जम्मू कश्मीरच्या उपमुख्यमंत्र्यांची राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत बैठक – महासंवाद

जम्मू कश्मीरच्या उपमुख्यमंत्र्यांची राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत बैठक – महासंवाद
- Advertisement -

  • जम्मू-कश्मीरच्या रहिवाशांच्या सुरक्षेवर उपमुख्यमंत्र्यांचा भर
  • आपल्या लोकांची सुरक्षितता सरकारची सर्वोच्च प्राथमिकता : उपमुख्यमंत्री

मुंबई, २६ एप्रिल : जम्मू-कश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांनी आज मुंबईत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि महाराष्ट्र सरकारने जम्मू-कश्मीरच्या रहिवाशांसाठी घेतलेल्या सुरक्षात्मक उपाययोजनांवर समाधान व्यक्त केले.

उपमुख्यमंत्री चौधरी यांनी महाराष्ट्रात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांशी, व्यावसायिकांशी व व्यापाऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या मनात सुरक्षिततेचा विश्वास निर्माण केला.

या बैठकीत चौधरी यांनी महाराष्ट्रात वास्तव्यास असलेल्या जम्मू-कश्मीरच्या नागरिकांच्या सुरक्षेचे महत्व अधोरेखित केले आणि त्यांच्या कल्याणासाठी सर्व आवश्यक पावले उचलण्याची विनंती एकनाथ शिंदे यांना केली.

त्यावर उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले आणि म्हटले की, महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्रातील जनतेचा जम्मू-कश्मीरच्या लोकांशी दृढ बंध आहे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्या सूचनेनुसार, उपमुख्यमंत्री चौधरी यांनी विविध महाविद्यालये व विद्यापीठांतील विद्यार्थ्यांशी, खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांशी व व्यावसायिकांशी स्वतंत्ररित्या भेट घेतली आणि त्यांच्या सुरक्षेची व कल्याणाची माहिती घेतली. त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचीही भेट घेतली.

चौधरी यांनी पुन्हा एकदा सांगितले की जम्मू-कश्मीरच्या रहिवाशांची सुरक्षितता सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. त्यांनी म्हटले, “आमच्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करू.”

एकजूट व्यक्त करताना चौधरी म्हणाले की, उमर अब्दुल्ला सरकार आपल्या लोकांच्या कल्याणासाठी सदैव चिंतीत आहे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. तसेच, विद्यार्थ्यांना व अन्य रहिवाशांना कोणत्याही मदतीसाठी प्रशासनाने प्रसारित केलेल्या अधिकृत हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

००००

- Advertisement -