काळेगाव (जालना): कापसाचे पीक जमिनीच्यावर आल्यानंतर रानटी प्राण्यांपासून त्याचे संरक्षण करावे लागते. पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेतामध्ये उघड्यावर झोपलेल्या 25 वर्षीय तरुणाचा खून केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. अमोल उर्फ नारायण म्हस्के (वय २५, रा. दुधना काळेगाव, ता. जालना) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
जालना शहरापासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर दुधना काळेगाव हे तीन हजार लोकवस्तीचे गाव आहे. गावाच्या सुरुवातीलाच अमोल म्हस्के यांचे घर आहे आणि त्यांची शेती त्यांच्या घरापासून २ किलोमीटर अंतरावर आहे. आठ-दहा दिवसांपूर्वी पाण्यावर लावलेली सरकी आता जमिनीच्यावर आली आहे. त्यामुळे ही कोवळीपिके परिसरात असलेली हरणे, आणि इतर प्राणी खाऊन नासधूस करतात. त्यामुळे अमोल म्हस्के हा गोठ्यामध्ये न झोपता साडे दहा वाजताच्या सुमारास शेतात झोपण्यासाठी गेला होता. पहाटे त्याचा फोन उचलला गेला नाही आणि काही निरोप आला नाही. त्यामुळे त्याच्या जोडीदाराने बाजावर झोपलेल्या अमोलला जाऊन हलविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असल्यामुळे खून झाला असल्याचे निदर्शनास आले .
दरम्यान, जालना तालुका पोलिसांनी सकाळी 9 वाजेच्या सुमारास घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी खिरडकर यांनी घटनास्थळाला भेट दिली. तसेच श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. शेजारीच असलेल्या गोठ्यापर्यंत हे श्वान पथक गेले आणि परत आले. संशयाच्या आरोपावरून पोलिसांनी या गोठा मालकाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून लाकडी काठ्या, लोखंडी रॉड, जप्त केले आहेत. मृत अमोल कोल्हेच्या कपाळावर धारदार शस्त्राने मारहाण केल्याच्या खुणा स्पष्ट दिसत आहेत. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जालना येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
तीन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते .
अमोल उर्फ पप्पू म्हस्के याचा दुधना काळेगाव या गावापासून जवळच असलेल्या सामनगाव येथील मुलीशी तीन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. अमोलचे वडील नारायणराव मस्के हे आषाढी वारीसाठी गावातीलच एका दिंडीसोबत पंढरपूरकडे निघाले होते. रस्त्यात रांजणगाव जवळच त्यांना ही दुःखद घटना कळविण्यात आली. आणि तेथूनच या वारकऱ्यांचे पाय घराकडे परतले. त्यांचा संपूर्ण परिवार वारकरी संप्रदायाचे आहे.
बाजेवरच नेला मृतदेह –
खाली जमिनीवर उभ्या पिकाच्या बाजूलाच बाज टाकून झोपलेल्या अमोलचा बाजेवर खून करण्यात आला.