सोलापूर,दि.15 (जिमाका) : विकासाच्या दिशेने वाटचाल करणारा सोलापूर जिल्हा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात प्रगती करीत आहे. जिल्ह्याचा विकास जलद गतीने व्हावा, यासाठी सर्व मिळून प्रयत्न करू. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाला सक्रिय लोकसहभाग द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात जिल्हाधिकारी श्री. शंभरकर बोलत होते. त्यांनी उपस्थित सर्वांना आणि जिल्हावासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी स्वातंत्र्य सैनिक दत्तात्रय हिबारे, स्वातंत्र्य सैनिक पत्नी मथुराबाई भगरे, लक्ष्मीबाई तुकाराम चटके, सन्मुखबाई मेटी, मनपा आयुक्त पि. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
श्री. शंभरकर म्हणाले, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जात आहे. जिल्हा नियोजन समितीमार्फत यथायोग्य नियोजन करून जिल्ह्याच्या विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. आपण स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन साजरा करत आहोत. स्वातंत्र्य संग्रामाचे हे पर्व अत्यंत खडतर, हालअपेष्ठापूर्ण व संकटांनी भरलेले होते. यासाठी अनेक स्वातंत्र्यसेनानींनी आपल्या घरादाराचा त्याग केला. ब्रिटीशांच्या लाठ्या झेलल्या, प्रसंगी अनेक दिवस कारावास भोगला. काहींनी तर स्वतंत्र भारताचे स्वप्न अस्तित्वात आणण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्याप्रती श्री. शंभरकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात जिल्ह्यातील स्वातंत्र्य सेनानीने दिलेले योगदान हे खूप मोठे आहे. ब्रिटीशांचा विरोध करताना सोलापूरातील अब्दुल रसुल कुर्बान हुसेन, मल्लप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे आणि श्रीकिसन सारडा या चार सुपुत्रांनी प्राणांचे बलिदान दिले. स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतलेल्या सुपुत्रांची यादी खूप मोठी आहे त्या सर्व ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सेनानीचे बलिदान व त्याग यामुळे आपला ऊर भरून येतो, असेही ते म्हणाले.
दि.4 मे 1930 च्या दरम्यान महात्मा गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ तत्कालीन परिस्थितीत सोलापुरात रोज निदर्शने व उग्र स्वरूपाचे मोर्चे निघत होते. तत्कालिन कलेक्टरने गोळीबाराचा आदेश दिल्याने अनेक नागरिकांचा मृत्यू झाला होता. अशा या जुलमी ब्रिटीश राजवटीविरोधात सोलापूरकरांनी उठाव केल्याने दि.9 ते 12 मे 1930 या कालावधीत विविध ब्रिटीश राज्यकर्ते सोलापूर शहर सोडून निघून गेले होते व सोलापूर काही दिवसांसाठी पारतंत्र्यातून मुक्त झाले होते. देश पारतंत्र्यात असताना अशा प्रकारचे स्वातंत्र्य उपभोगणारे सोलापूर एकमेव शहर होते, असेही ते म्हणाले.
२६ जानेवारी १९५० रोजी देशाने संविधान स्वीकारले व देश प्रजासत्ताक झाला. यामुळे आज सर्व नागरिकांना समान न्याय देणारा भारत देश संविधानामुळे संपूर्ण जगात आदर्श राज्य व्यवस्थेचे प्रतीक ठरलेला आहे. समाजवाद, धर्मनिरपेक्षता व राष्ट्रीय एकात्मता हे आपल्या राज्यघटनेची प्रमुख वैशिष्ट्य आहेत. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायप्रियता या संविधानातील तत्वाचे पालन करुन या देशाची एकता अबाधित आणि अखंड राहण्यासाठी कटिबद्ध होण्याचे आवाहन त्यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या गौरवशाली पर्वानिमित्त जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, क्रांतिकारक, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे या उद्देशाने ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत देश प्रेमाची ज्योत कायम तेवत रहावी यासाठी दिनांक 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज फडकावून राष्ट्रध्वजाबद्दल प्रत्येकाच्या मनात असलेली आदराची भावना व्यक्त होत आहे. यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासनामार्फत, जिल्ह्यामध्ये सुमारे 7 लाख तिरंगा झेंडे उपलब्ध करून दिल्याचेही ते म्हणाले.
जिल्ह्यात 9 ते 17 ऑगस्ट या कालावधीत स्वराज्य महोत्सवांतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. या उपक्रमात समाजातील सर्व स्तरातून प्रतिसाद मिळत आहे. आझादी का अमृत महोत्सवांतर्गत 20 अमृत सरोवरच्या ठिकाणी स्वातंत्र्यदिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिक, स्वातंत्र्यसैनिक किंवा त्यांचे वारस यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. अमृतमहोत्सव साजरा करीत असताना विविध आव्हाने आपण सक्षमपणे हाताळत आहोत. नव्या पिढीच्या माध्यमातून आपला देश प्रगतीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या कक्षा रुंदावत वाटचाल करीत आहे. प्रशासनामार्फत तसेच विविध विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ या पिढीला प्रगतीसाठी करून देण्यास जिल्हा प्रशासन कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपल्या देशाने व राज्याने सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, संस्कृतिक क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती केली आहे. सर्वसामान्य नागरिकांसह समाजातील मागासवर्गीय व दुर्बल घटकांतील व्यक्तींची उन्नती व्हावी, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन विकासाच्या अनेक योजना कार्यक्षमपणे राबवित असून शासन कल्याणकारी राज्याचे ब्रीद साध्य असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या 75 वर्षात शेतीमधील अभिनव प्रयोग, उद्योग व्यवसायातील क्रांतिकारक बदल, शिक्षण व्यवस्थेतील आमुलाग्र बदल, प्रशासनातील दर्जेदार सुधारणा आणि आधुनिक तंत्रज्ञान व विज्ञान या जोरावर भारत जागतिक स्तरावर यशस्वी ठरत आहे. कोविड काळात भारताने शेजारील व मित्र राष्ट्रांना भारतीय शास्त्रज्ञांनी बनवलेल्या लसींचा पुरवठा करून विश्वबंधुत्वाची भूमिका निभावली आहे. जिल्ह्यात कोरोना लसीकरणाबाबत नागरिकांनी जागरूक राहून लसीकरण करून घेतले आहे. 18 वर्षांवरील पहिला डोस सुमारे ३० लाख नागरिकांनी तर दुसरा डोस 23 लाख नागरिकांनी घेतला आहे. तसेच नियमानुसार बुस्टर डोस देखील उपलब्ध करून देत आहोत. नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेण्याचे आवाहन श्री. शंभरकर यांनी केले.
यावेळी तंबाखू मुक्तीची सर्वांना शपथ देण्यात आली. जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांच्या हस्ते नक्षलग्रस्त भागात उत्कृष्ठ कामगिरी केल्याने राष्ट्रपती यांचे शौर्यपदक मिळालेल्या पोलीस उपनिरीक्षक महारूद्र बबन परजने यांचा सन्मान केला. तसेच सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आरोग्य, स्वच्छता क्षेत्रात काम केलेले नेहरू युवा केंद्राचे इम्रान मंगलगिरी, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत काम केलेल्या संस्थांमध्ये मोहोळ ग्रामीण रूग्णालयाचे डॉ. श्रीमती बाबर आणि नवजीवन बाल रूग्णालयाचे डॉ. शहा यांचा सन्मान करण्यात आला.
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेले विद्यार्थी सागर लांडे, ओम पाटील यांचाही गौरव जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी केला.