Home अश्रेणीबद्ध जागतिक संगीत दिन विशेष: सर्व क्षेत्रात जागतिकीकरण होत असताना मग संगीतात का नको ?

जागतिक संगीत दिन विशेष: सर्व क्षेत्रात जागतिकीकरण होत असताना मग संगीतात का नको ?

पुणे : ’फ्युजन’ हा काहीसा कर्णकर्कश्य सांगीतिक प्रकार असल्याचे सांगत नाके मुरडली जात असली तरी  ‘फ्युजन’ कडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत चालला आहे. दोन विभिन्न संगीताच्या मिलाफातून ‘ फ्युजन’ आकाराला येते.  त्या दोन आवाजाचे एकत्रित मिश्रण विचारपूर्वक व्हायला हवे तर त्याचा आस्वाद छान पद्धतीने घेता येऊ शकेल. कोणतेही संगीत हे खरे तर वाईट नसते. फक्त त्या संगीताकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा खुला असायला हवा. जागतिकीकरण सर्व क्षेत्रात होत आहे तर संगीतात का नाही? असा सवाल ’फ्युजन’ चा प्रयोग करणा-या संगीतातील प्रतिष्ठित कलाकारांनी उपस्थित केला आहे. 
    उद्या (21 मे) जागतिक संगीत दिन साजरा होत आहे.  ‘फ्युजन’ ही दोन संगीतांना जोडणारी कडी आहे. ’ भारतीय अभिजात संगीत आणि पाश्चात्य संगीताच्या मिलाफातून ‘ फ्युजन’चे अनेक प्रयोग  ‘ तालचक्र’ किंवा  ‘वसंतोत्सव’ सारख्या महोत्सवाच्या माध्यमातून काही वर्षांपासून पुण्यात होत आहेत.  भारतीय अभिजात संगीतातील काही दिग्गजांकडून या संगीत प्रकाराबददल अनेकदा  टीकेचा सूर आळविला जातो.  या दिनाच्या पाशर््वभूमीवर गेल्या अनेक वर्षांपासून संगीत क्षेत्रात ’फ्युजन’चा प्रयोग करणा-या कलाकारांकडून ’लोकमत’ने  ‘फ्युजन’ कडे पाहाण्याचा दृष्टीकोन जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
    गेल्या 63 वर्षांपासून भारतीय अभिजात संगीत क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटविलेले जागतिक कीर्तीचे गायक पं. अजय पोहोनकर यांनी आपले चिरंजीव अभिजित पोहोनकर कडून  ‘फ्युजन’ चे धडे गिरवत हा नवा बदल स्वीकारला. त्याविषयी सांगताना पं. अजय पोहोनकर म्हणाले, मी पूर्वग्रहदूषित दृष्टीकोन ठेवणारा कलाकार नाही.  ‘फ्युजन’ हे दोन संस्कृतीचे मिश्रण आहे. यात काहीही गैर नाही. पाश्चात्य कलाकार भारतीय संगीतात रस घेतात तर आपण का घेऊ नये? सेक्सॉफोन, ड्रम्स वगैरे सोबत देखील गायलो आहे. एखाद्या बंगाली मुलीचे पंजाबी मुलाशी अफेअर झाले त्यांनी संसार केला तर लोकांना का त्रास व्हावा? कोणतेही काम करणे अवघड आहे नाव ठेवणे सोपे आहे. कलाकाराने शिक्षित व्हायला हवे. दहा लोकांनी एकत्र येऊन बँडवर संगीत वाजवणे म्हणजे  ‘फ्युजन’ नाही. त्यात मेलडी असायला हवी. कोणतीही गोष्ट करायला धाडस लागते. कोणतही संगीत स्वीकारण्याची वृत्ती असायला हवी. 
    सात वर्षांपासून ’तालचक्र’ हा फ्युजनचा कार्यक्रम करणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तबलावादक पं. विजय घाटे म्हणाले,  ‘फ्युजन’ हा सर्जनशीलतेचा भाग आहे. यात  ‘आवाज’ हा महत्वाचा घटक आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत ’शोला जो भडके’ सारख्या गाण्यांमध्ये फ्युजनचा वापर झाला आहे. संगीतकारांनी दोन साऊंड एकत्र केले. वेगवेगळी वाद्ये वापरली. ते आपल्या कानांवर आधीच पडले आहे. पं. रवीशंकर यांनी यहुदी मेनन यांच्याबरोबर फ्युजनचा प्रयोग करून अभिजात संगीताला पाश्चात्य संगीताचा मार्ग मोकळा करून दिला. कुठलेही संगीत चांगल्या रितीने मिश्रण करून आपल्या संगीताच्या संस्काराशी त्याचा मेळ घातला तर कानाला चुकीचे वाटणार नाही. विचार खुले ठेवायला हवेत. 
………
’जग जवळ आल्यामुळे दुस-या टोकाचं संगीत ऐकता येते. आजचे सगळे संगीत हे  ‘फ्युजन’ संगीतच आहे. भारतीय चित्रपट सृष्टी असल्यापासून फ्युजन आहे. फक्त त्याला फ्युजनचे लेबल लागले नाही. पण ते सगळे संगीत आपण आत्मसात केले आहे. अभिजात संगीताचा वेगवेगळ्या जॉनरमध्ये वापर करून सौंदर्य निर्माण करू शकतो- जसराज जोशी, प्रसिद्ध गायक