Home ताज्या बातम्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पशूसंपत्तीची उत्तम काळजी घेत आहेत पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी

जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पशूसंपत्तीची उत्तम काळजी घेत आहेत पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी

0

अलिबाग,जि.रायगड :  जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक बाबीखाली दूध, मटन,अंडी,जनावरांचे खाद्य, वैरण आणि पशुवैद्यकीय दवाखाने, पेटशॉप या बाबींचाही समावेश आहे.  पशूपालकांचा व्यवसाय पूर्ववत राहावा, त्यांच्याकडील उत्पादित केलेले दूध, मटन,अंडी इत्यादींना मागणी असल्याने बाजारपेठेपर्यंत वाहतूक करण्यासाठी जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी लॉकडाऊनच्या काळात जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, रायगड डॉ.सुभाष म्हस्के यांना प्राधिकृत केले असून जिल्ह्यातील जवळपास 1 हजार 300 पशूपालकांना दूध, मटन,अंडी,जनावरांचे खाद्य, वैरण इत्यादी वाहतूकीसाठी सुलभता निर्माण झाली आहे.  काही दूधउत्पादक पशूपालकांकडे शिल्लक दूध राहिल्याने पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांच्या मदतीने या दूधाची लोणावळा, पनवेल,खारघर येथे विक्री करण्यात आली.

            लॉकडाऊनच्या काळात करोना विषाणूचा प्रसार होऊ नये, यासाठी पशूपालकांना मास्क, सॅनिटायझर व सोशल डिटन्सिंग ठेवणे तसेच ताप, सर्दी, खोकला आल्यास तात्काळ नजिकच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार करण्याबाबत सूचना देऊन पशूसंवर्धन विभागाकडून वाहतूक प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत.  हे वाहतूक प्रमाणपत्र क्षेत्रीय अधिकाऱ्यांची खातरजमा करुन व प्रत्यक्ष संपर्क टाळून संबंधितांना व्हॉटस्अप व ई-मेलद्वारे देण्यात आले.  प्रमाणपत्राचा गैरवापर होणार नाही, याकरिता शासनाने विहित केलेल्या वेळापत्रकानुसार पशूपालकांनी प्रमाणपत्राचा वापर करावा, असे त्यांना सूचित करण्यात आले आहे.  पशूपालकांना पोलीस यंत्रणेमार्फतही योग्य ते सहकार्य मिळत आहे.  यामुळे पशूपालकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

            जिल्ह्यातील भटके कुत्रे, गाई, बैल व वासरे इत्यादी प्राण्यासाठी चारा पाण्याची व्यवस्था सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. याकरिता तालुकास्तरावर सहा.आयुक्त, पशुसंवर्धन (गट-अ), पंचायत समिती स्तरावरील पशुधन विकास अधिकारी (गट-अ/ब), सहा.पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक यांना कामाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती, जिल्हास्तरीय प्राणी क्लेश समिती सदस्य व प्राणी मित्र तसेच प्राणी कल्याणाकरिता सतत झटणाऱ्या  व्यक्ती यांचीही मदत घेण्यात येत आहे.  कंत्राटी कुक्कुट व्यावसायिक यांनीही वस्तू स्वरुपात मागणीनुसार मदत करण्यास संमती दर्शविली आहे.  काही तालुक्यातील प्राणी मित्र संचारबंदीच्या काळात भक्टक्या कुत्र्यांना सायंकाळच्या वेळेस जेवण देत आहेत.   तसेच श्रीमती सीमा शांतीलाल पुनमिया यांनी पंख फाऊंडेशनच्या वतीने मुक्या प्राण्यांची भूक शमवण्यासाठी फूड बँकची स्थापना केली आहे. पशूपालकांनी शक्यतो आपली जनावरे मोकाट सोडू नये, असेही जिल्हा पशूसंवर्धन विभागाकडून पशूपालकांना अगोदर सूचित करण्यात आले आहे. 

माथेरान या पर्यटनस्थळी जवळपास 450 घोड्यांचा वाहतुकीसाठी वापर केला जातो.   जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या पुढाकारातून या घोड्यांसाठी डॉ.जयराम यांच्या मदतीने प्राथमिक स्वरुपात दि.15 एप्रिल रोजी 300 किलो गोदरेज कंपनीचे पौष्टिक अश्वखाद्य वाटप करण्यात आले आहे.