सातारा, दि.२६ : कृषी, उद्योग व पायाभूत सुविधांना गती देण्याचा कार्यक्रम १०० दिवसांमध्ये प्राधान्याने हाती घेण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील गडकिल्ले संवर्धन, पर्यटन यांनाही चालना देण्यात येत आहे. जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांना गती देण्यात येत असून सिंचनासाठी पाणी देण्यास शासन कटीबद्ध आहे, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
सातारा जिल्हा सर्वांगिण विकासीत करुन राज्यात आदर्शवत करण्यासाठी आपण व जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी कटीबद्ध आहोत. आपला देश महासत्ताकडे वाटचाल करित आहे. यामध्ये महाराष्ट्रही मागे नाही. महासत्ता होण्यासाठी सर्वांनी आपले योगदान द्यावे, असेही आवाहन पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी केले.
येथील छत्रपती शाहू क्रीडा संकुलात प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला, त्यावेळी ते बोलत होते. ध्वजवंदनानंतर पोलीस विभागाच्या वतीने मानवंदना दिली. त्यानंतर त्यांनी पोलीस व्हॅनमधून विविध पथकांचे निरीक्षण केले. त्यात पोलीस, गृहरक्षक दल, विविध शाळांची आरएसपी, एनसीसी, स्काऊट गाईडची मुले व मुलींच्या पथकांचा समावेश होता. प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम विविध सांस्कृतीक कार्यक्रमांनी अत्यंत उत्साहात झाला.
मेरे देश की धरती हे समूहगीत, राजं आलं जिंकूनी हे समूह नृत्य आणि शिवकालीन युद्ध कला या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या सोहळ्यास जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, राज्य शासनाने राज्याच्या सर्वांगिण विकासासाठी १०० दिवसांचा विविध क्षेत्रांसाठी कृती कार्यक्रम हाती घेतला असून अनेक प्रकल्पांना याद्वारे गती देण्यात येत आहे. परकीय गुंवणूक वाढवून उद्योग क्षेत्राच्या प्रगतीचे सुकाणु हाती घेण्यात आले आहेत. दावोस येथून १५ लाख कोटी रुपयांच्या परकिय गुंतवणूक प्रकल्पांबरोबर राज्य शासनाने करार केला आहे. सातारा जिल्ह्यात कृषी आणि उद्योग याबरोबरच विविध पर्यटन प्रकल्पांना चालना देण्यात येत आहे. यामध्ये मुनावळे, कोयनानगर, रासाटी या ठिकाणी जल क्रीडा प्रकल्प, कास पुष्पपठार, सह्याद्री वाघ्र प्रकल्प या सर्वांना चालना देण्यात येत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी देण्यात येत आहे. सन २०२४-२०२५ साठी अधिकाचा निधी मिळण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांची भेट घेण्यात येणार आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, जिल्हा नियोजन विकास आराखड्याच्या माध्यमातून आलेला सर्व निधी खर्च करण्यात व दर्जेदार विकास करण्यात सातारा जिल्हा अग्रेसर आहे. आदर्श प्राथमिक आरोग्य केंद्र व माझी शाळा आदर्श शाळा यासारख्या सातारा जिल्ह्याच्या योजनांचे राज्यभर कौतुक होत असून या योजना राज्यासाठी आदर्शवत ठरत आहेत. या दोन्ही उपक्रमांसाठी १५३ कोटींची तरतूद जिल्हा नियोजन आराखड्याच्या माध्यमातून करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित राहत असतानाच पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच शहीद कर्नल संतोष महाडिक स्मृती उद्यान येथे पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
राष्ट्रध्वजारोहण व राष्ट्रगीत आणि राज्यगीता नंतर अत्यंत शिस्तबद्ध व नेटके असे परेड संचालन आणि चित्ररथ सादरीकरण झाले. यामध्ये पर्यटन विभागाचा पर्यटन रथ, लोकनेते बाळासाहेब देसाई बहुउद्देशीय कृषी संकुल काळोली, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, लखपती दीदी योजना, आदर्श प्राथमिक शाळा, आदर्श प्राथमिक आरोग्य केंद्र, माजी वसुंधरा अभियान पंचायत समिती खंडाळा, फळांचे गाव धुमाळवाडी, सूर्या योजना- मन्याची वाडी, मांगर- मधाचे गाव, बांबू लागवड अभियान, प्रजापिता ब्रह्मकुमारी नारी सशक्तिकरण यांच्या चित्रथाचा समावेश होता. शिक्षण प्रसारक संस्था करंजे पेठ सातारा, श्रीपतराव हायस्कूल करंजे पेठ सातारा आणि संस्थेच्या इतर शाळांचा मिळून समूहगीत, समूह नृत्य, शिवकालीन युद्ध कला यांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पालकमंत्री शंभूराजे देसाई यांना संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यघटनेची प्रास्ताविका भेट दिली. या कार्यक्रमात पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. श्रीमती वीर पत्नी पूजा शंकर उकलीकर यांना ताम्रपट देऊन गौरविण्यात आले. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत सन २०२३-२४ चे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेतील पुरस्कार अनुक्रमे कवठे- तालुका खंडाळा, दरेवाडी – तालुका वाई, चोरांबे -तालुका जावळी यांना वितरित करण्यात आले.
पाणी गुणवत्ता पिण्याचे पाणी व सांडपाणी व्यवस्थापन यातील स्वर्गीय वसंतराव नाईक पुरस्कार खटाव तालुक्यातील वरुड ग्रामपंचायतीला व कराड तालुक्यातील खोजेवाडी ग्रामपंचायतीला देण्यात आला.
शौचालय व्यवस्थापनातील स्व.बाबासाहेब खेडकर पुरस्कार सातारा तालुक्यातील धोंडेवाडी ग्रामपंचायतला देण्यात आला. मान्याची वाडी ता. पाटण, बनवडी ता कराड यांना राज्यस्तर पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सन्मानपत्र देण्यात आले. कविता उत्तम महांगडे यांना गुणवंत मार्गदर्शक ,जाधव सृष्टी ज्ञानेश्वर यांना गुणवंत महिला खेळाडू, यासार असिफ मुलानी यांना गुणवंत पुरुष खेळाडू , विक्रम जिजाबा शेंडगे यांना गुणवंत दिव्यांग खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.
गुराणूक प्रमेय प्राविण्य प्राप्त शाळांना प्रोत्साहन पर अनुदान देण्याच्या योजनेअंतर्गत १४ वर्षे वयोगटात आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल सातारा, गुरुकुल स्कूल सातारा, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल सातारा यांना प्रोत्साहनपर अनुदान वितरित करण्यात आले. १७ वर्षे वयोगटात मुदोजी हायस्कूल व जुनियर कॉलेज फलटण के एस डी शानबाग विद्या सातारा विद्यालय सातारा श्री संत गाडगे महाराज आश्रम शाळा खराडेवाडी यांना अनुदानित करण्यात आले तर १९ वर्षे वयोगटात लालबहादूर शास्त्री महाविद्यालय सातारा , यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा, सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज कराड यांना अनुदानित करण्यात आले. भिमाबाई आंबेडकर कन्या महाविद्यालय सातारा येथील विद्यार्थिनी प्राजक्ता शितलकुमार स्वामी खगोलशास्त्रज्ञ हिचा सत्कार करण्यात आला . प्रतीक भोसले आणि ऋषिकेश ढाणे यांना आदर्श शेतकरी म्हणून गौरविण्यात आले. या कार्यक्रमात अॅग्रिस्टक योजना अंतर्गत सहभागी झालेल्या व शेतकरी ओळख क्रमांक तयार झालेल्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. शालेय शिक्षण व क्रीडा विभागा अंतर्गत वीर गाथा प्रकल्प ४.० अंतर्गत अंतर मारुती गव्हाणे, वरद संतोष शिंदे, गायत्री धनराज गायकवाड, अथर्व अर्जुन बोरकर, विजयकुमार कोकरे यांना विद्यार्थी शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
000