नांदेड (जिमाका) दि. 29 :- नांदेड सारख्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मुलींना रोजगारांची नवीन संधी उपलब्ध व्हावी, यादृष्टीने नांदेड येथे रोजगार मेळाव्याचे बुधवार 28 सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते. मुलींचा आत्मविश्वास द्विगुणित व्हावा या उद्देशाने नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या मुलींसाठीच्या या विशेष रोजगार मेळाव्यास अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. तब्बल 7 हजार मुलींनी आपली नाव नोंदणी केली.
राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा निमित्ताने हा विशेष उपक्रम घेण्यात आला. या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे, कौशल्य विकास विभागाचे आयुक्त दिपेंद्रसिंह कुशवाह, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी मार्गदर्शन केले. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे संचालक तथा सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी टाटा कंपनी यांच्याशी समन्वय साधून अधिकाधिक मुलींना रोजगाराची संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने नियोजन केले. येथील यशवंत महाविद्यालयात हा महामेळावा संपन्न झाला.
नारीशक्तीच्या या अनोख्या उत्सवास खासदार हेमंत पाटील, महापौर जयश्री पावडे, जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, आदी मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट देवून सहभागी मुलींना धैर्यासह शुभेच्छा दिल्या. खास मुलींसाठी बैंगलोर स्थित टाटा कंपनीच्या कार्यालयाने यासाठी विशेष पुढाकार घेतला. या कंपनीच्या प्रतिनिधीनी बॅच निहाय नोंदणी झालेल्या मुलीशी संवाद साधत त्यांचा उत्साह द्विगुणित केला. या मेळाव्यात जिल्ह्यातील सुमारे दोन हजार मुलीची निवड झाली आहे.
निवड झालेल्या मुलीसाठी टाटा कंपनीतर्फे 16 हजार रुपयाचे विद्यावेतन, तीन लाख रुपयांचा विमा, जेवण व राहण्याची सुविधा देण्यासह त्यांना 24 तास वैद्यकीय सुविधाही उपलब्ध केली जाणार असल्याचे टाटा कंपनीच्या प्रतिनिधीनी दिली. यासर्व निवड झालेल्या मुलींना बेंगलोर व होसूर याठिकाणीच्या कंपनीसाठी निवड केली आहे. या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, समाज कल्याणचे सहायक आयुक्त तेजस माळवदकर, कौशल्य विकासचे सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार, प्रा. गणेशचंद्र शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.
000