धुळे, दि. 7 (जिमाका वृत्तसेवा) : राज्य शासनाच्या अत्यंत महत्वाकांक्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत मुंबई येथे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम वर्ग करण्यात आली. धुळे जिल्ह्यातील ९ हजार २० शेतकऱ्यांच्या खात्यात ८९ कोटी ७४ लाख ५१ हजार ९५५ रुपये एवढी रक्कम वर्ग करण्यात आली. राज्याचे पणन व राजशिष्टाचार तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी ही माहिती दिली आहे.
राज्यातील शेतकरी हा राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक महत्वाचा भाग आहे. मात्र, अनियमित पाऊस, गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टी, महापूर यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे काही वेळेस पिकांचे नुकसान होते. त्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. त्यामुळे बाधित शेतकरी शेती कर्जाची मुदतीत परतफेड करू शकत नाही. असे शेतकरी थकबाकीदार झाल्यामुळे त्यांना बँकाकडून नव्याने पीक कर्ज उपलब्ध होऊ शकत नाही. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती. त्यानुसार जिल्ह्यातील ९ हजार २० शेतकऱ्यांना ८९ कोटी ७४ लाख ५१ हजार ९५५ रुपयांचा लाभ देण्यात आला. ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. यात धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ३ हजार ५९६ शेतकरी सभासदांना ३२ कोटी १३ लाख ९९ हजार ४०७ रुपये एवढ्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे.
राज्य शासनाने सर्व बँकांना कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना तातडीने खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून शेतकऱ्यांना नव्याने शेतीसाठी आर्थिक बळ मिळेल. पहिल्या यादीतील ज्या पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही, त्यांचे प्रमाणीकरण पूर्ण होताच त्यांच्या कर्जखात्यांवरही लाभाची रक्कम टप्प्याटप्प्याने हस्तांतरित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील उर्वरित शेतकऱ्यांनीही आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
0000






















WhatsApp