Home ताज्या बातम्या जळगावच्या कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र प्रशाळा येथे ‘मतदान जनजागृती कार्यक्रम’ संपन्न

जळगावच्या कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र प्रशाळा येथे ‘मतदान जनजागृती कार्यक्रम’ संपन्न

0
जळगावच्या कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र प्रशाळा येथे ‘मतदान जनजागृती कार्यक्रम’ संपन्न

जळगाव दि. 30 ( जिमाका ) अठरा वर्षपूर्ण झाल्यानंतर मतदार नोंदणी करून मतदान करणे हे काम राष्ट्रीय कर्तव्य आहे याची जाणीव आम्हाला झाली असून आम्ही ‘ होय,आम्ही मतदान करणार आणि इतरांनाही मतदान करायला प्रवृत्त करणार असा समान सूर कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्र प्रशाळा येथे मतदान जनजागृती कार्यक्रमात सहभागी युवकांनी आज त्यांच्या भावना व्यक्त करतांना काढला.

राष्ट्रीय सेवा योजना प्रादेशिक कार्यालय, पुणे आणि सामाजिकशास्त्रे प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मतदान जनजागृती कार्यक्रम विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्रे प्रशाळेच्या सभागृहात  आयोजित केला होता.

या कार्यक्रमाला समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त तथा मतदान जनजागृती अभियानाचे नोडल अधिकारी योगेश पाटील, जिल्हा माहिती अधिकारी तथा मीडिया कक्षाचे नोडल अधिकारी युवराज पाटील, कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्रे प्रशाळाचे संचालक प्रा. डॉ. अजय एस. पाटील, विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक प्रा. डॉ. सचिन जे. नांदे, युवा आयकॉन रणजित राजपूत, रेडिओ जॉकी शिवानी, रेडिओ जॉकी देवा, कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. मनोज आर. इंगोले उपस्थित होते.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या युवकांमध्ये उत्तम संवाद कौशल्य असते, त्यांच्यात लोकांमध्ये मिसळण्याचा गुण अंगी आलेला असतो, त्यामुळे मतदान जनजागृतीच्या कामात ते पुढे असतात. कार्यक्रमापूर्वी आपण जे पथनाट्य पाहिले ते अत्यंत प्रभावी होते. असले पथनाट्य मतदान जागृतीसाठी अत्यंत प्रभावी माध्यम असल्याची भावना समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी व्यक्त केली. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या, सामाजिक शास्त्रे विभागाच्या विद्यार्थ्यांनी लोकांमध्ये जाऊन अधिक जागृती निर्माण करावी असे आवाहनही केले.

जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील म्हणाले, लोकशाही मध्ये तुमचं मत हे अत्यंत अमूल्य आहे. या मताच्या स्वातंत्र्यासाठी जगभर अनेक चळवळी झाल्या. अमेरिका , इंग्लड या प्रगत राष्ट्रातील लोकशाही जगातील इतर राष्ट्राच्या तुलनेत बऱ्याच जुन्या आहेत. पण तिथे महिलांना मताचा अधिकार मिळविण्यासाठी चळवळी कराव्या लागल्या. आपल्याकडे मात्र भारत देश प्रजासत्ताक झाला तेंव्हा पासूनच स्त्री, पुरुष दोघांनाही मताचा अधिकार प्राप्त झाला. अशा या आदर्श लोकशाही राष्ट्राचे आपण नागरिक आहोत. त्यामुळे तुमच्या मताचे मूल्य खुप मोठे आहे याची जाणीव ठेवा. आणि ही जाणीव इतरांमध्येही रुजवा.

युवकांचे योगदान देशाच्या विकासामध्ये, लोकशाही बळकट करण्यामध्ये नेहमीच महत्वाचे राहिले आहे. याची जाणीव ठेवून वयाचे 18 वर्षे पूर्ण झाले की मतदानासाठी नाव नोंदणी, मतदानाच्या दिवशी सकाळी अगोदर मतदाना हक्क बजवावा मग दुसरी कामं करावीत. तुम्ही ज्या राष्ट्राचे नागरिक आहात त्याचे नागरिक असण्याचे मूलभूत कर्तव्य मतदान आहे, याची जाणीव ठेवण्याचे आवाहन प्रा. डॉ. अजय पाटील यांनी आपल्या अध्यक्षिय भाषणात केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. सचिन जे. नांदे यांनी केले तर डॉ. मनोज आर. इंगोले यांनी आभार मानले.

आर जे शिवानी आणि देवा यांनी केलं युवकांना बोलतं

मतदार यादीत नाव नोंदविण्याचा कंटाळा करू नका, अगदी मतदानाच्या दिवशीच मतदार यादीत नाव शोधत फिरण्यापेक्षा अगोदरच खात्री करून करून घ्या. मतदार नोंदणीसाठी ‘वोटर हेल्पलाईन’ अँप आहे. घरबसल्या ही सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. त्यात आवश्यक ते कागद पत्र भरण्यासाठी अवघे काही मिनिट लागतात. त्यासाठी अजिबात कंटाळा करू नका. त्याच बरोबर तुम्ही सजग नागरिक आहात, निवडणुकीत काही अयोग्य होत असेल तर ‘सी व्हिजिल’ या अँप मध्ये जाऊन तक्रारही नोंदवा. अशी माहिती दोन्ही आर जें नी सांगितली आणि युवकांनाही बोलते केले. यावेळी  चेतन राखेड, शरद सोनवणे, विनोद शिरसाठ, अमृता सूर्यवंशी  यांनी आपण मतदान जन जागृतीसाठी विविध माध्यमाचा उपयोग करणार असल्याचे सांगितले.

मतदान जागृतीचे प्रभावी पथनाट्य सादर

विद्यापीठातील सामाजिकशास्त्रे प्रशाळेतील विद्यार्थी चेतन राठोड, सौरभ संदांशिव,वैष्णवी कोळी, नम्रता चव्हाण, विजय सुर्यवंशी, अतुल पटेल, वैभवी खारकर, कल्याणी चौरे, विजयराज जाधव या विद्यार्थांनी मतदार जनजागृती या विषयावर पथनाट्य सादर केले. शहरी तसेच ग्रामीण मिश्र बोलीत सादर केलेल्या या नाट्यात मतदानाचे महत्व, ईव्हीएम मशीनचा वापर, मतदार नावनोंदणी, मतदान वेळी केंद्रावर आवश्यक असलेली कागदपत्रे इत्यादी बाबत माहिती सहज सोप्या भाषेत सादर केली.

00000