Home शहरे अकोला जलजीवन मिशन मधील नळपाणीपुरवठा योजनेची कामे सहा महिन्यात पूर्ण करावीत – पालकमंत्री छगन भुजबळ – महासंवाद

जलजीवन मिशन मधील नळपाणीपुरवठा योजनेची कामे सहा महिन्यात पूर्ण करावीत – पालकमंत्री छगन भुजबळ – महासंवाद

0
जलजीवन मिशन मधील नळपाणीपुरवठा योजनेची कामे सहा महिन्यात पूर्ण करावीत – पालकमंत्री छगन भुजबळ – महासंवाद

नाशिक, दिनांक 29 मे 2022 (जिमाका वृत्तसेवा) : जलजीवन मिशन मधील पाणीपुरवठा योजनांची कामे जलदगतीने सहा महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करावीत, असे निर्देश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

आज येवला तालुक्यातील पारेगाव व कोटमगाव येथील जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना व इतर विविध विकास कामांच्या भूमिपूजन व लोकर्पण प्रसंगी  पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी आमदार नरेंद्र दराडे, माजी आमदार मारोतीराव पवार, प्रांत अधिकारी ज्योती कावरे, तहसिलदार प्रमोद हिले, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.भांडेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीच्या काळात विकासाची कामे थांबली होती परंतु आता परिस्थिती निवळली आहे. अर्थचक्र गतिमान होत आहे. जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणीपुरवठा योजनेच्या कामांचे आज भूमिपूजन झाले असून येत्या सहा महिन्यांच्या आता या योजनेंतर्गत सर्व कामे  जलदगतीने  व दर्जेदार झाली पाहिजेत. या कामांच्या दर्जाबाबत कोणतीही हयगय होता कामा नये, अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

पालकमंत्री श्री. भुजबळ पुढे म्हणाले की, कोरोना साथरोगाशी सामना करण्यासाठी आज लसीकरणावर जास्त भर दिला जात आहे. गावातील सर्वांचे लसीकरण १०० टक्के जरी पूर्ण झाले असले तरीही बुस्टर डोस प्रत्येक कुटूंबाने घेणे गरजेचे आहे. आपल्या सोबतच आपले कुटूंब सुरक्षित ठेवण्याची प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. कोरोना काळात आरोग्य, पोलीस व अन्नधान्य पुरवठा करणारी रास्त धान्य दुकाने अविरतपणे कार्यरत होती. यापुढेही गावातील इतर प्रलंबित कामेही त्वरीत पूर्ण करण्यात येतील. या योजनेच्या माध्यमातून पारेगाव व कोटमगावातील पाणीप्रश्न सुटला असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

येवला तालुक्यातील एकूण २५ गावांसाठी जलजीवन मिशन मधून नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर

येवला तालुक्यात जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत एकूण २५ नवीन नळ पाणी पुरवठा मंजूर झाल्या आहेत. यामध्ये सत्यगांव योजनेसाठी ३७ लक्ष ६२ हजार, नांदूर योजनेसाठी १ कोटी २.५ लक्ष, बाळापुर योजनेसाठी ४९ लक्ष ८६ हजार, पारेगाव योजनेसाठी १ कोटी १३ लक्ष, कोटमगाव योजनेसाठी ८१ लक्ष ३३ हजार, रायते चिचोंडी योजनेसाठी ७६ लक्ष ९२ हजार, मोठामळा सावरगाव योजनेसाठी ४५ लक्ष ५५ हजार, लोखंडेवस्ती देवरगाव सावरगाव योजनेसाठी ४६ लक्ष ६६ हजार, गोपाळवाडी सावरगाव योजनेसाठी ३८ लक्ष ६५ हजार, वळदगाव शिरसगाव लौकी योजनेसाठी ५० लक्ष ३२ हजार, लौकी शिरसगाव योजनेसाठी ६६ लक्ष ८२ हजार, धनकवाडी गुजरखेड योजनेसाठी २९ लक्ष ८४ हजार, गुजरखेडे योजनेसाठी ३५ लक्ष ६९ हजार, कानडी योजनेसाठी ८७ लक्ष ७६ हजार,उंदीरवाडी योजनेसाठी १ कोटी ६१ लक्ष, सावखेडे अनकुटे योजनेसाठी १९ लक्ष, देवळाने योजनेसाठी १ कोटी २७ लक्ष, पिंपळगाव जलाल योजनेसाठी ४३ लक्ष ६२ हजार, अंदरसूल योजनेसाठी ९८ लक्ष ८३ हजार, देशमाने खु योजनेसाठी ७७ लक्ष ६९ हजार, निमगावमढ योजनेसाठी ५८ लक्ष ४६ हजार, सायगाव योजनेसाठी ३२ लक्ष ९८ हजार, अडगाव रेपाळ योजनेसाठी ५३ लक्ष ११ हजार, आंबेगाव योजनेसाठी ८८ लक्ष १७ हजार, तर नगरसूल योजनेसाठी २ कोटी २६ लक्ष रुपयांचे कामे प्रस्तावित असून लवकरच ही कामे सुरु होतील, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते कांदा चाळ अनुदान प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

या कामांचे झाले भूमिपूजन व लोकार्पण

येवला तालुक्यातील पारेगाव येथे जलजीवन मिशन अंतर्गत १३४ लक्ष रुपये किंमतीच्या नळपाणीपुरवठा योजना कामाचे भूमिपूजन तसेच अल्पसंख्यांक योजनेअंतर्गत १५ लक्ष रुपये किंमतीचे रस्ता काँक्रीटीकरण या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.

त्याचप्रमाणे कोटमगांव बु. येथे जलजीवन मिशन अंतर्गत ८१.३३ लक्ष रुपये किमतीच्या नळ पाणीपुरवठा योजना, जिल्हा क्रिडा विभाग अंतर्गत सात लाख रुपयांची व्यायामशाळा बांधणे, जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभाग अंतर्गत १२ लाख किंमतीच्या अंगणवाडी इमारत बांधणे, दलितवस्ती योजनेंतर्गत ५ लाख रस्ता काँक्रीटीकरण करणे, १५ व्या वित्त आयोग अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण या कामांचे भूमीपूजन यावेळी करण्यात आले. तसेच पंचायत समिती अंतर्गत RO प्रणाली रुमचे लोकार्पण व पंचायत समिती अंतर्गत शालेय साहित्याचे वाटप पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.

0000000000000