Home ताज्या बातम्या जिंकले म्हणून नव्हे, तर लढल्यामुळं शरद पवार सोशल मीडियावर ‘ट्रेंड’

जिंकले म्हणून नव्हे, तर लढल्यामुळं शरद पवार सोशल मीडियावर ‘ट्रेंड’

0

मुंबई : लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा विजय विरोधीपक्षांसाठी दुर्बल करणारा ठरला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या झंझावातात भाजपने केंद्रात स्वबळावर सत्तास्थापन केली. त्यामुळे आता मोदी-शाह यांना कोणीही आव्हान देऊ शकणार नाही, अशी स्थिती झाली होती. मात्र महाराष्ट्रात 79 वर्षीय शरद पवारांनी निकराची झुंज देत मोदी-शाह यांचे आक्रमण परतावून लावत राष्ट्रवादी आणि काँग्रेसला शिवसेनेच्या साथीत सत्तेत आणले. पवारांचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. त्यांचे हे कौतुक विजयामुळं नव्हे तर त्यांनी दाखवलेल्या लढाऊ बाण्यामुळं होत आहे.  सोशल मीडियावर प्रत्येक तिसरी पोस्ट सध्या शरद पवार यांच्यासंदर्भातील दिसून येते. आधीच निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेऊन पवारांनी महाराष्ट्र पिंजून काढला होता. त्यातच त्यांची साताऱ्यातील अविस्मरणीय ठरलेली पावसातील सभा तरुणांना प्रेरणा भारावून टाकणारी ठरली. पवारांनी घेतलेल्या लढण्याच्या भूमिकेमुळे नाउमेद झालेल्या काँग्रेस उमेदवारांमध्ये देखील उत्साह निर्माण झाला. त्यामुळंच की काय, 20 च्या आत येईल असा अंदाज असताना काँग्रेसने पुन्हा एकदा चाळीशी गाठली. दरम्यान विधानसभा निवडणुकीत शरद पवारच केंद्रस्थानी होते. भाजपने राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना आपल्यासोबत घेत राष्ट्रवादीचे आव्हान संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र पवारांनी एकाकी झुंज देत राष्ट्रवादीला गेल्यावेळपेक्षा अधिक जागा मिळवून दिल्या. तसेच सोडून गेलेल्यांना धडा शिकवला. एवढच नाही, तर एका पाठोपाठ एक चाल खेळत प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या भाजपला सत्तेपासून दूर केले. त्यामुळे पवारांचे त्यांच्या समर्थकांकडून कौतुक होत आहे.