Home गुन्हा जालन्यात गावठी पिस्तूल येतात कोठून ?; घृष्णेश्वर चौकात पिस्तुलासह दोघे जेरबंद

जालन्यात गावठी पिस्तूल येतात कोठून ?; घृष्णेश्वर चौकात पिस्तुलासह दोघे जेरबंद

0

जालना : गावठी पिस्तूल वापरणाऱ्या दोघांना सदरबाजार पोलिसांनी जेरबंद केले. ही कारवाई सोमवारी पहाटेच्या सुमारास जालना शहरातील घृष्णेश्वर चौकात करण्यात आली. पोलिसांनी पिस्तूल, कारसह एकूण १ लाख ८० हजार ४५० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, पोलिसांनी यापूर्वीच अटक केलेल्या सुनील वनारसे याने या पिस्तूलचा पुरवठा केल्याचे समोर आले आहे.

गावठी पिस्तूल बाळगणारा युवक एका कारमधून जात असल्याची माहिती सदरबाजार पोलीस ठाण्याचे पोनि संजय देशमुख यांना मिळाली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांना माहिती देऊन त्यांच्यासह देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी शहरातील घृष्णेश्वर चौकात सापळा रचला. त्यावेळी मंठा चौफुलीकडून भरधाव वेगात आलेल्या कारला (क्र.एम.एच.२२- ए.एम.१६१३) थांबविण्यात आले. आतील विकास जयराम शिंदे (रा. पांगारकर नगर, जालना), किशोर दामोदर घुगे (रा. स्वामी समर्थ नगर, जालना) या दोघांची चौकशी केली. त्यावेळी विकास शिंदे याच्याकडे एक गावठी पिस्तूल आढळून आले. त्यांच्याकडील पिस्तूलसह कारसह मोबाईल, काठी व इतर साहित्य असा एकूण १ लाख ८० हजार ४५० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पितस्तूल खरेदीबाबत विचारणा केल्यानंतर ती पिस्तूल सुनील वनारसे (रा. नूतन वसाहत, जालना) याच्याकडून ३० हजार रूपयांमध्ये खरेदी केल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी वरील तिघांविरूध्द सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, पोनि संजय देशमुख, पोउपनि रमेश रूपेकर, कर्मचारी संदीप बोन्द्रे, समाधान तेलंग्रे, सुधीर वाघमारे, योगेश पठाडे, साई पवार, सोपान क्षीरसागर, फुलचंद गव्हाणे, स्वप्नील साठेवाड, जतीन ओहोळ यांच्या पथकाने केली.

पळून जाण्याचा प्रयत्न
पोलिसांनी घृष्णेश्वर चौकात नाकाबंदी केली होती. पोलिसांनी केलेली नाकाबंदी पाहून कार चालकाने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची काटेकोर नाकाबंदी असल्याने ते दोघे पोलिसांच्या जाळ्यात अडकले.

पिस्तूल आयातीचा पत्ता मिळेना
जालना पोलिसांनी गत काही महिन्यात जवळपास १४ गावठी पिस्तूल जप्त केल्या आहेत. यातील अनेक पिस्तूल या सुनील वनारसे याने विक्री केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. वनारसे विरूध्द मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली असून, तो जेलमध्ये आहे. मात्र, पोलिसांच्या विविध गुन्ह्यातील तपासामध्ये वनारसे याने किंवा इतर आरोपींनी या गावठी पिस्तूल आणल्या कोठून याचा पत्ता पोलिसांना लागेला नाही. काही राज्यात पोलिसांची पथकेही गेली. मात्र, मिळालेली माहिती चुकीची असल्याचे तेथे गेल्यानंतर पथकाच्या लक्षात आले.