Home गुन्हा जमावबंदीचा आदेशाचा भंग केल्याप्रकरणी नगरसेवकांवर गुन्हा दाखल

जमावबंदीचा आदेशाचा भंग केल्याप्रकरणी नगरसेवकांवर गुन्हा दाखल

0

जमावबंदीचा आदेशाचा भंग केल्याप्रकरणी नगरसेवकांवर गुन्हा दाखल

दौंड नगरपालिकेतील नागरिक संरक्षण मंडळ आघाडीच्या गटनेते राजेश गायकवाड यांच्या फोटोला चपलांचा हार घातल्याप्रकरणी दौंड नगरपालिकेच्या नगरसेवकांवर मुंबई पोलीस ऍक्‍टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक व कार्यकर्ते यांनी गटनेते राजेश गायकवाड यांच्या केबिनच्या बाहेर दरवाज्याच्यावर त्यांच्या नावाच्या बोर्डखाली त्यांचा फोटो लावून त्याला चपलांचा हार घातला होता. यानंतर नगरपालिकेतील सीसीटीव्हीची पाहणी केली असता त्यामध्ये नगरसेविका हेमलता प्रवीण परदेशी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते बादशाह भाई शेख, नगरसेविका राऊत, सोनू धनवे हे फोटोला चपलांचा हार घालत असल्याचे दिसले. तसेच राष्ट्रवादीचे अन्य नगरसेवक बाजूला उभे असल्याचे दिसले.
त्यानंतर मुख्याधिकारी मंगेश शिंदे यांच्या आदेशानुसार नगरपालिकेतील कर्मचारी संजय मच्छिंद्र सावंत (रा. कुंभार गल्ली, दौंड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

सध्या गणेशोत्सव सुरू असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी 11 सप्टेंबरपर्यत जमावबंदीचा आदेश जारी केला आहे. त्यानुसार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी नगरसेवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच राजेश गायकवाड यांनी महिलांची बदनामी होईल, अशी पोस्ट सोशल मीडियावर अपलोड केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी लेखी तक्रार दौंड नगरपालिकेच्या आरोग्य सभापती हेमलता परदेशी यांनी दौंड पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली आहे.