंत्यांचा गौरव सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह प्रदान करुन करण्यात आला. यावेळी मंत्री श्री. चव्हाण बोलत होते.

मंत्री श्री. चव्हाण म्हणाले, भारतरत्न विश्वेश्वरैया यांनी आधुनिक भारताची निर्मिती केली आणि देशाला नवे रूप दिले. अभियांत्रिकी क्षेत्रात त्यांनी असाधारण योगदान दिले आहे. आज सार्वजनिक बांधकाम विभागासमोर अनेक आव्हाने आहेत. आपल्या विभागाकडून जनतेच्याही खूप अपेक्षा आहेत त्या पूर्ण क्षमतेने परिपूर्ण करण्यासाठी काम करा. आपापल्या कामामध्ये सकारात्मकता आणा. अत्याधुनिक तंत्रज्ञान अवगत  करा. कोणताही रस्ता अथवा बांधकाम करताना ते दर्जेदार व उत्कृष्टपणे निर्माण करा. देश घडविण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे. त्यादृष्टीने विभागाने आपल्या कार्यपद्धतीमध्ये बदल करुन पावले उचलण्याची गरज आहे. आपल्या विभागाची प्रतिमा उंचावण्यासाठी आगामी काळात आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असून सर्वांच्या सूचनांचे स्वागत करण्यात येईल. आपली कामे हे पूर्ण क्षमतेने करा. कोणीही आपल्या विभागाविषयी तक्रार करता कामा नये याची प्रत्येकाने दक्षता घ्यायला हवी. जनतेला विकास कामातून उत्कृष्ट सेवा दिल्यास आगामी काळात महाराष्ट्र राज्य नक्कीच प्रगतीपथावर राहील, असा विश्वासही मंत्री श्री. चव्हाण यांनी व्यक्त केला.

मंत्री श्री. चव्हाण पुढे म्हणाले, गुगल, उबेर सारख्या ज्या कंपन्यांनी जगामध्ये क्रांती घडविली व यशाची नवीन शिखरे गाठली आहेत. त्या कंपन्याच्या यशाचे गमक म्हणजे एका इंजिनिअरने आपल्या कल्पकतेने या कंपन्या स्थापन केल्या व यश मिळविले. याच पद्धतीने आपल्या विभागाच्या प्रत्येक कर्मचाऱ्यामध्ये असलेल्या इच्छाशक्तीच्या जोरावर मिशन मोडमध्ये काम करुन त्यांनी नव्याने बदल घडवून विभागाला प्रगतीपथावर नेले पाहिजे, अशी अपेक्षाही मंत्री श्री.चव्हाण यांनी व्यक्त केली.

राज्याच्या विकासात सार्वजनिक बांधकाम विभागाची महत्त्वाची भूमिका – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस

राज्याला शाश्वत आणि सर्वसमावेशक भविष्याकडे नेवून राज्याच्या विकासात सार्वजनिक बांधकाम विभाग महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. भारतरत्न  मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जन्मदिनानिमित्त श्री.फडणवीस यांनी व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून राष्ट्रीय अभियंता दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

गेल्या दीडशे वर्षात बांधले गेलेले रस्ते, पूल,  रेस्ट हाऊस, सर्किट हाऊस आणि अनेक प्रशासकीय इमारतींच्या  बांधकामांचा साक्षीदार असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्याच्या पायाभूत सुविधा उभारणीत महत्त्वाचे योगदान आहे. संपूर्ण बांधकाम चक्रामध्ये कार्बन उत्सर्जन कमी करणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करणे महत्त्वाचे झाले आहे. महाराष्ट्रात ग्रीन बिल्डींग उभ्या राहत आहेत, त्याला आणखी गती देण्याची गरज आहे. तसेच, स्वदेशी आणि स्थानिक पातळीवर तयार झालेले बांधकाम साहित्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालून सार्वजनिक बांधकाम विभागाला नवी कार्यपद्धती विकसित करावी लागेल असेही उपमुख्यमंत्री यांनी संदेशात म्हटले आहे.

यावेळी विभागाची बलस्थाने, कोणकोणती नवीन कामे करता येऊ शकतात तसेच विभागाच्या कामामध्ये जाणवणाऱ्या विविध अडचणी याबद्दल राज्यातील अभियंत्यांनी सूचना केल्या व मते मांडली.

राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा कायापालट करण्याच्या दृष्टीने विभागाची कार्यपद्धती अधिक दर्जेदार व सक्षम करण्यासाठी अपर मुख्य सचिव मनोज सौनिक व विविध मान्यवरांनी  मनोगत व्यक्त केले.

याप्रंसगी बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) स.शं.साळुंखे, सचिव (इमारती) प्र.द.नवघरे, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे सचिव सु.अ.वांढेकर, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनाचे सचिव खं.तु.पाटील, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरणाचे सह व्यवस्थापकीय संचालक अ.ब.गायकवाड, यांच्यासह राज्यातील सर्व विभागीय मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उप अभियंता, शाखा अभियंता उपस्थित होते. सचिव (रस्ते) स.शं.साळुंखे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम चांदोरकर यांनी केले.

सन २०१३ ते २०१९ पर्यंत उत्कृष्ट अभियंत्यांच्या पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे-

वर्ष २०१३-१४

तत्कालीन कार्यकारी अभियंता साहेबराव सुरवसे, कार्यकारी अभियंता बी.एन. बहिर, तत्कालीन उप अभियंता लक्ष्मीकांत जाधव, उप अभियंता प्रदीप दळवी, सहायक अभियंता रिता शुक्ला, कनिष्ठ अभियंता सुरेश जोशी, कनिष्ठ अभियंता संदीप चाफले, तत्कालीन वास्तुशास्त्रज्ञ मिंथिला जाधव, अंजली माटोडकर.

वर्ष २०१४-१५

तत्कालीन अधीक्षक अभियंता खंडेराव पाटील, कार्यकारी अभियंता विजय कारंडे, कार्यकारी अभियंता संजय मुनगिलवार, कार्यकारी अभियंता अनिल लक्ष्मण पवार, उप अभियंता श्रीकांत ढगे, उप अभियंता अनील निमकर, तत्कालीन उप अभियंता अस्मिता खोंडे, कनिष्ठ अभियंता समीर राऊळ, सहा. अभियंता श्रेणी-2 राहुल कुलकर्णी, कनिष्ठ अभियंता मोहन महाडीक, तत्कालीन वास्तुशास्त्रज्ञ यशोधरा देशपांडे.

वर्ष २०१५-१६

तत्कालीन अधीक्षक अभियंता राजीव गायकवाड, कार्यकारी अभियंता विनोद भदाणे, कार्यकारी अभियंता पोपट वाघमारे, उप अभियंता अजय भोसले, उप अभियंता संदीप कोटलवार, उप अभियंता कृष्णा वाघ, कनिष्ठ अभियंता शिवानंद बिराजदार, कनिष्ठ अभियंता संजय सोमाण, कनिष्ठ अभियंता (विद्युत) इशांत प्रकाश कुलकर्णी, तत्कालीन वास्तुशास्त्रज्ञ संजय गेडाम, वास्तुशास्त्रज्ञ हर्षद साळुंके.

वर्ष २०१६-१७

अधीक्षक अभियंता शामकांत पाटील, तत्कालीन कार्यकारी अभियंता नारायण वेदपाठक, कार्यकारी अभियंता बाबासाहेब थोरात, कार्यकारी अभियंता प्रमोद बनगोसावी, उप अभियंता सच्चिदानंद श्रावणी (अमरावती), उप अभियंता गणेश पाटील (नाशिक), उप अभियंता (विद्युत) संभाजी घोरपडे, कनिष्ठ अभियंता जितेंद्र नेहेते, कनिष्ठ अभियंता आनंद नागरे, सहायक अभियंता श्रीकांत गुलकोटवार, वास्तुशास्त्रज्ञ शिल्पा कडू, सतीश पाटील.

सन २०१७-१८

अधीक्षक अभियंता सुनिल देशमुख, तत्कालीन कार्यकारी अभियंता सुषमा साखरवाडे, तत्कालीन कार्यकारी अभियंता जयंत कुलकर्णी, उप अभियंता ललिता गिरीबुवा, उप अभियंता सत्यशील नगराळे, उप अभियंता सुग्रीव गंगाधर केंद्रे, उप अभियंता संजीवनी करले, कनिष्ठ अभियंता बाबू शिंदे, कनिष्ठ अभियंता सुभाष बल्लाळ.

सन २०१८-१९

अधीक्षक अभियंता विकास रामगुडे, कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, कार्यकारी अभियंता सचिन चिवटे, कार्यकारी अभियंता गजानन टाके, उप अभियंता रश्मी डोळे, कनिष्ठ अभियंता जितेंद्र काळे, कनिष्ठ अभियंता अतुल मुंडे, कनिष्ठ अभियंता (विद्युत) तानाजी थोपटे, पंकज पाटील, योगिता सोडल, दिपाली पवार, आर.बी.राजगुरु

******

संध्या गरवारे/विसंअ/15.9.22

- Advertisement -