Home ताज्या बातम्या जिल्हाधिकाऱ्यांसह वळसे पाटील शेताच्या बांधावर

जिल्हाधिकाऱ्यांसह वळसे पाटील शेताच्या बांधावर

0

अतिवृष्टीग्रस्त पिकांची केली पाहणी तातडीने मदत देण्याचे आश्‍वासन

टाकळी हाजी-चांडोह (ता. शिरूर) येथे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची तसेच पडझड झालेल्या घरांची आमदार दिलीप वळसे पाटील व जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी पाहणी केली. नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.

शिरूर तालुक्‍यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे महसूल व कृषि विभागाने सरसकट पंचनामे करावेत, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून तहसीलदार व कृषि अधिकाऱ्यांनाही तशा सूचना दिल्या असल्याचे विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

चांडोह (ता. शिरूर) येथे वळसे पाटील यांनी बाधित पिकांची प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी केली. यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, आंबेगाव बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे यांसह जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, जिल्हा कृषि अधिक्षक बाळासाहेब पलघडमल, प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख, तहसीलदार एल. डी. शेख. उपसरपंच कचर पानमंद, शिरुर बाजार समितीचे संचालक संपत पानमंद, संपत वळसे, पोलीस पाटील सुदर्शन भाकरे, बाबाजी वडने आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

वळसे पाटील म्हणाले की, मागील आठवडाभरापासून अवकाळी पावसामुळे तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. घरे तसेच बाजरी, कांदा, ज्वारी व मका या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तलाठी, कृषि सहाय्यक व ग्रामसेवक यांनी एकत्रित शेतकऱ्यांच्या बाधित पिकांची पाहणी करुन पंचनामे करावेत. पिकविमा घेतलेल्या व पीकविमा नसलेल्या सर्वच शेतकऱ्यांच्या पिकांचे सरसकट पंचनामे करावेत.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम म्हणाले की, अतिवृष्टीमूळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणार असून, घर उद्‌ध्वस्त झालेले शेतकरी अंकुश शिंदे या शेतकऱ्याला तातडीने आर्थिक मदत देण्यात येणार आहे.

  • राज्यात अतिवृष्टीने नुकसान झालेले शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. ते दुर्लक्षित राहू नयेत. सरसकट पंचनामे करुन नुकसान भरपाईबाबत शासनाने लवकर निर्णय घेणे अपेक्षित आहे.
    -दिलीप वळसे पाटील, आमदार