अलिबाग,दि.27 (जिमाका):- मानवी आयुष्य हे खूप सुंदर आहे. यात भौतिक सुखाच्या मागे न लागता जितक्या गरजा कमी, तितके आयुष्य सुखी, हा सुखाचा मूलमंत्र पूर्वांचल राज्यातील लोकांची आयुष्य जगण्याची पद्धत अभ्यासली की मिळतो, असे प्रतिपादन लेखक तसेच पत्र सूचना कार्यालयाचे माजी अधिकारी शाहू पाटोळे यांनी आज येथे केले.
राजा राममोहन रॉय यांची पुण्यतिथी व जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग येथे प्रसारमाध्यम प्रतिनिधींसोबत अनौपचारिक संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे कोकण विभागीय उपसंचालक डॉ.गणेश मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री.पाटोळे यांनी पूर्वांचल राज्यातील आपले अनुभव सांगताना तेथील समाज व्यवस्था, संस्कृती, राहणीमान, आहार-विहार, निसर्ग सौंदर्य, प्रशासकीय व्यवस्था, तेथील पत्रकारिता आदी विषयांबाबत उपस्थित प्रसारमाध्यम प्रतिनिधींना अगदी दिलखुलासपणे माहिती दिली. या संवादातून पूर्वांचल राज्याबद्दल अतिशय उपयुक्त माहिती मिळाल्याबाबत सर्वांनी आनंद व्यक्त केला.
सुरुवातीस उपसंचालक डॉ.मुळे यांनी उपस्थितांना शाहू पाटोळे यांच्या कार्याविषयीची माहिती दिली. तसेच उपस्थित प्रसारमाध्यम प्रतिनिधींचा परिचय करून दिला.
यावेळी उपस्थित मान्यवरांना जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी जिल्हा प्रशासनाचे विविध उपक्रम प्रतिबिंबित होणारे परिवर्तन कार्यपुस्तिेकेचे तीनही अंक भेट दिले व शेवटी उपस्थित सर्वांचे आभार मानले.