यवतमाळ, दि. ९ : जागतिक आदिवासी दिनानिमित्त पालकमंत्री संजय राठोड आणि जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आज शहरातील भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी युवराज मेहेत्रे, तहसीलदार डॉ. योगेश देशमुख, पराग पिंगळे यांच्यासह पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
००००
स्वातंत्र्यसैनिकांचा त्याग, योगदान प्रेरणादायी– पालकमंत्री संजय राठोड यांचे प्रतिपादन हुतात्मा स्मारक उमरी येथे क्रांती दिन उत्साहात साजरा पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

यवतमाळ, दि. ९ : यवतमाळ ही संघर्ष आणि स्वाभिमानाची परंपरा लाभलेली भूमी आहे. या भूमीनेही स्वातंत्र्य चळवळीत योगदान दिले असून जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिकांचा त्याग आणि योगदान सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आज, रविवारी केले.
ते बाभूळगाव तालुक्यातील उमरी (शहीद) येथील हुतात्मा स्मारक येथे आयोजित क्रांती दिन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण करून सर्व शहीद क्रांतिवीरांना मानवंदना देण्यात आली.
कार्यक्रमाला शहीद पत्नी संगीता घोटेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, नगराध्यक्ष संगीता मालखुरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी युवराज मेहेत्रे, कार्यकारी अभियंता माधव उघडे, तहसीलदार मीरा पागोरे, गटविकास अधिकारी ढोले, पोलीस निरीक्षक भेंडे, उपअभियंता दीपक निचळ, कनिष्ठ अभियंता कीर्ती रामेकर, स्वातंत्र्यसंग्राम सैनिकांच्या परिवारातील सदस्य विजय माळवी, सुरेश माळवी, सत्यदेव पाळेकर, कैलास सुलबेवार, सतीश कोटमवार, अतुल देशपांडे, कौशल्या रामटेके, नंदू बुटे, हरिभाऊ चव्हाण, शेख हसन शेख चांद, नीरज राऊत, सरपंच सोनाली शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांनी स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्मा यशवंत लुडबाजी पाळेकर, शहीद मधुकर घोटेकर यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक आणि वीरांना अभिवादन केले.
अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले की, आजचा दिवस देशभक्ती आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा देणारा दिवस आहे. इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारताला मुक्त करण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्या सर्व स्वातंत्र्यवीरांमुळे आज आपण स्वतंत्र भारतात स्वाभिमानाने जगत आहोत. आज स्वातंत्र्याचा अमृतकाळ सुरू असून भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक आहे. या देशातील प्रत्येक घटक देशसेवा करत आहे. शेतकरी, शिक्षक, विद्यार्थी, युवक, डॉक्टर, अभियंता, वकील, अधिकारी, कर्मचारी, कामगार आदी सर्वच घटक आपल्या कामातून देशसेवेचे व्रत जोपासत आहेत. देशातील प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणे हीच खरी राष्ट्रसेवा असल्याचेही पालकमंत्री राठोड यांनी सांगितले.

आज क्रांती दिनी जात-पात, धर्म, भाषा आणि प्रांताच्या भिंती बाजूला ठेवून राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देऊया आणि आत्मनिर्भर व विकसित भारत घडवूया, असे आवाहन त्यांनी केले.क्रांती दिन ते स्वातंत्र्य दिन या कालावधीत १ लाख ११ हजार वृक्षलागवडीच्या कार्यक्रमाचा पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते वृक्षारोपण करून शुभारंभ करण्यात आला.यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उमरी येथील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर केले. यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला हरिहर लिंगनवार, श्रीधर मोहोड, उमरीच्या सरपंच सोनाली शेळके, उपसरपंच वंदना धोटे, राजुदास जाधव, गजानन डोमाळे, यशवंत पवार, संजय हातगावकर, प्रद्युम्न जवळकर, आकाश राठोड, संजय रंगे, सुरेश चिंचोळकर, सचिन महल्ले, नितीन पखाले, प्रकाश भूमकाळे, राजू पांडे, गौतम लांडगे, पप्पू पाटील भोयर, कैलास राऊत, वैभव खडतकर, निलेश काळे, अजय डोंगरे, मेघा गिरी, संतोष मिश्रा, श्रीकांत पवार, पराग चौधरी, पवन राऊत, अक्षय कुपाट, मनीष भुते आदी उपस्थित होते.
००००००
निसर्गपुत्रांच्या अंगणात विकासाची नवी पहाट; पालकमंत्री संजय राठोड यांनी कोलाम पोडावर साजरा केला जागतिक आदिवासी दिन
पारंपरिक नृत्य करत भोजनाचाही आस्वाद घेतला
यवतमाळ, दि. ९ : जल, जंगल आणि जमिनीशी एकरूप झालेली संस्कृती, निसर्गालाच दैवत मानणारा निगर्वी भाव आणि खडतर जगण्यातही जपलेली स्वाभिमानाची परंपरा, अशा आदिम संस्कृतीचा गौरव करण्याचा दिवस म्हणजे जागतिक आदिवासी दिन. या औचित्यावर केवळ औपचारिकता न पाळता, यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आज, रविवारी बाभूळगाव तालुक्यातील पिंपरी ईजारा येथील इंदिरानगर कोलाम पोडावर जाऊन संपूर्ण दिवस आदिवासी बांधवांसोबत व्यतीत केला. शासकीय प्रोटोकॉल बाजूला ठेवून जमिनीवर बसून केलेला हा संवाद वंचित घटकाला आत्मसन्मानाची जाणीव करून देणारा आणि सामाजिक न्यायाचा संदेश देणारा संवेदनशील उपक्रम ठरला.
गावात पोहोचताच मोरपिसांचा पारंपरिक टोप परिधान करून पालकमंत्र्यांनी आदिवासी बांधवांसोबत ढोलाच्या तालावर फेर धरला. यावेळी सत्ता आणि जनतेमधील अंतर दूर झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. पोडावरील चावडीवर आदिवासी दैवतांचे दर्शन घेत त्यांनी भगवान बिरसा मुंडा, क्रांतिवीर शामादादा कोलाम, राणी दुर्गावती आणि वीर बापुराव शेडमाके यांसारख्या महामानवांच्या प्रतिमांना अभिवादन केले. आपली बोलीभाषा, जल-जंगलावर आधारित जीवनशैली आणि निसर्गपूजक परंपरा ही मानवी संस्कृतीची खरी मुळे आहेत. तरुणांनी आपल्या कोलामी भाषेचा अभिमान बाळगत आधुनिक जगाशी स्पर्धा करण्यासाठी मराठी व इंग्रजी भाषेचे प्रभुत्वही मिळवावे, असे भावनिक आवाहन त्यांनी यावेळी केले.
चावडीवर भरला जनता दरबार; प्रशासनाला थेट कृतीचे आदेश
पालकमंत्र्यांनी चावडीवर गावकऱ्यांसोबत खाली बसून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. कोलाम समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गावातील प्रलंबित प्रश्नांवर केवळ आश्वासने न देता, उपस्थित अधिकाऱ्यांना तत्काळ अंमलबजावणीचे निर्देश दिले. गावात सुसज्ज अभ्यासिका, वाचनालय आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी थेट बससेवा सुरू करणे, उच्च शिक्षण व परदेशातील शिक्षणासाठी विशेष शिष्यवृत्ती, स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी जलशुद्धीकरण यंत्रे, सामाजिक सभागृह, सांस्कृतिक भवन आणि स्मशानभूमी उभारणीचे प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. महिला बचत गट आणि ग्रामसंघांना आर्थिक मदत देऊन स्थानिक पातळीवर उद्योग-व्यवसायाला चालना देण्याची ग्वाही त्यांनी दिली. आदिवासी पोडावरील समस्यांच्या पाठपुराव्यासाठी विशेष स्वीय सहायकाची नियुक्ती करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमास तहसीलदार मीरा पागोरे यांच्यासह पराग पिंगळे, हरिहर लिंगनवार, राजुदास जाधव, गजानन डोमाळे, यशवंत पवार, संजय हातगावकर, प्रद्युम्न जवळकर, आकाश राठोड, संजय रंगे, सचिन महल्ले, नितीन पखाले, लोकेश इंगोले, दर्शना इंगोले आदींसह विविध पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला, युवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप गाडे यांनी केले, तर संचालन सुरेश चिंचोळकर यांनी केले.
पालकमंत्र्यांनी स्वागत करणाऱ्या महिलांचे पाय धुतले

कार्यक्रमासाठी पोडावर पोहोचल्यानंतर पालकमंत्री संजय राठोड यांचे प्रत्येक घरासमोर ओवाळून स्वागत करण्यात आले. यावेळी काही ज्येष्ठ महिलांनी पाय धुवून पालकमंत्री राठोड यांचे स्वागत केले. तेव्हा त्यांनीही या महिलांचे पाय धुवून त्यांना मातृवंदन केले. या प्रसंगाने उपस्थित महिला भावूक झाल्या आणि त्यांच्या गालावर अश्रू ओघळले. कार्यक्रमस्थळी जात असताना गावातील कौशल महादेव अंजिकर या वृद्ध महिलेने आदिवासी पारंपरिक नृत्याचा फेर धरला. त्यांनी पालकमंत्री संजय राठोड यांनाही नृत्य करण्याची विनंती केली. त्यावेळी पालकमंत्रीही आदिवासी नृत्यावर थिरकले.
काळा चहा, झुणका-भाकरी आणि सामाजिक ऐक्याचा संदेश

आदिवासी संस्कृतीत पाहुण्यांचे स्वागत काळ्या चहाने करण्याची परंपरा आहे. पालकमंत्री संजय राठोड यांनी चावडीवर सर्वांसोबत या काळ्या चहाचा आस्वाद घेतला. त्यानंतर आयोजित स्नेहभोजनात गावकरी आणि अधिकाऱ्यांसोबत जमिनीवर बसून झुणका-भाकरीचे भोजन घेतले. हा प्रसंग सामाजिक ऐक्य आणि बंधुभाव जपणारे उदाहरण ठरले. कार्यक्रमादरम्यान गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सत्कार, महिला भजनी मंडळास भजन साहित्याचे वाटप आणि स्थानिक तरुण खेळाडूंना क्रिकेट किटचे वाटप करून त्यांच्या कौशल्याला प्रोत्साहन देण्यात आले. विविध क्षेत्रांतील प्रमुख पदाधिकारी, ग्रामस्थ आणि महिला या ऐतिहासिक प्रसंगाचे साक्षीदार बनले. सत्ता स्वतः चालून वंचितांच्या उंबरठ्यावर जाते, तेव्हाच सामाजिक न्याय आणि समावेशक विकास या संकल्पनांना खरा अर्थ प्राप्त होतो, अशी प्रतिक्रिया या कार्यक्रमानंतर सर्वत्र उमटली.
००००






















WhatsApp