जिल्ह्यात ११ ते १८ नोव्हेंबर दरम्यान ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताहा’चे भव्य आयोजन – महासंवाद

    - Advertisement -

    • क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांची १५१ वी जयंती
    • विविध लोककल्याणकारी उपक्रम राबविण्यात येणार

    यवतमाळ, दि. १२ : आदिवासी समाजाचे हक्क, जल-जंगल जमीन रक्षण आणि देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात अतुलनीय योगदान देणारे क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त राज्य शासनाच्या निर्णयानुसार यवतमाळ जिल्ह्यात दिनांक ११ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह २०२६’ अत्यंत उत्साहात आणि लोकसहभागातून साजरा करण्यात येणार आहे. १५ नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा यांची १५१ वी जयंती ‘जनजातीय गौरव दिन’ म्हणून भव्य स्वरूपात साजरी केली जाणार असून या सप्ताहामध्ये नागरिकांनी सहभागी होऊन विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी पत्रकार परिषदेत केले.

    या सप्ताहामध्ये सर्व शासकीय यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या सहभागातून विविध सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्यविषयक व कल्याणकारी उपक्रम राबविले जाणार आहेत.

    सेवा सप्ताहातील प्रमुख कार्यक्रम व रूपरेषा जनजागृती

    ११ व १२ नोव्हेंबर २०२६ रोजी जिल्हा मुख्यालयी व जिल्ह्यातील सर्व आदिवासीबहुल तालुका मुख्यालयांमध्ये सप्ताहाची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविली जाईल.

    कल्याणकारी योजनांचा लाभ वाटप होणार

    १३ नोव्हेंबर २०२६ रोजी आदिवासी विकास विभागाच्या न्यूक्लियस बजेट योजनेतील पात्र लाभार्थ्यांना लाभ वाटप केले जाईल. धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान, पीएम जनमन आणि महिला बचत गटांना विविध शासकीय योजनांचा लाभ वितरित केला जाईल. कृषीपूरक व्यवसाय, सिंचन सुविधा व स्वयंरोजगारासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाईल.

    स्मारक स्वच्छता, दीपोत्सव व संस्कृती दर्शन

    १४ नोव्हेंबर २०२६  रोजी मौजा दत्तपुर ता कळंब येथील शामादादा कोलाम  यांच्या स्मृतीस्थळी  येथे दिपोत्सव चे आयोजन व मौजा धामणगाव देव ता दारव्हा येथे मुंगसाजी माऊली समाधीस्थळी  येथे दिपोत्सवाचे आयोजन केला जाईल.जिल्ह्यातील सर्व आदिवासी स्मारके व महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता करण्यात येईल. सायंकाळी या सर्व ठिकाणी भव्य दीपोत्सव साजरा केला जाईल तसेच आदिवासी लोकसंस्कृती, देव-देवता व परंपरांचे दर्शन घडविणारे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडतील.

    क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंती मुख्य शासकीय दिन

    १५ नोव्हेंबर २०२६ रोजी  जिल्हा व तालुकास्तरावर भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस व स्थानिक आदिवासी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात येईल. पद्म पुरस्कार विजेते, ‘मन की बात’ मध्ये गौरव झालेले आदिवासी समूह, समाजसेवक, बुद्धिजीवी व स्वातंत्र्यसैनिकांच्या नातेवाईकांचा जिल्हास्तरावर विशेष सत्कार करण्यात येईल. तसेच १५ नोव्हेंबर रोजी गडचिरोली येथे राज्यस्तरीय मुख्य शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून, राज्यपाल, मुख्यमंत्री व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम होईल.

    नागरी सेवा व शासकीय कागदपत्रे शिबिर

    १६ नोव्हेंबर २०२६ रोजी नागरिकांसाठी ओळखपत्रे व कागदपत्रे दुरुस्ती/अद्ययावतीकरण विशेष शिबिर आयोजित केले जाईल. यामध्ये वनपट्टेधारकांना लाभ वाटप, कृषी योजनांची ऑनलाइन नोंदणी, पीकविमा व ई-सेवांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवून मदत केली जाईल. तसेच यवतमाळ येथे वनजागर महोत्सव साजरा करण्यात येईल.

    आरोग्य व पोषण जनजागृती शिबिर

    १७ नोव्हेंबर २०२६ रोजी आरोग्य विभागाच्या सहकार्याने भव्य तपासणी शिबिरे होतील. यामध्ये सिकलसेल (Sickle Cell) आजाराविषयी जनजागृती व तपासणी, रक्तदाब, मधुमेह चाचणी, माता-बाल संगोपन आणि स्थानिक पौष्टिक तृणधान्ये / परसबागेबाबत मार्गदर्शन करण्यात येईल.

    १८ नोव्हेंबर २०२६ रोजी सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी युवक-युवतींसाठी रोजगार मेळावे, आयटीआय व कौशल्य विकास प्रशिक्षण, शिष्यवृत्ती मार्गदर्शन, बँक खाते व डिजिटल आर्थिक साक्षरता मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करून सप्ताहाचा समारोप होईल.

    यवतमाळ जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधव, शेतकरी, युवक, महिला भगिनी व नागरिकांनी या ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताहा’मध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी यावेळी केले.

    पारधी समाजासाठी विशेष पॅकेज

    यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण 61 पारधी बेडे असून, एकूण 3325 कुटुंबे आहेत ज्याची एकूण लोकसंख्या 12937 आहेत. दिनांक 04 नोव्हेंबर 2026 च्या शासन निर्णयानुसार पारधी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष पॅकेज राबविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. सन 2026-27 साठी न्युक्लिअस बजेटमधून 20 कोटी रुपये वैयक्तिक व सामूहिक लाभाच्या योजनांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. तसेच पारधी बेडे व वस्त्यांमधील मूलभूत सुविधांसाठी ठक्कर बाप्पा वस्ती सुधार योजनेंतर्गत 10 कोटी रुपये राखीव आहेत. पात्र पारधी लाभार्थ्यांना वैयक्तिक योजनांसाठी कमाल 50 हजार रुपये व सामूहिक योजनांसाठी 7.50 लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य उपलब्ध होईल. या पॅकेजमध्ये रोजगार, शिक्षण, आरोग्य, कागदपत्रे उपलब्ध करून देणे, महिला बचत गटांचे सक्षमीकरण व सामाजिक विकासाचे विविध उपक्रम समाविष्ट असल्याची माहिती पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी यावेळी दिली.

    आदिम जमातींच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष पॅकेज

    यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण 654 कोलाम पोड असून, एकूण 25223 कुटुंबे आहेत ज्याची एकुण लोकसंख्या  95687 आहेत. महाराष्ट्र शासनाच्या ४ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये कातकरी, कोलाम व माडिया या आदिम जमातींच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष पॅकेज मंजूर केले आहे. सन २०२६-२७ मध्ये वैयक्तिक व सामूहिक लाभाच्या योजनांसाठी ३० कोटी रुपये, तसेच आदिम वस्त्यांमधील मूलभूत सुविधांसाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांतील लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी वैयक्तिक लाभाकरिता ५० हजार रुपयांपर्यंत व सामूहिक लाभाकरिता ७.५० लाख रुपयांपर्यंत सहाय्य दिले जाईल. पाणी, रस्ते, वीज, शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास व रोजगारनिर्मिती यांसारख्या क्षेत्रांवर विशेष भर देण्यात आला आहे. ‘कोलाम साथ’मार्फत कोलाम समाजासाठीच्या योजनांचा प्रसार व प्रचार करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी यावेळी दिली.

    या पत्रकार परिषदेला निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुध्द बक्षी, प्रकल्प अधिकारी अमोल मेतकर, सहायक प्रकल्प अधिकारी केतन कवडी, जिल्हा समन्वयक प्रसाद बनसोड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतीश मून आदी उपस्थित होते.

    000000

    - Advertisement -