Home ताज्या बातम्या जात पडताळणी प्रमाणपत्रे आता जलदगतीने मिळणार

जात पडताळणी प्रमाणपत्रे आता जलदगतीने मिळणार

0

मुंबई : राज्यातील अनुसूचित जमातीसाठी जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया अधिक गतिमान व सुलभ होण्यासाठी पालघर, नाशिक, धुळे, किनवट, गोंदिया, यवतमाळ आणि चंद्रपूर अशा सात ठिकाणी नवीन समिती कार्यालये स्थापन करण्यास मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

ठाणे, पुणे, नाशिक, नंदुरबार, औरंगाबाद, अमरावती, नागपूर व गडचिरोली या आठ अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समित्यांच्या कार्यक्षेत्राची पुनर्रचना करण्यात येणार आहे. त्यामुळे आता या आठ पडताळणी समित्यांव्यतिरिक्त पालघर, नाशिक, धुळे, किनवट, यवतमाळ, गोंदिया आणि चंद्रपूर अशा एकूण सात ठिकाणी नवीन अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीची कार्यालये सुरू करण्यास मान्यता देण्यात आली.या समित्यांसाठी आवश्यक असणारा अधिकारी-कर्मचारी वर्ग निर्माण करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे समित्यांकडील प्रलंबित प्रकरणांचा गतीने निपटारा होऊन, विविध व्यवसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना व इतर अर्जदारांना वेळेत प्रमाणपत्र मिळतील, तसेच निवडणूक व सेवा विषयक प्रकरणांचाही वेळेत निपटारा होण्यास मदत होणार आहे.

आदिवासी आश्रमशाळांसाठी अतिरिक्त विज्ञान शिक्षक
राज्यातील आदिवासी उच्च माध्यमिक आश्रमशाळांसाठी विज्ञान शिक्षकांची अतिरिक्त पदे निर्माण करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. १११ शासकीय उच्च माध्यमिक आश्रमशाळांसाठी १११ पदे, तसेच १४३ अनुदानित उच्च माध्यमिक आश्रमशाळांसाठी १४३ पदे अशी एकूण २५४ पदे निर्माण करण्यात येणार आहेत. या उच्च माध्यमिक शिक्षकांची नियुक्ती नियमानुसार प्रशिक्षित पात्रताधारक उमेदवारांमधून, तसेच शासनाने ठरवून दिलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे करण्यात येणार आहे.
भविष्यात उच्च माध्यमिक आश्रमशाळांना श्रेणीवाढ मिळाल्यास, त्या शाळांमध्येदेखील गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र या प्रत्येक विषयासाठी शिक्षण विभागाच्या अस्तित्वात असलेल्या धोरणाप्रमाणे ३ ऐवजी ४ विज्ञान शिक्षकांची पदे मंजूर करण्यासही मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे प्रत्येक विषयासाठी पदव्युत्तर पदवीधारक शिक्षक उपलब्ध होणार आहेत.
आश्रमशाळेत ११वी व १२वीच्या विज्ञान शाखेत शिकणाऱ्या पंचवीस हजारांहून अधिक आदिवासी विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.
‘भिलार : पुस्तकांचे गाव’ ही आता स्वतंत्र योजना
वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी भिलार (जि. सातारा) येथे सुरू करण्यात आलेला ‘पुस्तकांचे गाव’ हा उपक्रम आता नियमित योजना स्वरूपात रूपांतरित करून राबविण्यात येणार आहे. त्यामुळे वाचक-पर्यटकांना या ठिकाणी आणखी सुविधा उपलब्ध होणार आहेत. या निर्णयास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
सातारा जिल्ह्यातील भिलार येथे ४ मे, २०१७ पासून ‘पुस्तकांचे गाव’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षांत या गावाला दीड लाखांपेक्षा जास्त वाचक-पर्यटक आणि मान्यवरांनी भेट दिली. हा वाढता प्रतिसाद लक्षात घेता, या उपक्रमाचे चालू वर्षापासून योजनेत रूपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘पुस्तकांचे गाव’ योजना अस्तित्वात आल्याने अर्थसंकल्पात स्वतंत्रपणे तरतूद करता येईल.

नांदेडच्या गुरुद्वारास अनुदानापोटी ६१ कोटी रुपये

राज्य शासनाकडून नांदेड गुरुद्वारा बोर्डास गुरू-त्ता-गद्दी त्रिशताब्दी सोहळ्यासाठी बिनव्याजी स्वरूपात देण्यात आलेली ६१ कोटी रुपयांची रक्कम अनुदानामध्ये रूपांतरित करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. श्री गुरू गोविंदसिंगजी महाराज यांच्या गुरू ग्रंथ साहिब या ग्रंथास ३०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त नांदेड शहरात २००८ मध्ये गुरू-त्ता-गद्दी त्रिशताब्दी सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी गुरुद्वारा बोर्ड, गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हजुर अबचलनगर साहिब, नांदेड यांना बिनव्याजी स्वरूपात ६१ कोटी रुपयांची रक्कम देण्यात आली होती. ही रक्कम अनुदानात रूपांतरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता ही रक्कम शासनास परत करण्याची गरज असणार नाही.