Home ताज्या बातम्या जाळे लावले रानडुकरासाठी, अन् अडकला बिबट्या

जाळे लावले रानडुकरासाठी, अन् अडकला बिबट्या

बीड जिल्ह्यात ऊसामध्ये नासधूस करणार्‍या रानडुकराला पकडण्यासाठी गावातील तरूणांनी जाळे लावले. जाळ्यात काही तरी अडकले, बहुतेक रानडुक्करच असावे, आपल्या प्रयत्नाला यश आले असे समजून खुष झालेले ते तरूण लावलेल्या जाळ्यापशी गेले तर जाळ्यात बिबट्या अडकलेला दिसताच मोठी धांदल उडाली. घटनास्थळावरून तरूणांनी पळ काढला.

आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथे तलावाशेजारी अशोक आंधळे यांचा तीन एकर ऊस आहे. ऊसाच्या फडात अज्ञात लोकांनी रानडुक्कर पकडण्यासाठी जाळे लावले असता जाळ्याध्ये रानडुक्कराऐवजी जाळ्यामध्ये बिबट्या अडकल्याचे दिसताच शिकार करणार्‍या अज्ञात तरूणांनी धुम ठोकली. घटनेची माहिती ग्रामस्थांना मिळाली. बिबट्याला पकडण्यासाठी संपूर्ण गाव एक झालं. तीन एकर ऊसाच्या शेतीला वेढा दिला.

बिबट्या काही बाहेर येईना, बिबट्या बाहेर येण्यासाठी फटाके फोडले, हलगी वाजवली. हा खेळ बुधवारी दिवसभर सुरू होता. बिबट्या मात्र दबा धरून बसल्याने लिंबोडी, देवीलिमगाव, कडा, केरूळ, आंधळवस्ती, पाटण, खिळद, चाटेगोटे, महाजनवाडी येथील नागरिक भयभीत झाले आहेत. घटनेची माहिती कळताच वनाधिकार्‍यांनी बिबट्याला पकडण्यासाठी कर्मचार्‍यांना पाठवले. ज्या ठिकाणी बिबट्याचे दर्शन झाले तो परिसर कोरोनाचा रूग्ण आढळळ्याने बफरझोनमध्ये आहे. अनिश्चित काळासाठी बंद आहे. आता वनविभाग पिंजरा लावून बिबट्याला पकडणार असल्याचे समजते.