Home शहरे जळगाव जळगाव जिल्ह्यात दोन दिवसांत होणार राजकीय भूकंप! – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

जळगाव जिल्ह्यात दोन दिवसांत होणार राजकीय भूकंप! – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

0

जळगाव । काँग्रेसच्या मंडळींची हवा गुल झाली असून साठ वर्षे सत्तेत असताना काँग्रेसने जनतेसाठी काहीच केले नाही. त्यामुळे जनता त्यांना कंटाळली आहे. म्हणूनच काँग्रेस-राष्ट्रवादीचा सुपडासाफ होत आहे. जिल्ह्यात दोन दिवसांत मोठा राजकीय भूकंप होणार असून काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज भाजपमध्ये येणार असल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले.

विरोधक आता ईव्हीएम मशीनचा मुद्दा उपस्थित करत आहेत. मात्र, विरोधकांच्या या दाव्यात काहीच तथ्य नाही. बॅलेट पेपरवर जरी निवडणुका झाल्या तरी विजय आमचाच होणार. त्यामुळे विरोधकांनी लोकांच्या व शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलन करावे, असेही महाजन यांनी म्हटलं आहे. लोक मला मुख्यमंत्री होणार का असं विचारतात, मात्र मी मंत्रिपदावरच खुश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत. पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी चांगले काम केले आहे, त्यांना पुन्हा संधी मिळायला हवी, असेही ते या वेळी म्हणाले.

भाजपात येण्यासाठी 50 आमदार इच्छुक
भाजपात येण्यासाठी अनेक नेते इच्छुक असून जिथे आवश्यकता आहे, तिथेच लोकांना पक्षात घेतले जात आहे. सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवण्यासाठी विरोधी पक्षनेता शिल्लक राहायला पाहिजे, असाही टोला महाजन यांनी लगावला.